लिलाव

Submitted by सारंग भणगे on 22 December, 2013 - 12:17

मैत्रीत भेटल्याचा जो हावभाव केला
घेता मिठीत त्यांनी पाठीत घाव केला

माझ्या घरात आले होऊन पाहुणे ते
मजलाच काढण्याचा त्यांनी ठराव केला

मी जिंकलो तरीही राहून शल्य गेले
माझेच दोस्त ते हो ज्यांनी उठाव केला

आमंत्रणे कशाला देता कलेवराला
'गेल्या'वरी प्रितीचा खोटा बनाव केला

मागावयास आले माझेहि देत गेलो
सारे लुटून आता माझाहि भाव केला

माझ्या विरोधकांचा त्यांनी विरोध केला
राहीन एकटा हे जाणून डाव केला

कंगाल पार झालो देऊन मी उधार्या
देणेकरीच माझे ज्यांनी लिलाव केला
--------------------------------------
सारंग भणगे. (22 डिसेंबर 2013)
http://sarangbhanage.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह सारंग फार छान
शेवटचे तीन ...चार जरा अजून छान करता आले असते त्यांच्यातला एखद दुसरा शब्द कुठेतरी नेमकेपणात कमी पडत आहे असे मनाला जाणवत आहे म्हणून म्हणत आहे मी गैरसमज नसावा

माझेच दोस्त ते हो<< ते आणि हो ह्या अक्षरांची अदलाबदल करून मधली स्पेस काढून टाक ..जास्त सुलभ आणि अकृत्रीम होईल ते
माझाहि ऐवजी माझाच चालेल आणि माझेहि ऐवजी ..ते सर्व..असे कसे वाटेल हे पाहशिल का अजून एक म्हणजे तू त्याना स्वताच देत गेला आहेस मग त्यांनी लुटले असे म्हणायला जागाच कुठे उरते नाहीका ! त्या जागी विकून ह्या शब्दाबद्दल विचार व्हावा
विरोधकांचा विरोध केला म्हणजे मझे समर्थन असा अर्थ निघेल मग खालची ओळ अर्थासाठी गफलतीची ठरेल ह्याकडेही पाहाच
देणेकरी म्हणजे आपण ज्याना उधारी दिली आहे ते की ज्यांना आपण पैसे देणे लागतो ते ..ह्याबाबत मी कन्फ्यूज आहे
पण तुला जे म्हणायचे आहे ते सर्व माझ्यापर्यंत तरी पोचले आहे व्यवस्थीत म्हणून ते शेरही आवडलेतच

उधार्‍या = udhaaRyaa असे टाईप कर
प्रितीचा<< हेही खटकते रे कर काहीतरी ह्याचेही आणि खोटा बनाव म्हणजे काय रे ..खोटा असतो म्हणूनच त्याला बनाव म्हणतात ना ..तो खोटा हा शब्द काढ मग प्रितीचा चे काहीतरी करायला जरा आणखी थोडी जमीनीतली जागा उपलब्ध होईल

असो
अजून येवूदेत गझल
खूप खूप शुभेच्छा

चूक भूल द्यावी घ्यावी (फॉर्मॅलिटी म्हणून असे म्हणावे लागते लगेच मनावर घेवू नये ;))
~वैवकु Happy

छान

मतल्यातल्या जो बद्दलही विचार करता येईल.वैवकुच्या प्रतिसादातली स्पष्टता व तळमळ फार आवडली. विचार व्हावा. गझल अर्थातच गुणदोषासह आवडली.