१९९६ माउंट एव्हरेस्ट - ८

Submitted by स्पार्टाकस on 18 December, 2013 - 21:57

नील बिडलमन ११ मे च्या संध्याकाळीच आपल्या तुकडीतील सदस्यांसह साऊथ कोल उतरुन कँप ३ वर पोहोचला होता. सुमारे २५००० फूट उंचीवर पोहोचल्यावर त्याने सँडी हिलला डेक्सामेथासनचं आणखीन एक इंजेक्शन दिलं. ल्होत्से धारेच्या खालच्या उतारांवर ते पोहोचत असताना त्यांच्या मदतीला येत असलेल्या बेपाळी मोहीमेतील शेर्पांशी त्यांची गाठ पडली. त्या शेर्पाच्या सहाय्याने ते खाली उतरत असतानाच अनपेक्षीतपणे संत्र्याच्या आकाराच्या दगडांचा एक लोंढाच ल्होत्से धारेच्या वरच्या उतारांवरून गडगडत आला !

त्यातील एक दगड नेमका एका शेर्पाच्या डोक्यावर येऊन आदळला ! त्या आघातामुळे तो शेर्पा तत्काळ बेशुध्द झाला आणि उतारावर घसरू लागला ! प्रसंगावधान राखून क्लेव स्कोनींगने त्याच्या पुढे उडी मारली आणि त्या शेर्पाच्या शरिराचा सगळा भार आपल्या देहावर घेतला. स्कोनींग शेर्पाला सावरत असतानाच आणखीन एक दगड येऊन पुन्हा त्या शेर्पाच्या डोक्यावर नेमका त्याच जागी आदळला !

सुदैवाने दोन वेळा दगडांचा आघात होऊनही शेर्पा काही वेळाने शुध्दीवर आला ! बिडलमनने त्याला सुखरूप कँप ३ पर्यंत आणलं. कँप ३ वर आणखी आठ शेर्पांनी त्याचा ताबा घेतला आणि ते त्याला बेस कँपवर घेऊन गेले. बिडलमन आणि इतरांनी कँप ३ वर एक दिवस थांबून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. डेव्हीड ब्रेशीअर्सच्या आयमॅक्स मोहीमेतील गिर्यारोहकांशी त्यांची कँप ३ वर भेट झाली. ब्रेशीअर्स म्हणतो,

" त्यांचा अवतार पाहून मला काय बोलावं ते कळेना ! ते सर्वजण एखाद्या युध्दात भाग घेऊन परत आल्यासारखे दिसत होते !"

सँडी हिल पिटमनला अश्रू आवरत नव्हते.
" मी बर्फावर आडवी झाले आणि मृत्यूची वाट पाहत राहीले. सुदैवाने मृत्यूपूर्वी बुकरीव आला !"

साऊथ कोलवर ११ मे च्या रात्रीपासूनच पूर्वीपेक्षाही जोरदार वादळाने थैमान घातलं होतं ! तब्बल ८० मैलाच्या वेगाने वाहणारे वारे आणि बर्फाच्या मा-यामुळे कँप ४ वरील अनेक तंबू कोसळले होते. अनेक गिर्यारोहक आपापल्या तंबूच्या कापडांवर बसून आणि त्याचे खांब पकडून तो कोलमडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. १२ मे ला पहाटेच्या सुमाराला स्टुअर्ट हचिन्सनचा ऑक्सीजन टँक संपला. तो म्हणतो,

" ऑक्सीजनविना माझ्या हाता-पायांतील संवेदना कमी होत असल्याची आणि ते थंड पडत चालल्याची मला जाणिव होत होती. सकाळी खाली उतरण्यास सुरवात केली नाही तर मी कधीच खाली जाऊ शकणार नाही अशी मला भीती वाटली !"

साऊथ समिटवर सकाळी येणा-या सुटका पथकाची वाट पाहत असलेल्या रॉब हॉलला पहाटे मृत्यूने गाठलं.

