एकएकटी नांदत होती

Submitted by निशिकांत on 5 December, 2013 - 05:04

दारावरच्या पाटीवरती
दोन्ही नावे झळकत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

जवळ असोनी जवळिक नाही
असे कसे हे जीवन जगणे?
सुगंधास का फुलापासुनी
शक्य वाटते स्वतंत्र असणे?
अहंकार हा शत्रू असुनी
दोघेही गोंजारत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

आनंदाची नवीन व्याख्या
"दुसर्‍यावर कुरघोडी करणे"
"गं"ची बाधा दोघांनाही
अवघड हिते प्रश्न मिटवणे
रेशिमगाठी सोडवण्याची
ना इच्छा ना फुरसत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

सणासुदीला घरचे जेवण
अशात केंव्हा शिजले नव्हते
ऑर्डर देउन मागवलेले
टेबलवरती सजले होते
करून आग्रह वाढायाची
विसरुन गेली पध्दत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

व्हाल्वोमधले शिष्ट प्रवासी
असेच त्यांचे जणू वागणे
अजून होता एक मुसाफिर
मूल पोटचे गोजिरवाणे
गुन्हा नसोनी मुलाभोवती
हेळ्सांड घोंघावत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

गरीब होते जरी बालपण
माझे मजला होते प्यारे
प्रेमळ आई बाबाकडुनी
मला मिळाले लाख सितारे
त्यांच्या पंखातला उबारा
एकच माझी दौलत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहाटे प्रतिसाद लिहिला होता. कसा काय डिलीट झाला कुणास ठाऊक. Sad

कविता मस्त आहे. वृत्त छान सांभाळले आहे.

आवडली! Happy