एक बुद्धिप्रधान दु:ख ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 December, 2013 - 08:16

केवळ नशिबाने
सत्तेच्या माडीवर बसलेले
चार चाळींचे सरदार
ऐट मारू लागतात
आपल्या पदाचा
आणि
आव आणू लागतात
सर्वज्ञतेचा
तेव्हा उच्च शिक्षित
समाजातील
सर्वात बुद्धिमान वर्ग
मान घालून गर्क असतो
त्यांच्या प्रश्नांची
उत्तरे शोधण्यात
साऱ्याच ज्ञान सूर्यांना
लागते ग्रहण एकाच वेळी
अन काजवे तळपू लागतात
झुंडीझुंडीनी ...
हे मिंधेपण आले कश्याने
ग्रहण लागले कश्याने
म्हणून पाहू जाता
दिसतात ..
आपल्या एका हाताने
त्यांनी झाकलेले आपुले चेहरे
अन दुसरा हात
बांधलेला आपल्याच पोटाला..
त्यांचे बुड असते
अडकलेले
नोकरी नावाच्या हुकात
जे देत असते जरी
त्यांना वेदना सतत
मिंधेपणाच्या दु:खाने
अन आश्वासनही
रिटायर पर्यंत मिळणाऱ्या
नियमित पगाराचे
दाखवत स्वप्न
कधीहि न संपणाऱ्या
पेन्शनचे
त्या टीचभर पोटासाठी
अन वितभर सुखासाठी
ते करीत असतात
तीच ती खर्डेघाशी
स्वत: चे सूर्यपण विसरून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users