अंग दोर्जे अतिशय खिन्न अवस्थेत भर वादळात उभा होता. हॉल मोहीमेचा प्रमुख असला तरीही गिर्यारोहकांना एव्हरेस्टवरून सुरक्षीतपणे बेस कँपपर्यंत आणण्याची जबाबदारी शेर्पांचा प्रमुख म्हणून आपली आहे असं तो समजत असे. या वेळच्या मोहीमेत इतके गिर्यारोहक मरण पावल्याने अपराधीपणाची भावना त्याच्या मनात घर करून होती. त्याच्याकडे लक्षं जातात हचिन्सनने त्याला बळेच साऊथ कोलवरून खाली उतरण्याच्या तयारीला लागण्यास भाग पाडलं.

फिशर, हॉल, हॅरीस, हॅन्सन, नम्बा आणि वेदर्स एव्हाना निश्चीतच मरण पावलेले असणार या विचाराने माईक ग्रूमने सर्वांना खाली उतरण्याची तयारी करण्याची सूचना दिली. ग्रूमच्या हाता-पायाला मोठ्या प्रमाणात फ्रॉस्ट बाईट झालेला होता, परंतु तरीही तो सर्वांसह खाली उतरण्याच्या तयारीला लागला. हचिन्सन, कासिस्च्के, टेस्क, क्राकुअर यांनी निघण्याची तयारी केली.

सकाळचे ८.३० वाजले होते. बेक वेदर्सला ज्या तंबूत ठेवण्यात आलं होतं तो कोसळला होता. अर्थात वेदर्सची अवस्था पाहता तो जिवंत असण्याची शक्यता नव्हतीच. एकेक करून सर्वजण परतीच्या वाटेला लागले. परत निघण्यापूर्वी वेदर्सला शेवटचं पाहून घेण्यास म्हणून क्राकुअर त्याला ठेवलेल्या तंबूकडे वळला. वादळात तंबूच्या चिंध्या होऊन तो कोसळला होता. तंबूची कनात उचलून क्राकुअरने आत नजर टाकली.

वेदर्सच्या अंगावर गुंडाळलेल्या स्लीपींग बॅग्ज उडून गेल्या होत्या. त्याचा चेहरा सुजला होता, नाक आणि गालावर फ्रॉस्टबाईट झाल्याचे काळे डाग उमटलेले होते. वादळामुळे आणि थंडीमुळे तो थरथरत होता.

बेक वेदर्स अद्याप जिवंत होता !....आणि शुध्दीवर होता !

वेदर्सला जिवंत असलेला पाहून क्राकुअरची वाचा बसायची वेळ आली होती ! हा माणूस कशाचा बनलेला आहे ?

वेदर्स मध्यरात्रीपासून कोसळलेल्या तंबूत मदतीसाठी हाका मारत होता ! तो म्हणतो,

" मध्यरात्रीच्या सुमाराला वादळाने माझा तंबू कोसळला. वा-याचा जोर इतका होता की तंबूचं कापड माझ्या तोंडावर दाबलं जाऊन मी घुसमटत होतो ! माझा उजवा हात सुजत चालला होता. जसजसा हात सुजत होता तसा माझ्या मनगटावर असलेल्या घड्याळाचा पट्टा आवळत होता ! फ्रॉस्टबाईटमुळे मला दुसरा हात हलवता येत नव्हता, त्यामुळे घड्याळ काढण्याचा कोणताही मार्ग नव्हता ! मी मदतीसाठी हाका मारत होतो, पण वादळामुळे कोणाच्याही कानावर त्या जात नव्हत्या !"

