याचना संपोत माझ्या !

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 December, 2013 - 21:04

वेदना रक्तात थोड्या ओत माझ्या
जीर्ण झाला जाणिवांचा पोत माझ्या

मार्ग दर्शवण्यास केली आर्जवे मी
टाकला डोळ्यांवरी तू झोत माझ्या

जीवनाचा खेळ झाला एकपात्री
नाटकाला लोटले गणगोत माझ्या

पूर्णता त्याच्या घरी पाणी भरू दे
वंचना माझ्या घरी नांदोत माझ्या

गुंतण्यातिल यातना माझ्या मला दे
वागती संदिग्ध होता होत माझ्या

कळकळीचे मागणे आहे सख्या हे....
तोड नाते, याचना संपोत माझ्या !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण परमोच्च आनंदाच्या क्षणीही शब्द दगा देतात असाही माझा वैयक्तिक अनुभव आहे
त्याचं काय आहे, कवी आणि कविता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी तुम्ही कविता जगत असलात तरीही! थोडे अलिप्त झाल्या शिवाय कविता लिहिता येणार नाही असे मला वाटते. थोडे म्हणजे अगदी आठवडा दहा दिवस नव्हे; पण घटना घडल्यानंतर काही तास तरी गेले पाहिजेत. काही ओळी अक्षरशः स्वप्नात तयार होतात; पण त्यासुद्धा काही कालावधीनंतरच! Happy

विदिपा ' डोळ्यांवरी' आपल्याला का खटकतोय हे सविस्तर जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला.>>>

सुप्रिया,

माझा मुद्दा सुलभतेच्या दृष्टीकोनातून मांडलेला आहे. माझ्या मते 'डोळ्यांवरी' 'संपुनी' घेउनी' 'देउनी' असे शब्द आजच्या मराठीत चपखल नाहीत. वाचताना कुठेतरी अवघडलेपण येत रहाते हा माझा वैयक्तिक अनुभव!

अर्थात अशा वापराने फार काही आभाळ कोसळत नाही म्हणा!

तरी होता होईल तेवढी सीमलेस शब्दरचना करण्याकडे कल असावा असे वाटते. हे मत एक त्रयस्थ म्हणून मी करतो त्या गझलांनाही तितकेच लागू पडते.

भाषेचा तिच्या प्युअरेस्ट फॉर्ममधे जास्तीत जास्त वापर साहित्यीकांनी केला पाहिजे हा एक आमच्या परवाच्या पुण्यातल्या चर्चेतला मुद्दा!

विदिपा मुद्दा पटतोय तुमचा यापुढे लक्षपूर्वक आमलात आणण्याचा जरुर प्रयत्न करेन.

<<<भाषेचा तिच्या प्युअरेस्ट फॉर्ममधे जास्तीत जास्त वापर साहित्यीकांनी केला पाहिजे हा एक आमच्या परवाच्या पुण्यातल्या चर्चेतला मुद्दा!>>>

या अशा चर्चेचा प्रत्यक्ष लाभ आम्हासारख्या नवोदितांनाही व्हावा ही एक प्रामाणिक अपेक्षा. (फक्त श्रोत्यांच्या भुमिकेतूनही चालेल. )

चुभूदेघे.

-सुप्रिया.

या अशा चर्चेचा प्रत्यक्ष लाभ आम्हासारख्या नवोदितांनाही व्हावा ही एक प्रामाणिक अपेक्षा. (फक्त श्रोत्यांच्या भुमिकेतूनही चालेल. ) + १

विदिपा.. शक्य असेल तर आम्हालाही बोलवा.. आवडेल!

मार्ग दर्शवण्यास केली आर्जवे मी
टाकला डोळ्यांवरी तू झोत माझ्या

मी कदाचित उशीरा आलो असेन. पण या द्वीपदीमध्ये मला तरी काहीच 'अशुद्धलेखन' किंवा 'अवघड' किंवा वाचायला 'अडखळल्यासारखे' वाटले नाही.

