लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग २ - पहिली दाढ

Submitted by वेल on 30 November, 2013 - 00:10

लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग १ - http://www.maayboli.com/node/46367

*********************************************************************

साधारण साडेपाच सहाव्या वर्षी मुलांना पहिली परमनण्ट दाढ येते. खालच्या बाजूला पहिल्या पाच दातांच्या - दुधाच्या दातांच्या मागे.

ही दाढ सर्वात जास्त महत्वाची दाढ आहे. वाचणार्‍या सगळ्यांनी स्वतःची पहिली दाढ म्हणजे सुळ्यापासून मागे असलेली तिसरी दाढ जरा तपासून पाहा. ९५% वेळेला ह्या दाढेकडे दुर्लक्ष होतं आणि मग कीड साफ करून दाढ भरणे, रूट कॅनाल हे तरी करावच लागतं. अनेकदा ही दाढ खूप लवकर काढलेली असते.

ह्या मागचं प्रमुख कारण म्हणजे ह्या दाढेकडे गैरसमजातून झालेलं दुर्लक्ष. पालकांना वाटतं लहान मुलांचे दात पडून नवे येतात त्यातलीच ही दुधाची दाढ. असाच विचार आपण सुद्धा करताय का? थांबा. ही दाढ - सुळ्याच्या मागची तिसरी दाढ - खालच्या बाजूला साधारणपणे वयाच्या ६-७ वर्षामध्ये आणि वरच्या बाजूला वयाच्या साडेसहा ते साडेसात वर्षामध्ये येते. ती दाढ परमनंट दातांच्या सेट्मधली पहिली दाढ असते. ही दाढ कधीही स्वतःहून पडत नाही आणि तिथे नवीन दाढ येत नाही.

ही दाढ यायला सुरुवात होताना बर्‍याच मुलांना वेगवेगळा त्रास होऊ शकतो. ही दाढ खूप मोठी असते - २४-२५ मिमि इतक्या (मुळांसकट) उंचीची, आणि १.३ सेमीx.8mm एवढी मोठी दाढ हिरडीतून बाहेर येताना तिथे प्रज्ज्वलन (inflammation) जास्त असते. या प्रज्ज्वलनामुळे काही मुले खाण्याकडे दुर्लक्ष करतात. त्या बाजूने चावणे सोडून देतात. रोजचे जेवणदेखील सोडून देऊ शकतात. या प्रज्ज्वलनामुळे मुलांना ताप येऊ शकतो. साडेपाच -साडेसात ह्या वयात आपल्याला वाटले की आपले मूल किरकिर करत आहे, उगाच स्वतःची बोटे चावत आहे, व्यवस्थित खात नाही. तोंडात दुखण्याची तक्रार करत आहे तर मुलांना लगेच डेंटिस्टकडे न्यावे. त्यांना दाढ येत असल्याने प्रज्ज्वलन होत असेल. मुलांनी खाणे बंद केले तर मुलांना केवळ पातळ पदार्थ किंवा चावण्याची गरज नसलेले पदार्थ खायला देऊ नये. मुलांना चावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. पोळी भाजी वरण भात हे पदार्थ अगदी व्यवस्थित चावून खायला सांगावेत. त्यामुळे दाढ येताना कमी त्रास होतो. बरेचदा, दाढ येताना दुखते म्हणून मुले घास तोंडातच ठेवून देतात, त्यामुळे दात / दाढा किडण्याची वेगळीच समस्या तयार होऊ शकते. शिवाय पचनाचे त्रास्देखील होऊ शकतात. अशावेळी डॉक्टरांकडे सल्ल्यासाठी जावे.

चावण्याचा सर्वात जास्त भार ६०%, ह्या दाढेवर येतो. त्यामुळे ही दाढ सर्वात जास्त महत्वाची आहे. ह्यानंतरची दुसरी परमनंट दाढ ३५%चावण्याचा भार घेते. आणि तिसरी परमनंट दाढ म्हणजेच अक्कल दाढ ही ५% चावण्याचा भार घेते. त्यामुळे पहिली परमनंट दाढ चावण्याच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्वाची असते. ज्यांच्या पहिल्या परमनंट दाढा काढलेल्या असतात किंवा चाव्याच्या योग्य जागेत नसतात (malocclusion. occlusion means the normal spatial relation of the teeth when the jaws are closed) त्यांना जेवायला जास्त वेळ लागतो किंवा त्यांना पचनाच्या तक्रारी असतात.