स्वतःला सावरत क्राकुअरने वेदर्सला शक्य तितक्या सुस्थितीत झोपवलं आणि बेस कँपवर संपर्क साधला. डॉ. मॅकेंझीच्या सूचनेनुसार त्याने बर्लसन आणि अ‍ॅथन्सला गाठलं. वेदर्स जिवंत असल्याचं कळल्यावर ते दोघं त्याच्याकडे धावले. क्राकुअर म्हणतो,

" बेकला त्यांच्या ताब्यात देऊन मी साऊथ कोलवरून निघालो. बेक फार वेळ काढू शकणार नाही अशी माझी खात्री होती. आदल्या रात्री त्याने तग धरली हाच मोठा चमत्कार होता !"

जिनेव्हा स्पर उतरण्याच्या तयारीत असलेल्या हचिन्सनला आपल्या हार्नेसचा हूक नीट लागला आहे याची खात्री वाटत नव्हती. सुदैवाने क्राकुअर त्याच्या जवळ पोहोचल्यावर त्याच्या मदतीने त्याने हूक घट्ट लावला आणि ते यलो बँडच्या माथ्यावर उतरले. हचिन्सन इतका दमला होता की आपली आईस एक्स त्याने जिनेव्हा स्परवरच सोडून दिली होती.

कँप ३ वर पोहोचल्यावर विश्रांतीसाठी काहीवेळ थांबून सर्वजण कँप २ च्या मार्गाला लागले. वाटेत एका सुरक्षा दोरावरून उरतरण्यासाठी पुन्हा रांग लागली होती !. या रांगेच्या सर्वात शेवटी हचिन्सन वाट पाहत असताना त्याच्या मागून आलेल्या लोपसांगशी त्याची गाठ पडली. लोपसांग कमालीचा थकलेला होता. स्कॉट फिशरच्या मृत्यूचा त्याला जबरदस्त धक्का बसला होता.

" स्कॉट गेला ! मी त्याला वाचवू शकलो नाही !" लोपसांग म्हणाला, " हा सगळा माझा दोष आहे ! मी त्या रात्री त्याला तिथे सोडून आलो नसतो तर स्कॉट वाचला असता. मी त्याला ओढून खालपर्यंत आणायला हवं होतं !"

दुपारी २.०० च्या सुमाराला ग्रूम, क्राकुअर, हचिन्सन, टेस्क आणि कासिस्च्के कँप २ वर पोहोचले. फिशरच्या तुकडीतील गिर्यारोहकांची त्यांच्याशी गाठ पडली. साऊथ कोलवरच्या जीवघेण्या वा-याचा इथे मागमूसही नव्हता ! लख्ख सूर्यप्रकाशात घामाच्या धारा लागत होत्या !

दुपारी ३.०० च्या सुमाराला सहा शेर्पांच्या मदतीने अडखळत चालत असलेला मकालू गाऊ कँप २ वर पोहोचला ! ताबडतोब त्याला ' हॉस्पीटल ' मध्ये नेण्यात आलं ! कँप २ वरच्या एका तंबूचं तात्पुरत्या हॉस्पीटलमध्ये रुपांतर करण्यात आलं होतं. मॅल डफच्या तुकडीतील हेन्रीक हॅन्सन आणि टॉड बर्लसनच्या तुकडीतील केन केमलर यांनी त्याचा ताबा घेतला होता. गाऊच्या हातापायांना झालेला फ्रॉस्टबाईट पाहून केमलर इतका हादरला की काही क्षण त्याच्यावर उपचार करण्याचंही त्याला भान राहीलं नाही !

केमलरच्या विनंतीवरून हाता-पायांना झालेल्या फ्रॉस्टबाईटचे फोटो घेण्यास गाऊने लगेच संमती दिली. केमलर म्हणतो,

" मी त्याच्या हाता-पायाचे फोटो घेत असताना मकालू चक्क हसत होता ! आपल्याला झालेल्या फ्रॉस्टबाईटचा युध्दात हात-पाय गमावलेल्या सैनिकाप्रमाणे त्याला अभिमान वाटत होता !"

संध्याका़ळी ५.०० वाजता कँप २ वरच्या गिर्यारोहकांना डेव्हीड ब्रेशीअर्सचा रेडीओ संदेश आला,

" आम्ही सात वाजेपर्यंत बेक वेदर्सला घेऊन येतो आहोत !"

