शल्य रुतले शेवटी

Submitted by निशिकांत on 18 December, 2013 - 04:07

सर्व गेले, वंचनांचे झुंड उरले शेवटी
मृगजळावर भाळल्याचे शल्य रुतले शेवटी

आठवांची आठवणही सोडुनी गेली मला
एकटेपण जीवनाचे सूत्र ठरले शेवटी

माय का आव्हेरलेली आठवे अंतःक्षणी?
जन्म पुढचा तीच देइल, सत्त्य पटले शेवटी

कावळ्याने पिंड शिवलेला जरी असला तरी
घुटमळे आत्मा मुलातच, पाश कसले शेवटी

जज असो न्यायालयीचा, फाटका बाबा असो
स्त्रीत मादीचे, नरांना चित्र दिसले शेवटी

भाव आकाशास भिडले हे खरे असले तरी
मुल्य घटले माणसांचे हेच कळले शेवटी

तोंडओळखही नसावी नीतिमत्तेची असे
गुंड का सिंहासनावर मस्त बसले शेवटी?

चांदण्यातिल शिल्प ज्यांनी बांधले यमुनातिरी
त्या कलाकारांस शिक्षा, हात तुटले शेवटी

बेरक्या "निशिकांत"चे का नेत्र झरले शेवटी?
पाहता साक्षात मृत्त्यू, हास्य विरले शेवटी

आवांतरः---
"हास्य उरले शेवटी" हा शेर हुस्ने मतला (मतल्याच्या तोंडवळ्याचा) आहे. असा शेर मतल्याच्या खाली लिहावा असा संकेत आहे. पण या शेरात शायराचे नाव आल्यामुळे हा मक्ता पण आहे. मग हा शेर नक्की कुठे लिहावा? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

निशिकात देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वंचनांचे झुंड उरले हे वंचनांची झुंड उरली असं हवं आहे का , निशिकान्तजी ? दुस-या शेरात अलामतभंग आहे बहुतेक . गझल छानच !

छान!

तुमची गझलेवरची निष्ठा मला फार भावते.

हुस्ने मतला - कुठेही लिहा, शायराचे नाव मतल्यात आले तरी काय बिघडते?

सर्वांचे मनपासून आभार प्रतिसादासाठी.
राजीवः-- आपण अलामतभंगाची चूक काढलेली सही आहे. ती दुरुस्त केली आहे. धन्यवाद. झुंड बद्दल माझे मत वेगळे आहे. एकामागून एक झुंड येत होते असे पण वापरण्याचा प्रघात आहे. एका मागून एक झुंडी येत होत्या असे पण म्हणतात. तथापी अभार अपले.

हीपण आवडलीच काका तुमचे शेर नेहमीच अपने शेर असतात त्यामुळे आवडतातच आवडतात मला

फाटका बाबा ही प्रतिमा खूप आवडली

मक्त्याचा शेर हुस्ने मतला असूदेत पण कुठेही लिहा फरक असा काय पडणार असे मला वाटते
तसे पाहता त्यात झुरले विरले असे काफिये आल्याने ("रले" हा कॉमन अक्षरसमूह असल्याने अलामत आधीच्या अक्षरावरची ग्राह्य धरली जाईल त्यामुळे त्यास हुस्ने मतला म्हणतात की नै माहीत नाही )