ही दाढ जबड्याच्या वाढीसाठीदेखील खूप जास्त महत्वाची आहे. लवकर वयात ही दाढ काढली गेली ७ वर्षे - २१ वर्षे तर जबड्याची वाढ खुंटू आणि खुरटू शकते.

(दाताचे आत तीन भाग असतात. सर्वात बाहेरचा भाग म्हणजे इनॅमल - जो सर्वात जास्त कठीण भाग असतो. ह्या भागाला सेन्सिटिव्हिटि नसते. त्यातील आतला भाग डेंटिन - हा इनॅमल पेक्षा मऊ असतो. ह्या भागामध्ये नर्व्ह एन्डींग्ज असतात त्यामुळे तो सेन्सिटिव्ह असतो. ह्याच्या आतला भाग, जिव्हाळे म्हणजेच पल्प - ह्यात रक्तवाहिन्या आणि नसा (नर्व्हज) असतात.)

मुलांना दाढ येते तेव्हा दाताच्या पल्पची टोके (pulphorn) दाढेच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे ७-९ ह्या वयात दाढेत झालेला छोटासा खड्डा देखील खूप वेदना देऊ शकतो. ह्याशिवाय दाढेच्या नैसर्गिक खाचा खूप खोल किंवा पल्पच्या अगदी जवळ असू शकतात आणि दाढेचे सुळके त्यामानाने जास्त उंच असतात. ह्यामुळे ह्या खाचांमध्ये अन्नकण अडकून राहाण्याची शक्यता खूप वाढते. ह्याशिवाय उंच सुळक्यामुळे, खाचांमधून ब्रश करूनही खाचांमध्ये अडकलेले अन्नकण व्यवस्थित निघत नाहीत. याशिवाय नैसर्गिकरित्या खाचांमधले इनॅमल (इतर जागांच्या मानाने) पातळ असल्याने जास्त लवकर किडते आणि दाढेत खड्डा होतो. (कोणताही दात / दाढ ही तोंडात दिसायला लागल्यापासून लगेचच किडण्याला संवेदनाशील असते - prone/ susceptible to carries/decaying). त्यातल्या त्यात ही दाढ उंच सुळके, खोल खाचा आणि उंच पल्पटोके ह्यामुळे तोंडात दिसायला लागल्यापासून सहा महिन्यात सडणे ह्या अवस्थेला जाऊ शकते. (किडणे म्हणजे इनॅमल किंवा डेंटिन पर्यंत मर्यादित असलेली किड / खड्डा. ह्याचे निवारण दात भरणे हे असते. सडणे म्हणजे पल्पपर्यंत पोहोचलेली किड जिचे निवारण रूट कॅनाल किंवा दात काढणे हे असते. रूट कॅनाल मध्येदातातील पल्प काढून टाकावा लागतो आणि दात निर्जीव होतो.) त्यामुळे पालकांनी ह्या दाढेवर खास लक्ष ठेवून असायला हवे. दाढेच्या वरच्या बाजूला किंवा बाजू च्या भिंतीवर अगदी छोटासा काळा / चॉकलेटी डाग दिसल्यास (जो ब्रशने जात नसेल असा) तर लगेच डेंटिस्टला दाखवले पाहिजे. ह्या दाढा आल्या आल्या दाढांना सीलण्ट करून घेतल्यास दाढ किडण्याची शक्यता खूप कमी होते. याशिवाय दर चार - सहा महिन्यांनी मुलांचे दात तपासून घेतलेले चांगले. ह्यामुळे डोळ्याला न दिसलेला खड्डादेखील लक्षात येऊन दाताचे किडणे तिथेच थांबवता येते.

पहिली दाढ येते तेंव्हा तिची मुळे पूर्णपणे बंद झालेली नसतात (roots are not fused). मुळे पूर्णपणे बंद होण्यास तीन वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे त्याकाळात जर दाढेची किड पल्प पर्यंत पोहोचली तर त्या वयात त्यांचे रूट कॅनाल करता येत नाही. शिवाय लहान वयात एवढी मोठी दाढ काढताही येत नाही. तेव्हा त्या काळात ह्या दाढेची पल्पोटॉमी ही ट्रीटमेण्ट करावी लागते. (पल्पोटॉमी ह्या ट्रीट्मेंटमध्ये दाढांची मुळे नैसर्गिक पद्धतीने वाढू शकतात. ही तात्पुरती ट्रीट्मेण्ट असते.)