त्या संदेशाचा अर्थ ध्यानात येताच कँप २ वर सर्वजण थक्क झाले ! ब्रेशीअर्स आणि इतर वेदर्सला खाली आणत होते ! वेदर्सचा मृतदेह नाही !

याचा अर्थ वेदर्स अद्याप जिवंत होता !

" आम्ही नऊच्या सुमाराला त्याला डेक्सामेथासनचं इंजेक्शन दिलं, " पीट अ‍ॅथन्स म्हणतो, " इंजेक्शन दिल्यावर काही वेळाने तो चक्क उठून बसला ! साडेदहाच्या सुमाराला आम्ही त्याच्यासह उतरण्याची तयारी केली तेव्हा तो स्वतःच्या पायाने चालत होता ! हा माणूस आहे का कोण ?"

"त्यांनी मला इंजेक्शन दिल्यावर काही वेळात मला नवचैतन्य प्राप्त झाल्यासारखं वाटलं !" वेदर्स लिहीतो, " माझ्या बायको-मुलांसाठी जिवंत राहण्याच्या तीव्र ईच्छेने साऊथ कोलवरच्या त्या वादळातून मी कँप ४ वर पोहोचलो होतो. आता हार मानायची नाही असा मी ठाम निर्धार केला होता. काहीही झालं तरी पुन्हा आपल्या घरी जायचंच हा एकमेव विचार त्या वेळी माझ्या डोक्यात होता !"

अ‍ॅथन्स बेकच्या पुढे चालत होता. बेकला प्रत्येक पाऊल कुठे टाकावं याची सूचना तो देत होता. बेकच्या पाठोपाठ त्याची हार्नेस धरून बर्लसन चालत होता. यलो बँडच्या वर त्यांच्या मदतीसाठी कँप ३ वरून आलेले एड व्हिस्टर्स आणि रॉबर्ट शॉअर पोहोचले होते. कँप ३ वर पोहोचताच डेव्हीड ब्रेशीअर्स, जिम विल्यम्स, अर्सेली सेगारा आणि वेका गुस्ताफसन त्यांच्या मदतीला आले. आठ जणांनी मिळून झपाट्याने वेदर्सला कँप २ वर उतरवलं !

" त्याच्या हाताला झालेला फ्रॉस्टबाईट गाऊपेक्षाही भयंकर होता !" केमलर म्हणतो, " रात्रभर आम्ही त्याचा हात गरम पाण्यात बुडवून ठेवला होता. त्याला हाताचा काही भाग गमवावा लागणार याबद्दल मला तेव्हाच कल्पना आली होती !"

बेस कँपवर असलेल्या गाय कॉटरने अथक प्रयत्नांअंती वेदर्स आणि गाऊची वेस्टर्न कूम वरून हेलीकॉप्टरने सुटका करण्याची योजन आखली होती. खुंबू आईसफॉलमध्ये असलेल्या असंख्य कपारी शिडीवरून ओलांडणं वेदर्स आणि गाऊला अशक्य होतं. शेर्पांच्या मदतीने तसा प्रयत्न करताना सर्वजण एखाद्या कपारीत कोसळण्याचा धोका टा़ळता येण्यासारखा नव्हता.

२१००० फूटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या वेस्टर्न कूमपर्यंत हेलीकॉप्टर नेणं अतिशय कठीण असलं तरी अशक्य नव्हतं. १९७३ साली एव्हरेस्टच्या मोहीमेवर असलेल्या इटालियन तुकडीने आपलं गिर्यारोहणाचं साहीत्य वेस्टर्न कूमवर नेण्यास हेलीकॉप्टर वापरलं होतं. मात्र दोनपैकी एक हेलीकॉप्टर कोसळल्यानंतर गेल्या २३ वर्षांत कोणीही तसा प्रयत्न केला नव्हता.

