तू किती लपणार आहे शेवटी?

Submitted by मानस६ on 26 November, 2013 - 21:50

तू किती लपणार आहे शेवटी?
आरसा दिसणार आहे शेवटी..!

धाडसी गमज्या जरी मी मारतो..
नोकरी करणार आहे शेवटी !

चालु द्या, तुमच्या नृपांनो वल्गना!
राम ती वरणार आहे शेवटी!

शेवटी बघशील तू देवाकडे...
अन कुठे बघणार आहे शेवटी..?!

बांध रे बिनधास्त मजले आणखी..
वैधता मिळणार आहे शेवटी!

शेवटी उरतात वेडे मोजके..
मी तिथे रमणार आहे शेवटी

थांब ना थोडी, जरा प्रतिमेमधे..
रंगही भरणार आहे शेवटी

कोळसा आहे तरी, पाहून घ्या..
मी हिरा बनणार आहे शेवटी!

मी जरी नाकारतो मृत्यो तुला
सामना घडणार आहे शेवटी

शेवटी जगशील तू माझ्याविना,
मी कसा जगणार आहे शेवटी?

मी असो, वा हा दिवा खोलीतला
एकटा जळणार आहे शेवटी!

वेड हे परिपूर्णतेचे केव्हढे..!
व्यंगही हसणार आहे शेवटी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह काय एकसे बढकर एक शेर आहेत.
>>
शेवटी उरतात वेडे मोजके..
मी तिथे रमणार आहे शेवटी
......................... कहर!!

थांब ना थोडी, जरा प्रतिमेमधे..
रंगही भरणार आहे शेवटी
.............................. वाह!

छान!

शुक्रवारचा शेर Light 1
का खातोस इतरांची कवटी
मागव कॅटीनमधून शेव टी!

मस्त....