पहिली दाढ कमी वयात काढली गेल्यास अनेक दुष्परिणाम होतात.
१. जी पहिली दाढ काढली गेली असेल त्याच्या बाजूची दुसरी दाढ किंवा दुसरी उपदाढ (second premolar - tooth no 5) पहिल्या दाढेच्या जागी झुकू लागते आणि नैसर्गिक चावण्याच्या पद्धतीचे (Occlusion) नुकसान होते. ज्यामुळे चावण्याची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे पचनाचे त्रास उद्भवू शकतात.
२. जी दाढ काढली असेल त्याच्या विरूद्ध बाजूची दाढ त्या दाढेच्या दिशेने, स्वतःची नैसर्गिक जागा सोडून सरकू लागते. यामुळेदेखील नैसर्गिक चावा पद्धतीला अडथळा निर्माण होतो. सरकणार्‍या दाढेखालच्या हाडाची झीज होते. पुढे जाऊन ही दाढ हलून पडण्याची शक्यता वाढते. सरकणार्‍या दाढेच्या बाजूच्या दाढादेखील किडू लागतात.
३. ज्या बाजूची दाढ काढली गेली आहे, त्या बाजूने न चावता आपण दुसर्‍या बाजूने चावू लागतो अशाने जिथे चावले जात नाही त्या बाजूच्या दाढा किडतात आणि त्या भागात हिरड्यांचे आजार होतात.
४. ही दाढ काढल्यामुळे इतर दाढांवर आणि जबड्यांच्या स्नायुंवर जास्त ताण येतो आणि त्यामुळे डोकेदुखीचे प्रमाण वाढू शकते.
५. दाढा सरकायला सुरुवात झाल्याने दातांमधल्या फटीदेखील मोठ्या होतात. वाढलेल्या फटींमध्ये अन्नकण अडकण्याची शक्यता वाढते आणि ते दात किडण्याची शक्यता वाढते.

सारांश - सहाव्या वर्षी येणारी दाढ दुधाचा दात नसतो. त्यामुळे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, मला सुद्धा. मला खालच्या दोन्ही पहिल्या दाढा नाहित. वयाच्या पंधराव्या वर्षी काढल्या Sad

उपयुक्त माहिती
धन्यवाद.......!

खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण होतेय ही मालिका...
तुझ्या एवढ्या सविस्तर लेखानंतरही मला काही शंका आहेत. Happy
१) साधारणपणे मुलांचा डेंटल चेकअप कुठल्या वयापासून सुरू करावा?
२) दुधाचे दात सिलंट न करता निदान परमनंट दात येइपर्यंत सुखरूप आणि स्वच्छ कसे ठेवायचे (दोन वेळा घासणे, चूळ भरणे या बेसिक्स व्यतिरिक्त)
कारण अर्णवला खूप वेळा प्रात्यक्षिक करून दाखवलं पण तो ते पाणी पितोच. (तसंही मुलं आपल्याला संयम शिकवतात हेच खरं)
३) आता त्याला चौदा दात आलेत (वर चार आणि खाली दोन दाढा). दोन वर्ष पूर्ण होईल आता. वयानुसार योग्य आहे का?
४) त्याला दात खूप उशीरा यायला लागले (दहाव्या महीन्यात पहीला) दात उशीरा कशामुळे येतात? त्याचा पोषणाशी काही संबंध असतो का? आणि त्याचा दातांच्या आरोग्यावर काही परीणाम होऊ शकतो का?
५) दातांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात काय पर्याय सुचवशील? (सॅलड्स किंवा कॅल्शिअम वगैरे का?)
हे सरव पुढील लेखमालिकेच्या अनुशंगाने प्रश्न असतील आणि त्याची उत्तरे पुढे येणार असतील तर मी पुढच्या लेखांतून सविस्तर वाचेन.