गाय कॉटरच्या प्रयत्नांमुळे काठमांडूच्या अमेरिकन वकीलातीने नेपाळ सरकारचं मन व़ळवण्यात यश मिळवलं. नेपाळ लष्कराच्या वैमानिकांनी ही कामगिरी आपल्या अंगावर घेतली !

१३ तारखेच्या सकाळी कॉटरच्या सूचनेनुसार क्राकुअर आणि हचिन्सनने हेलीकॉप्टर उतरवण्यासाठी वेस्टर्न कूमवर योग्य जागेची शोधाशोध करण्यास प्रारंभ केला. कँप २ पासून सुमारे दोन-अडीच मैलांवर खुंबू आईसफॉलच्या कडेशी ते पोहोचले असतानाच हेलीकॉप्टर निघाल्याचा संदेश आला. दरम्यान आयमॅक्स मोहीमेच्या गिर्यारोहकांनी सुरक्षा दोराच्या सहाय्याने बेक वेदर्सला तिथपर्यंत आणलं होतं. डेव्हीड ब्रेशीअर्स तिथे पोहोचताच त्याच्या अनुभवी नजरेने हेलीकॉप्टर उतरवण्यासाठी सोईची जागा हेरली. त्या जागेची माहीती क्राकुअर कॉटरला कळवत असतानाच सहा शेर्पांच्या सहाय्याने मकालू गाऊ तिथे येऊन पोहोचला. गाऊला शेर्पांनी ताडपत्रीच्या मोठ्या तुकड्यावर बसवून ओढत तिथे आणलं होतं !

काही वेळातच नेपाळ लष्कराचं बी-२ हेलीकॉप्टर त्यांच्या माथ्यावर घिरट्या घालू लागलं ! हेलीकॉप्टरमधील अनावश्यक वजन आधीच कमी करण्यात आलेलं होतं. दोन वेळा हेलीकॉप्टर उतरवण्यात अपयश आलं परंतु तिस-या प्रयत्नात मात्र हेलीकॉप्टर ग्लेशीयरवर सफाईदारपणे उतरलं ! हेलीकॉप्टरच्या शेपटीकडचा भाग एका अंतहीन कपारीच्या वर होता !

एकावेळी एकाच प्रवाशाला हेलीकॉप्टरमधून जाता येणं शक्यं होतं ! मकालू गाऊला चालणं अशक्य झालं असल्याने आधी त्याची रवानगी करण्याचं सर्वानुमते ठरवण्यात आलं. शेर्पांनी गाऊची उचलबांगडी करून त्याला हेलीकॉप्टरच्या मागच्या भागात चढवलं. गाऊला घेऊन हेलीकॉप्टर काठमांडूच्या दिशेने उडालं.

वेस्टर्न कूमवर बाकीचे गिर्यारोहक हेलीकॉप्टरच्या दुस-या फेरीची वाट पाहत होते. पुन्हा हेलीकॉप्टर न आल्यास वेदर्सला खाली उतरून येण्याशिवाय पर्याय नव्हता ! ब्रेशीअर्स, व्हिस्टर्स, अ‍ॅथन्स, बर्लसन, हचिन्सन आणि क्राकुअर या चर्चेत मग्न असतानाच खुंबू आईसफॉलवरुन हेलीकॉप्टर येत असल्याचा आवाज ऐकू आला !

ब्रेशीअर्स आणि अ‍ॅथन्सच्या मदतीने वेदर्स हेलीकॉप्टरमध्ये चढला. त्याला घेऊन हेलीकॉप्टर काठमांडूच्या दिशेने निघून गेलं.

नेपाळ लष्कराचा बहाद्दर वैमानीक लेफ्टनंट मदन खत्री छेत्रीने हेलीकॉप्टरच्या सहाय्याने वेदर्स आणि गाऊची सुटका करण्यात यश मिळवलं होतं !

तासाभराच्या आत वेदर्स आणि गाऊवर काठमांडूच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू झाले होते !

