पडते भ्रमात काही सरते भ्रमात काही

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 December, 2013 - 06:34

केव्हा, कश्या, कुठेही या वागतात काही !
उरली तुझ्या सयींना ना रीत-भात काही

आम्हा परस्परांचा अंदाज येत नाही
त्याच्या मनात काही माझ्या मनात काही

वारा दुरून येतो सलगी करून जातो
असतात भोग सारे हे जन्मजात काही !

सुकवून पापणीला ओलावणे दवाने
याहून जास्त नसतो विश्वासघात काही

अपघातग्रस्त तो ही अपघातग्रस्त ती ही
रस्ता विचारतो का हे धर्म-जात काही ?

आयुष्य संभ्रमांचा मांडीत ठोकताळा
पडते भ्रमात काही सरते भ्रमात काही

प्रेमात माउलीच्या नसते कधी तफावत
अव्यक्त राहिलेले सलते उरात काही

आलेख जीवनाचा चढता असो उतरता
आरंभ शून्य आहे दे शेवटात काही

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीच ओळी व एक दोन शेर आवडले
अजून वेळ घ्यायला हवा होतात असे वाटले काफिये मात्र सहज आल्याचे जाणवले रदीफ नीट मॅच झालीये असे वाटत नाहीये अनेक जागी
आज गझल सादर केलीत म्हणजे नुकत्याच ओढवलेल्या दु:खद प्रसंगातून सावरत आहात असे दिसते हे पाहून बरे वाटले

Happy

आरंभ शून्य आहे दे शेवटात काही<<< सुंदर!

सुबक व चांगली गझल!

सुप्रिया, गझलेच्या सहाय्याने वैयक्तीक दु:खे जमतील तितकी विसरण्याची तुमची कवीवृत्ती व 'जसे येते तसे घ्यावे प्रिया आयुष्य वाट्याला' ही एका तटस्थ निरिक्षकाची भूमिका वंदनीय आहे. मायबोलीकर तुमच्या दु:खात सहभागी आहेतच.

नसलेल्या काल्पनिक दु:खांना गोंजारत वृत्तानुसारी शेर पाडणार्‍यांच्या भाऊगर्दीत काहीतरी अस्सल देण्याचा तुमचा संयत व अधिकाधिक समृद्ध होत चाललेला अनुभव ही वाईटातूनही चांगले काढण्याची आम्हा रसिकांची वृत्ती!

धीर धरून ह्यातून बाहेर पडा!

-'बेफिकीर'!

सुबक व चांगली गझल! <<< बेफीजी असे म्हणत आहेत हे पाहून मी गझल पुन्हा मन लावून वाचायचे ठरवले
मघास्पेक्षा अधिक आतून फील करता आली आणि मघाशी मी रदीफ बाबत म्हणालो ते आता वाचताना जाणवले नाही ....(मघाशी तसे म्हणालो त्याबद्दल क्षमस्व )

आधीपेक्षा काही शेर जास्त आवडले

प्रेमात माउलीच्या नसते कधी तफावत<< वरून एक शेर आठवला
पण असो !

धन्यवाद

केव्हा, कश्या, कुठेही या वागतात काही !
उरली तुझ्या सयींना ना रीत-भात काही

आम्हा परस्परांचा अंदाज येत नाही
त्याच्या मनात काही माझ्या मनात काही

व्वाह ! Happy

अपघातग्रस्त तो ही अपघातग्रस्त ती ही
रस्ता विचारतो का हे धर्म-जात काही ?
व्वा...

प्रेमात माउलीच्या नसते कधी तफावत
अव्यक्त राहिलेले सलते उरात काही
व्वा...

आलेख जीवनाचा चढता असो उतरता
आरंभ शून्य आहे दे शेवटात काही
व्वा... खरेच आहे.

>>>सुकवून पापणीला ओलावणे दवाने
याहून जास्त नसतो विश्वासघात काही>>>

व्वा...खूप भिडला हा शेर..
अख्खी गझलच सही आहे....त्यामुळे परत टाकत नाही..

धन्यवाद....

आवडेश!

सर्वच शे'र आवडले. तरी...

आम्हा परस्परांचा अंदाज येत नाही
त्याच्या मनात काही माझ्या मनात काही

अपघातग्रस्त तो ही अपघातग्रस्त ती ही
रस्ता विचारतो का हे धर्म-जात काही ?

प्रेमात माउलीच्या नसते कधी तफावत
अव्यक्त राहिलेले सलते उरात काही

हे तीन जास्त आवडले. Happy