पण धन्यवाद. दात खरं तर खुप सेन्सेटिव सब्जेक्ट आहे तरीही बर्‍याच वेळेस आळशीपणा किंवा अनवधानाने दुर्लक्षिला जातो. चेहर्‍याच्या सौंदर्याकडे आवर्जून लक्ष देताना दातांमुळे आणि निरोगी हास्यामुळे चेहर्‍याच्या सौंदर्यात भर पडते हे मात्र आपण विसरून जातो. त्यामुळे ही लेखमालिका लहान आणि मोठे दोघांसाठीही उपयोगी आहे.

१) साधारणपणे मुलांचा डेंटल चेकअप कुठल्या वयापासून सुरू करावा? - जर १ वर्ष पूर्ण होईपर्यंत दात आले नाहीत तर त्या दरम्यान करावा. मुलांच्या दातावर, दात घासूनही न जाणारे काळे, ब्राऊन, लाईट ब्राऊन, पिवळसर डाग दिसल्यास, लगेच दाखवावे. ही कॅव्हिटिजची सुरुवात असू शकते. कॅव्हिटिज अगदी सुरुवातीला समजल्या तर त्यांना फ्लोराईड अ‍ॅप्लिकेशन ने थांबवता येतं. कॅव्हिटिज फक्त दाढांवर होतात असे नाही तर दोन दातांच्या मध्ये किंवा दातांच्या समोरच्या भागावर देखील असू शकतात.

२) दुधाचे दात सिलंट न करता निदान परमनंट दात येइपर्यंत सुखरूप आणि स्वच्छ कसे ठेवायचे (दोन वेळा घासणे, चूळ भरणे या बेसिक्स व्यतिरिक्त)
कारण अर्णवला खूप वेळा प्रात्यक्षिक करून दाखवलं पण तो ते पाणी पितोच. (तसंही मुलं आपल्याला संयम शिकवतात हेच खरं)-- दाढा खूप उशिरा पडतात, त्यामुळे सीलंट न करणं ही खूप मोठी रिस्क आहे. कशाला घ्या? असो. तुला दोन वेळा नाही तर प्रत्येक वेळी खाल्ले की लगेच दात घासावे लागतील तरच दात पर्फेक्ट राहतील. मुलं वैतागतात. अर्णव तसा खूप लहान आहे, त्याला चूळ भरता येणे कठिण आहे, तिसर्‍या वर्षी जमू लागते.

दीड-दोन वर्षाच्या मुलाला दात घासणे / चूळ भरणे शिकवायचे कसे, यावर माझा अनुभव सांगते. वल्लरीने सांगितलेल्याशिवाय खूप काही वेगळे नाहीये, पण अनुभवले असल्याने हे खालचं सगळं खरंच काम करतं, म्हणून लिहितेय, तेव्हा वल्लरीची हरकत नसावी, असे वाटते.