१३ मे च्या संध्याकाळपर्यंत हॉल आणि फिशरच्या तुकडीतील सर्व गिर्यारोहक खुंबू आईसफॉल पार करून बेस कँपवर पोहोचले होते. कँपवरच्या इतरांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. हॉल, फिशर, हॅरीस, हॅन्सन आणि नम्बाच्या आठवणींनी सर्वांनाच भरुन आलं होतं.

१४ मे च्या दुपारी नील बिडलमनने मरण पावलेल्या गिर्यारोहकांसाठी श्रध्दांजली सभा आयोजीत केली होती. लोपसांगचे वडील धर्मगुरू नवांग स्या क्या यांनी मृतात्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली. बिडलमन, कॉटर, बुकरीव, क्राकुअर यांनी श्रध्दांजली वाहीली.

शार्लोट फॉक्स आणि माईक ग्रूमच्या हाता-पायांना फ्रॉस्टबाईट्ने ग्रासलं होतं. गाय कॉटरने त्यांची हेलीकॉप्टरच्या सहाय्याने बेक कँपवरून काठमांडूला जाण्याची व्यवस्था केली होती. १५ मे च्या सकाळी फॉक्स आणि ग्रूमला हेलीकॉप्टरने काठमांडूला नेण्यात आलं. त्यांच्याबरोबर देखरेखीसाठी जॉन टेस्कची पाठवणी करण्यात आली. दुपारी हॉल आणि फिशरच्या तुकडीने बेस कँप सोडून फेरीचे गाठलं. कॉटर, हेलन विल्टन आणि इन्ग्रीड हंट बेस कँपच्या आवराआवरीसाठी थांबले होते.

१६ मे च्या सकाळी फेरीचेहून सर्वांना हेलीकॉप्टरने नामचे बाजारपेक्षा काहीशा उंचावर असलेल्या सेंगबोचे गावात आणण्यात आलं. तिथून काठामांडूला नेणा-या हेलीकॉप्टरची सर्वजण वाट पाहत असतानाच तीन जपानी त्यांच्या भेटीस आले.

त्या तिघांपैकी एकजण मुनेओ नुकीता हा उत्कृष्ट गिर्यारोहक होता. त्याने पूर्वी दोनदा एव्हरेस्टचं शिखर गाठलेलं होतं. त्याच्याबरोबर असलेल्या दोघांपैकी एकजण होता केनीची नम्बा. यासुको नम्बाचा नवरा ! दुसरा तिचा भाऊ होता. नम्बाच्या मृत्यूबद्दल त्यांना गिर्यारोहकांकडून खुलासा हवा होता. नील बिडलमनवर त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. बिडलमन म्हणतो,

" यासुकोला साऊथ कोलवरच्या वादळात सोडून कँप ४ च्या दिशेने जाताना मला झालेल्या यातना मी त्यांना समजावून सांगू शकत नव्हतो. माझा हात तिने घट्ट धरला होता. सर्वांना वाचवण्यासाठी कोणी ना कोणीतरी कँप ४ वर पोहोचणं आवश्यक होतं. अद्यापही माझ्या मनगटावर तिच्या हाताची पकड मला जाणवते !"

काठमांडूला पोहोचल्यावर सगळ्या चौकशा आटपल्यावर गिर्यारोहक आपापल्या वाटेला लागले.

एव्हरेस्टने आतापर्यंत ९ बळी घेतले होते. नवांग तोपचेची काठमांडूच्या हॉस्पीटलमध्ये मृत्यूच्या दिशेने वाटचाल सुरू होती.

आयमॅक्स मोहीम, इयन वूडॉलचे दक्षिण आफ्रीकन, डफ आणि बर्लसनच्या मोहीमा, गोरान क्रप शिखराच्या माथ्यावर पोहोचण्यात यशस्वी होणार होते का ?

