तुज आठवते का काही...

Submitted by बागेश्री on 2 December, 2013 - 07:07

तुज आठवते का काही
मन गंध फूल झालेले
अन् उनाड माळावरती
प्रतिबिंब कुणाचे ओले?
तुज आठवते का काही....

कधि शब्द शब्द गाताना
मज सरगम उमगत जाते
मी तुझ्यात हरवत जातो,
डोळ्यांचे गाणे होते...
तुज आठवते का काही...

मी सुन्न सुन्न असताना
तव भास अनाहुत जगतो,
हे तुलाच सांगत जाता
हलके हलके मोहरतो
तुज आठवते का काही...

ही साद नसे बोलांची
हाती घे हात अता तू
मी जगून घेतो आहे
पापण्यात जे जपलेले
तुज आठवते का काही...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

मी सुन्न सुन्न असताना
तव भास अनाहुत जगतो,
हे तुलाच सांगत जाता
हलके हलके मोहरतो
तुज आठवते का काही...>>>हलकेच पुन्हा मोहरतो - असं वाचून बघीतलं आणि ते मला जास्त चपखल वाटलं

कधि शब्द शब्द गाताना
मज सरगम उमगत जाते
मी तुझ्यात हरवत जातो,
डोळ्यांचे गाणे होते...>>>>
सुरेख!!

छान लयीतली कविता! Happy

डोळ्यांचे गाणे ह्या कडव्यात डोळेच का हा प्रश्न पडला शब्दांचे का नाही ?

मी सुन्न खिन्न असताना ...अशी वाचली ओळ ..भास जगतो ऐवजी भास हसतो म्हणता आले असते का ?..हलकेच् पुन्हा मोहरतो बद्दल कविन +१

तुज आठवते का काही हा भाग प्रत्येक कडव्यानंतर चपखल पणे बसत नसल्याने दिला नसता तर अधिक सहजपणे पुढे पुढे सरकत जात असलेली दिसली असती कविता

शेवटचे कडवे अपने आपमे विस्कळीत वाटत आहे त्यामुळे कवितेला समर्पक समारोप मिळत नाही आहे असे वाटले

असो ...

जितूची बहुधा एक कवितेची ओळ होती ..'तुज आठवते का ताई'...अशी काहीशी ती आठवली

अर्थात कविता आवडली आहे म्हणून हिचा इतका विचार करतोय हे वेगळे सांगणे न लगे ना बागेश्री ? Happy

मला पण ऐकायची आहे ही...... रिया आणि मला एकत्र 'कॉन कॉल' वगैरे करून ऐकवलीस तरी चालेल.....

लै भारी आहे कविता !!

तुज आठवते का काही
मन गंध फूल झालेले
अन् उनाड माळावरती
प्रतिबिंब कुणाचे ओले?
तुज आठवते का काही....
मस्त ............... Happy

डोळ्यांचे गाणे ह्या कडव्यात डोळेच का हा प्रश्न पडला शब्दांचे का नाही ?
>>
आखें भी होती है दिलकी जुबाँन Wink

भास जगतो ऐवजी भास हसतो म्हणता आले असते का
>>
बहुदा नाही वैवकु, त्याने अर्थ बदलतोय..
इथे 'भास' जगत नाहीये... 'तो' तिचा भास जगतोय...
मला नीटसं सांगता येत नाहीये Uhoh
पण तीने जे लिहिलय ते पोहचलय. तुमचं जरासं वेगळं आहे!

चाल लावायचा किरकोळ प्रयत्न केलाय.
ऑफिसमध्ये, मोबाईलवर केलेले रेकॉर्डिंग आहे. जरा आवाज कमी व डिस्टर्बन्स असण्याचीही शक्यता आहे. तसेच स्वरसाथही नाहीये त्यामुळे फिकं वाटेल.... तरी देतोय.......

https://soundcloud.com/rasap/tuj-aathavte-ka-kahi

हे बघ रिया मी जे म्हटले ते तुला समजेल अश्या पद्धतीने तुला समजावून सांगणे हे माझ्या समजावून सांगण्याच्या क्षमतेच्या अगदीच पलिकडचे काम आहे हे मी जाणतो त्यामुळे समजावून सांगू शकत नाहीये त्याबद्दल क्षमस्व पण तुला जे समजले आहे ते मलाही समजलेच आहे तरीही मी भाष्य केले ते का केले हे मला पूर्णपणे समजते इतकेच तूर्तास तू समजून घे
बाकीचे तुला समजेल तेव्हा समजेल

धन्यवाद

रणजीत,
त्या स्पेशल इफेक्टसाठी धन्यवाद.. छान चाल आहे, आवाजही. Happy

रिया, थंड, रणजीत..
नक्कीच माझ्या आवाजात ऐकवते.

वैवकु
खरं सांगू तर, डोळ्यांचे गाणे, भास जगणे, हलके मोहरणे हे सारं एका तरलतेतून आलंय.. त्याला भेदून, ' ते तसं का' इत्यादी चिरफाड खरंचच करावी वाटत नाही आहे.. होप यू डोन्ट माईंड Happy

सर्व वाचक दोस्तांची आभारी आहे

मस्त कविता!

या तुमच्या कवितेवरून मला - ' तुला ते आठवेल का सारे. दवात भिजल्या जुई परि हे, मन हळवे झाले....' हे गीत आठवलं. Happy