१. रोज सकाळी आई/बाबांनी ते स्वतः दात घासताना मुलाला या ना त्या निमित्ताने समोर ठेवून दात घासा. त्या वयातल्या कुतूहलापायी त्यांना आपोआप स्वतः करून बघण्याची इच्छा होतेच. नाहीच झाली तर पालकांनी त्याला आवडेल अशा पद्धतीने 'दात घासणे कित्ती भारी' एवढे तरी वाटेल, अशा प्रकारे ते सादर करावे. तेव्हा बाळाला दात घासण्याविषयी नकारात्मक असे काही वाटण्याचा प्रश्न येतच नाही. नंतर ते नाही केले तरी हे सुरूवातीचे कंडीशनिंग नेहेमीच त्यांच्या डोक्यात असते.
२. सुरूवातीला नुसतेच ब्रशने दात घासायचे आणि फक्त बेसिनमध्ये सगळं थुंकता येते का, हा खेळ खेळायचा.
३. नंतर त्याला आई-बाबासारखी टूथपेस्ट हवी असते, मग त्याचा हळू हळू तोंडात फेस तयार होतो का, तो थुंकून बेसिनमध्ये आधीपेक्षा मोठ्ठा फेस झाला का, हा खेळ होऊ शकतो. दररोज ('सगळ्यात मोठ्ठा फेस करण्यासाठी' असली बालागणिक बदलणारी कारणं समोर ठेवून) आई/बाबाकडून शेवटी एकदा घासून घ्यावे'च' लागते, अशी सवय याच काळात लावावी. नंतरची डोकेदुखी कमी होते.
४. पालक+बालक 'ब्रशिंग टुगेदर' अधून-मधून(शक्य असल्यास रोज) करावे.
५. सुरूवातीच्या काळात जेव्हा शक्य असेल तेव्हा, पण सहजच सांगितल्यासारखे, त्याचे मित्रपण त्याच्यासारखेच रोज दात घासतात, हे आवर्जून दोन्ही मुलांसमोर सांगावे, त्यामुळे दोन्ही मुलांना अभिमानास्पद वगैरे पण वाटते. Happy
६. रोज एकाच रूटीनमध्ये आणि जमल्यास एका ठराविक वेळीच दात घासावेत.
७. चूळ भरण्यासाठी सुरूवातीला त्याला स्वतः चूळ भरून दाखवावी. मुलाला थुंकता येत असेल तर सहज जमेल, असे वाटते. दुसरं आम्ही केलं म्हणजे जेवण झाल्यावर, ताटावरून उठण्याआधी पिण्याच्या पाण्याने चूळ भरून ते पाणी पिऊन टाकायचे. दोन प्रकारच्या चूळ आहेत, हे बाळाला कळते: एक म्हणजे(चूळ) हातात नळाचे पाणी घेऊन चूळ भरून ती बेसिनमध्ये थुंकायची, आणि दुसरी म्हणजे(गुळणी) पेल्यात पिण्याचे पाणी घेऊन चूळ भरून ती गिळून टाकायची. या दुसर्‍या प्रकारच्या चुळीच्या सवयीचा फायदा प्रवासात होतो. तेव्हा दात घासता नाही आले तरी एखादे वेळी चालून जाते. पण यामुळे हे नक्की की दिवसातून किमान ७-८ वेळा चूळ भरण्याची प्रॅक्टिसपण होते. शिवाय चॉकलेट-आयस्क्रिम-मिल्कशेकसारखी गोष्ट बाहेर खाल्ली तरी नंतर पाणी पिण्याच्यावेळी नीट चूळ भरल्यामुळे दातांची निगा आपोआप राखली जाते.
८. फक्त कसलीही/कुणाचीही भीती घालून दात घासून घेऊ नये. प्रत्येक भीती कधी न कधी लोप पावते, तेव्हा त्याचा लॉन्ग टर्म उपयोग होत नाही. शिवाय दर वेळी नविन भीती शोधून ठेवावी लागते.
९. रात्री झोपताना बाळासोबत 'आज काय काय केलं'च्या गप्पा मारताना 'दात कसे/केव्हा/किती वेळा घासले' हे अगदी न चुकता सामावून घ्यावे. मुलांना खूप मज्जा वाटते आणि एखादे दिवशी त्रास दिलाच असेल तर त्याची कबुलीही ते देतात आणि दुसर्‍या दिवशी आपणहून दुरूस्त करतात.

त.टी: माझं बाळ नशिबाने गुणी कॅटेगरी आहे, त्यामुळे जरी मला हे(नं. ७ सोडून) करावे लागले नाही तरी याची मानसिक तयारी आम्ही केली होती. पण माझ्या आसपासच्या सगळ्या प्रकारच्या हूड-वात्रट-वगैरे पोरांना या साध्या गोष्टींनी फक्त १-२ आठवड्यात दात घासणे/चूळ भरणे जमण्यासाठी खूप फायदा झाला आहे.

धरा - ब्येश्टच.. ह्यातलं खूपसं आम्ही पण केलं. मस्त मुद्देसूद लिहिलं आहेस. मला नाही जमत बोवा असं मुद्देसूद लिहिणं. आपला भरपूर फापटपसारा.. मुद्दा ८ तर खूप महत्वाचा. भीती घालू नये. कोणत्याच गोष्टीची. बागुलबोवा, भूत, दाढीवाला म्हातारा, काळा राक्षस, पोलिस, डॉ, कोणाचीच, कोणत्याही कारणाने

माझ्या मुलिच्या तोंडाचा वास येतो मग मी तिला germs होईल ही भिती घालते
बाकी अजुन तरी चुळ गिळायची चालु आहे
मागच्य्या महिन्यात तिच्या समोर च्य दातांत एक काळा डाग दिसलेला आता नाहिये

चांगली माहिती देते आहेस वल्लरी.

