सिग्नल

Submitted by अतुल बिबवे on 26 December, 2013 - 18:09

वेळ दुपारची, मित्रमंडळहून अप्पा बळवंत चौकात चाललो होतो. सारसबागेजवळचा सिग्नल लाल झाला तसा थांबलो, शक्यतो थांबतो नेहमी (एक पुणेकर असूनसुद्धा). काही कारण नसताना डावीकडे पाहिले आणि पाहतच राहिलो, मला ती फार आवडली, जास्त वेळ नाही मिळाला पण सिग्नल हिरवा होईपर्यंत पाहिलं. हाताच्या अंतरावर उभी होती ती. ज्यावेळी मी तिला पाहिले अगदी त्याचवेळी तिनेसुद्धा माझ्याकडे पाहिले. त्या क्षणी भुवया जवळ झाल्या आणि विस्मृतीत गेलेल्या आपल्या माणसाकडे पाहावे तसे आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिले.
महत्वाचा क्षण, क्षणापूर्वीच निसटलाय कि काय अशी मनाची घालमेल सुरु झाली. अशीच अवस्था तिचीही झालेली होती हे तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होते. दिवा हिरवा झाला तसा इच्छा नसताना पुढे निघालो. गाडीवरून जाता-जाताच मान झुकवून गणेशाचे दर्शन घेतले आणि गाडीचा वेग कमी केला. तशी तिनेही पुण्याच्या सुसंस्कृत, सरळमार्गी वाहतुकीतून शिताफीने गाडी काढून थोडी माझ्यापुढे नेली. पुढे ती ना.सी. फडके चौकाकडे वळाली आणि मी सरळ निघालो. पण इतकं मात्र नक्की झालं कि तिने जाताना, अगदी पुणेरी भाषेत बोलावं तर 'खतरनाक लुक' दिला. हसू का नको असा विचार करीत दोघेही मार्गस्थ झालो.
आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत असं घडलंय, हो ना ? खरंच, काही ओळख नसताना आपण एकमेकांना ओळखतो असं वाटतं, इतकंच नव्हे तर कालच भांडलोय किंवा फिरायला गलो होतो असंहि वाटून जातं. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हंटलं तर क्षणात आपण पूर्ण आयुष्याचं व्हर्चुअल वर्ल्ड उभं करतो. त्याहून मजेची बाब म्हणजे पुढील काही क्षणात कामांच्या व्यापामुळे आपण हि छोटीशी लव्ह स्टोरी विसरूनही जातो.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोड Happy