बेड्या

Submitted by निलेश_पंडित on 27 November, 2013 - 18:47

फारा वर्षांनी जेव्हां ती पुन्हा एकदा दिसली
जखम पुन्हा प्रणयाची नकळत ठणक्याने ठसठसली

शब्दही न बोलता मनांना गूज मनींचे कळले
अपूर्ण स्वप्नांचे तांडे अन् भविष्याकडे वळले

हस्तांदोलन झाले आणिक तिथेच खिळले हात
पुन्हा एकदा गुंतत गेली हृदये परस्परांत

देह्मनाच्या कुचंबणेने पित्त खवळले माझे
समाजातल्या रूढींचे मग फक्त वाटले ओझे

परवा जेव्हा पतीस अवचित तिच्या लागली ढास
जीव तिचा अवघा तळमळला जणू लागला फास

अंतर्मुख झालो आम्ही भानावर तेव्हां आलो
मलम लावले जखमांना अन् घरपरतीस निघालो

पतंग रंगित मोहक त्याला कणा चार काड्यांचा
मुक्त भरारीलाही शोभे पाश जरा बेड्यांचा

- निलेश पंडित

Group content visibility: 
Public - accessible to all site users