इथे अमेरिकेत तिसर्‍या बड्डेपासून पिडियाट्रिक डेन्टिस्टकडे जायला सांगतात. दातांचं बरं-वाईट सर्टिफिकेट आणल्याशिवाय शाळेत घेत नाहीत. त्यामुळे पाचव्या वर्षी तर न्यावेच लागते. इथे ते सीलन्ट वगैरे काही लावायला सांगितलेले नाही, लावु देत नाहीत. पाचव्या वर्षापासून दोन्ही वेळेला दात घासण्यासोबतच फ्लॉसिंग करायला सांगतात. सहाव्या वर्षापासून दिवसातून दोनदा किड्स माउथवॉश वापरायला सांगतात. गरज असल्यास दहाव्या वर्षी ब्रेसेस.

आमच्या डेंटिस्टने सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर मग दात घासून शाळेत पाठवायला सांगितलं आहे. आम्हाला त्याची सवय नसल्याने ब्रेकफास्ट झाल्यावर गुळणा, फ्लॉस, माउथवॉश हे तिन्ही करण्याचा प्रयत्न असतो. रात्री झोपायच्या आधी दात घासून माउथवॉश. या व्यतिरिक्त अजून कुठलीही ट्रीटमेंट सांगितलेली नाही. आपण प्रत्येक खाण्यानंतर गुळणा करतो तसं इथे करत नाहीत/नसावेत असं माझं निरिक्षण आहे. ती एक अ‍ॅडिशनल सवय भारतीय मुलांना असते.

इथे शाळांमध्ये महिन्यातून एकदा डेंटिस्ट येऊन मुलांची तोंडं 'रिन्स' करून देते तो एक चांगला उपक्रम आहे माझ्या मते. आपल्या इथे सुद्धा असे उपक्रम शाळांनी राबवले पाहिजेत.

दोन अन दीड वर्षांची बाळं असलेल्यांनी जरा धीर धरा की.

दोन अन दीड वर्षांची बाळं असलेल्यांनी जरा धीर धरा की. >>>> हे अगदी मान्य. हा खरं तर पहिला मुद्दा हवा होता. इतक्या लवकर डोक्यावर बसण्याची गरज आहे का, हा विचार व्हायला हवा.
आमच्या बाबतीत, दाताच्या घासण्याविषयीच्या सवयींबाबत इथे(भारतात) बाकीच्या पालकांनी खूपच भीती घालून ठेवली होती आम्हाला. तसे आम्ही आजपर्यंत असल्या प्रेशरला कध्धी बधलो नाही आहोत. शिवाय आमच्या चिरंजीवांनी इतक्या सहजपणे सगळे केल्यावर आम्हालाच उगाच घाई केली की काय, असे वाटूनही गेले. पण आमच्या बाबाच्या कुटुंबाकडून दाताचे एकसे बढकर एक किस्से अनुभवल्यामुळे आम्ही उगाच उशीर झाला म्हणून घोळ नको, असा पवित्रा घेतला होता.

धारा मस्त पोस्ट.

इथे बालवर्गात डेंटल चेकप असतो. त्यातूनच मला मुलीच्या दंत आरोग्याचे स्टेटस व पुढे काय करायला पाहिजे ते समजले.

फ्लॉस पण चांगली सवय आहे. लहान मुलांसाठी बरोबर आहे कि नाही ते माहीत नाही. दंत आरोग्य हा
रोजच्या ग्रूमिन्ग चा एक भाग बनवला पाहिजे.

धारा सविस्तर आणि सगळेच मुद्दे नोटेबल!!
दोन अन दीड वर्षांची बाळं असलेल्यांनी जरा धीर धरा की. >>>> सिंडरेला, लेख वाचेपर्यंत धीर होताच, पण लेख वाचल्यावर फुग्यातली हवा जावी तसा सुटला... Happy

आमच्या घरी सध्या स्वतःलाच ब्रश करायचा असतो... स्वत:चे दात आणि आईचेही दात Happy

फ्लॉस पण चांगली सवय आहे>>>पण इथे २-३ डेंटिस्टनी सांगितले की फ्लॉस वापरू नका.दातातील फटी रुंदावतात.
नक्की काय?

फ्लॉसिंग ही खूप चांगली सवय आहे. केलीच पहिजे अशी. आपण दात घासतो तेव्हा दाताचे फक्त तीन सर्फेस साफ करतो. दोन दाताच्या फटीत दातांच्या भिंतीला लागलेला प्लाक ब्रशने किंवा चूळा बरून निघत नाही. आणि ते दोन सर्फेस तससेच राहतात आणि तिथेच कॅव्हिटी व्हायला सुरुवात होते. त्यासाठी फ्लॉसिंग अत्यावश्यक असतं.