तिबेटमध्ये असलेल्या इतर मोहीमांपैकी शिखरावर पोहोचण्यात कोण यशस्वी होणार होतं ?

आणि...

या मोसमातील एव्हरेस्टवरचं मृत्यूसत्रं संपलं होतं का ?

क्रमशः

१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ७.............................................................................................१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ९

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमशः नको, सगळे एकदमच वाचायला हवंय आणि हे संपू देखिल नये असे कायतरी परस्परविरोधी वाटतंय...

आडो आणि हर्पेनला अनुमोदन! Happy स्पार्टाकस यांनी कमाल जिवंत वर्णन केले आहे.

बेकच्या सुटकेप्रीत्यर्थ वेस्टर्न सीडब्लूएममध्ये उतरलेले हेलिकॉप्टर इथे पहा.

बेक वेदर्स यांनी स्वतः त्यांच्या सुटकेची कहाणी इथे सांगितली आहे.

संपूर्ण उजवा हात काढून टाकलेला, डाव्या हाताची बोटं कापलेली, चेह-याचा बराचसा भाग प्लॅस्टिक सर्जरी केलेला...अशा अवस्थेतही आनंदाने प्राप्त जीवनाला सामोरे जाणे....मला वाटते हाच पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड त्यांना मरणाच्या दारातून जिवंत परत घेऊन आला असावा.

स्पार्टाकस, मी पुढील अनेक भागांच्या प्रतीक्षेत आहे! Happy

जबरी वर्णन ह्या भागातही..

स्पार्टाकस, तुमची ही लेखमाला संपूच नये असं वाटतंय. >>> अनुमोदन !

आयमॅक्स मोहीम, इयन वूडॉलचे दक्षिण आफ्रीकन, डफ आणि बर्लसनच्या मोहीमा, गोरान क्रप शिखराच्या माथ्यावर पोहोचण्यात यशस्वी होणार होते का ? >>> दुसर्‍यांना मदत न करणार्‍या वुडॉलचं पुढे काय झालं असेल हाच विचार आला अगदी !

" मी त्याच्या हाता-पायाचे फोटो घेत असताना मकालू चक्क हसत होता ! आपल्याला झालेल्या फ्रॉस्टबाईटचा युध्दात हात-पाय गमावलेल्या सैनिकाप्रमाणे त्याला अभिमान वाटत होता !" >>>> मूर्तिमंत धैर्यच ....

आणि बेक वेदर्सही - कम्माल का आदमी....... हॅट्स ऑफ.....

स्पार्टाकस यांनी कमाल जिवंत वर्णन केले आहे. >>>>>>>+१००००००........

सायो,
या मोसमातील एव्हरेस्टवरचं मृत्यूसत्रं संपलं होतं का ?

... अजून बरंच काही घडायचं होतं

कोणता आडो? इनटू थिन एअर?
मला हे एवरेस्टचं मृत्युसत्र वाचून एक प्रश्न पडला. प्रशस्त आहे, नाही कल्पना नाही. ह्या सगळ्या डेड बॉडीज आत्ता फ्रिझ झालेल्या अवस्थेत आहेत. पण जेव्हा ग्लेशियर्स मेल्ट होतील आणि त्यात एवरेस्टचा नंबर लागेल तेव्हा ह्या बॉडीज वाहत आपल्या नद्यांना येऊन मिळतील. किती वर्ष लागतील ह्याला काय माहित!!!

हो सायो, इन टू थिन एअरच. नाहीच आवडला समहाऊ.

मला असा प्रश्न पडलाय की तिथे गिर्यारोहकांना अमानवीय अनुभव येत असावेत कां? Proud

कोणत्याही पुस्तकावर बेतलेले पिक्चर हे मोस्टली फ्लॉप कॅटेगरीतच असतात (३,४ तरी पाहिले आहेत) . एवढ्या मोठ्या पुस्तकांना दीडेक तासात बसवायचं म्हणजे काटछाट आलीच आणि तिथेच मजा निघून जाते.