आजकाल रात्री वाहने चालवताना जो झोत पडतो...डोळे दिपून जातात... अक्षरशः काहीच दिसेनासे होते! तोच जर अर्थ अभिप्रेत असेल तर खूप सुंदर! Happy

शरदराव,

वाट दाखवण्यास केली आर्जवे मी..... असा पहिला मिसरा अजून सुलभ वाटेल...

तसेच आपण बोलताना डोळ्यांवर असे म्हणतो... डोळ्यांवरी असे म्हणत नाही... त्या सुलभतेच्या दृष्टीने विदिपा म्हणत असावेत असे वाटत आहे.

गझल निर्विवाद छान आहे...परंतु नव्या पीढीतील आश्वासक स्त्री गझलकार असलेल्या सुप्रिया कडून माझ्यासारख्या गझलरसिकाच्या अपेक्षा जरा जास्तच आहेत. Happy

बाप रे !!

डॉक. Happy

शरदजी गझलेतील मिसरे सरळ साधे एकमेकांशी समोरासमोर संवाद साधणारे असल्यास तो शेर सरळसोटपणे
रसिकाच्या काळजात घुसतो नि दिर्घकाळ स्मरणातही राहतो या मताशी सहमत असल्याने विदिपा आणि डॉ.
यांच्या त्या शेराबाबतच्या मतांशी सहमत आहे.

धन्यवाद !

-सुप्रिया.

रच्याकने 'आलिप्त' ऐवजी 'निष्ठूर' सुचलं होत पण अर्थाच्या दृष्टीकोनातून 'निष्ठूर' शब्दप्रयोग वापरणं भलतच निष्ठूरतेच वाटून गेल. Sad

-सुप्रिया.

पूर्णता त्याच्या घरी पाणी भरू दे
वंचना माझ्या घरी नांदोत माझ्या >>> सुरेख

बाकिचे शेर पण चांगले आहेत पण अजून चांगले होउ शकले असते असे वाटले..

योजलेले कवाफी आणि 'माझ्या' ह्या रदीफ मुळे वाक्यरचनेच्या प्रवाहीपणात अडथळा निर्माण होत आहे असे वाटले...

उदा...

वेदना रक्तात थोड्या ओत माझ्या >>> ह्यापेक्षा 'ओत थोड्या वेदना रक्तात माझ्या' हे जास्त प्रवाही वाटते

किंवा जीर्ण झाला जाणिवांचा पोत माझ्या >>> माझ्या जाणिवांना जोडून आले असते तर अजून प्रवाही वाक्यरचना झाली असती

चु.भू.दे.घे.

सुप्रियाताई,

जबरदस्त प्रतिभा! नि:शब्द करणारी गझल!! वाचकांचे प्रतिसाद देखील वाचनीय. विशेषत: बेफिकीरांचे स्पष्टीकरण.

आ.न.,
-गा.पै.

मिल्या ,

आपल्या मतानुरुपही विचार करुन बघते . मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !

सगळ्यांचे आभार,

गामा_पैलवान विशेष,

-सुप्रिया.

अभ्यासपूर्ण तरीही रंगतदार चर्चेमुळे खूपच मजा घेता आला ....... सर्वांचेच मनापासून आभार .....

एखाद्या शेराचे सुंदर विश्लेषण, चपखल शब्द योजनेची करामत वा सुयोग्य मांडणीचे महत्व अशा किती तरी पैलूंना सहज स्पर्श करणारे सर्वच प्रतिसाद अतिशय आनंद देऊन गेले ..... कायमच स्मरणात राहील ही गजल आणि चर्चाही .....

आणि त्यामुळेच "न संपणार्‍या याचना" निर्माण झाल्यात .... Happy Wink

"न संपणार्‍या याचना">>>>>

अगदी अगदी ! Happy

धन्स !

Pages