फ्लॉसिंगचा वेगळा दोरा येतो जो पातळ पण स्ट्राँग असतो. त्याला वॅक्स कोटिंग असते. ते फ्लॉसिंगचे दोरेच फक्त फ्लॉसिंग करायला वापरावेत. भारतात ओरल बी कोल्गेट आणि पेप्सोडंट ह्या तीन कंपन्यांचे दोरे मिळतात. ते दोन दातांच्या मध्ये अगदी खालपर्यंत जातात. Y शेपचे फ्लॉस होल्डर्स मिळाले तर ते वापरावेत. फ्लॉसिंग खूप सोपं पडतं आणि सात आठ वर्षाच्या मुलांनाही करता येईल.

लहान मुलांच्या दातात वय सहा वर्षेपर्यंत नैसर्गिक फटी असतात कारण जबडा मोठा होत असतो आणि दात त्यामानाने लहान असतात. त्यांच्या दाताच्या फटी कधीच रुंदावणार नाहीत फ्लॉसिंगने,
दाताच्या फटी वाढायला खूप स्ट्राँग फोर्सची गरज असते. ब्रेसिससारख्या कायम फोर्सची. फ्लॉसिंगचे दोरे काही तेवढे स्ट्राँग नसतात शिवाय फ्लॉसिंगचा जोर दातावर फक्त काही सेकंदच असतो. तेव्हा न घाबरता फ्लॉसिंग सुरू करा.

आजकाल भारतातदेखील बर्‍याच शाळांमधून बालवर्गात डेंटल चेकप होतं. कमीत कमी मुलांना डेंटिस्ट कडे न्यायची गरज आहे का नाही ते तर नक्की समजतं. <<डेंटिस्ट येऊन मुलांची तोंडं 'रिन्स' करून देते>> हे मात्र इथे होत नाही. आपल्याकडे भारतात किड्स माउथवॉशदेखील वापरला जात नाही.

dreamgirl - अरे हे तर चांगलच की. त्याला तुझे आणी स्वत:चे दात घासू द, तू पण तेच कर. एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ.. घाबरू नकोस ग. फक्त त्याचे दात किडत नाहीत न एवढच बघ. आणि दात किडतील म्हणून त्याला चॉकलेट पासून इतर आया ठेवतात तसं लांब नको ठेवूस.

प्रिति - मुलीच्या तोंडाला वास येतो तर तो का येतो हे तिच्या डॉ.ला एकदा विचार ना. हवं तर डेंटिस्टला विचार. मुलांना भीती न घालता जेवढे काम होईल तेवढे चांगले.

सिंडरेला - तिथे मुलांच्या दाताला सीलण्ट लावू का देत नाहीत ही सांगितले बरे केले. हे असे का हे शोधण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.

आपण परंपरागत पद्धतीने सकाळी उठल्या उठल्या दात घासतो. पण ब्रेकफास्ट दुपारचे जेवण ह्या नंतर घासत नाही. खरे तर ब्रेकफास्ट दुपारचे जेवण ह्यानंतर दात घासणे जास्त महत्वाचे आहे. एक वेळ सकाळी उठल्या उठल्या दात घासले नाहीत तरी चालू शकेल. रात्री दात घासून झोपल्यानंतर आपण सकाळी उठेपर्यंत काही खात नाही. दातातला प्लाक निघून गेलेला असतो त्यामुळे उठल्या उठल्या दात घासायची गरज नसते. ब्रेकफास्टनंतर दातात अन्नकण अडकतात जे चूळ भरून जात नाहीत आणि तिथे सुरू होतो किटाणूंचा हल्ला.. हे होऊ नये म्हणून ब्रेकफास्ट दुपारचे जेवण ह्या नंतर दात घासणे महत्त्वाचे.

अनेकांना वाटतं ब्रेसेस फक्त दात चांगले दिसण्यासाठी वापरतात. पण त्यांचं खूप महत्व आहे दंत आरोग्यात आणि पचनाच्या दृष्टीने. ते पुढच्या लेखात.

देवकी, - एक गोष्ट स्पष्ट बोलते माफ करा. तुमचे डेंटिस्ट फ्लॉस करू नका सांगतात तर डेंटिस्ट बदला, कारण मला त्यांच्या इंटेंशनबद्दल आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल शंका येतेय. जर एखाद्याने ब्रशिंग फ्लॉसिंग करून दाताचे आरोग्य व्यवस्थित ठेवले तर त्याला वर्षातून एकदाच चेकप साठी किंवा फार फार तर क्लिनिंगसाठी डेन्टिस्ट कडे जायची गरज पडेल. मग डेंटिस्टचं घर कसं चालणार? (माझा नवरा डेंटिस्ट असून मी असं बोलतेय. आणी तरीही आम्ही सर्वांना फ्लॉसिंग करायला सांगतो. खरंतर एखाच्याच्या दाताचे क्लिनिंग करून झाल्यावर दात कसे घासावे, फ्लॉसिंग कसे करावे ह्यावर पाऊण तासाचे डिस्कशन करतो आणि ट्रेनिंग देतो. ) आणि एखाद्या डेंटिस्टला जर खरच असं वाटत असेल की फ्लॉसिंगमुळे दातात फटी वाढतात तर त्यांच्या ज्ञानाबद्दल शंका घ्यायला पूर्ण संधी आहे. तुमच्या त्या डेंटिस्टशी सहज गप्पा मारताना ते कोणत्या कॉलेज मधून डेंटिस्ट झाले आणि त्यांनी कॉलेज सोडल्यापासून किती वेळा "कंटिन्युड डेंटल एज्युकेशन" केले म्हणजे किती वेळा सेमिनार्स लेक्चर्स अटेंड केले ते जाणून घ्या. तुम्हाला कळेल डेंटिस्ट किती ऑथेंटीक आहे.

वल्लरी उपयुक्त माहिती आहे ..
माझा एक वेगलाच प्रोब्लम आहे मी कहीही आंबट नाही खाऊ शकत. माझे दात लगेच आंबट होतात व नंतर मी इतर काहीही खाऊ शकत नाही. आज काल तर आगदी टमाटर पण नाही खाऊ शकत. अस का होत असावं....
यावर कही उपाय

नविन यूझर आहे त्यामुळे भाशेचा खुप घोळ होतोय काही शब्द कापी पेस्ट केलेत आणि काही जमले तसे लिहीलेत

वल्लरी उर्फ वेल. रुट कॅनॅल जरुरी असतेच का? कारण माझ्या लहान भाच्याला ( वय ७) त्याच्या २ दाढा किडल्याने दुखत होते. डेन्टीस्टना दाखवले तर ते म्हणाले की हे दुधाचे दात पडुन नन्तर त्रास नको म्हणून जरुरी आहे. किड नर्व्हज पर्यन्त पोचल्याने रुट कॅनल जरुरी आहे. असे असते का? की सेकन्ड ओपिनीयन घ्यावे? प्लीज हेल्प.

ही मालीका चालू केल्याबद्दल लाखो धन्यवाद. कारण डोळ्यात अन्जन घातले गेलेय. आता मुलीची काळजी घेईन, भाच्याच्या अनूभवानन्तर.

रश्मी.. -

जर कीड मूळापर्यंत पोहोचली असेल तर ती कीड काढून टकण्यासाठी रूट कॅनाल करावेच लागते. मूल सात वर्षाचे म्हणजे ती दाढ तोंडात अजून ४ वर्षे तरी राहणार. त्यामुळे ती तिथे आरोग्यदायी अवस्थेत राहावी आणि दुधाच्या दाताखालील परमनंट दातांच्या कळ्यांना (फॉलिकल) त्या कीडीमुळे त्रास होऊ नये म्हणून हे करावे लागते. नाहीतर कीड पूर्ण पणे निघत नाही आणि त्याचा त्रास मुलांना वेगवेगळ्या प्रकारे होतो.

पण मी वर लिहिल्याप्रमाणे ही रूट कॅनाल थेरपी मोठ्यांच्या थेरपी पेक्षा वेगळी असते कारण नवीन दात येताना दुधाच्या दातांची मुळे नैसर्गिक रित्या लहान होत जातात.

उपयुक्त माहिती...धन्यवाद.

वेल, या लेखाच्या शेवटी पहिल्या भागाची लिंक सुद्धा देशिल का?

Pages