कागद आज म्हणाला..

Submitted by अनुराधा म्हापणकर on 26 November, 2013 - 02:33

कागद आज म्हणाला..

पूर्वी कसं ना, शाईतून
किती आपुलकी झरुन यायची
स्पर्श झाल्यासारखी अक्षरं
माझ्या अंगावर शहारुन यायची

शाई सुकलेली ती पेनं
किती उदास उदास वाटतात
चेकवरल्या सहीसाठी
जेमतेम फक्त ती उठतात

लिहित नाहीस तू हल्ली
की-बोर्डवर आपटतेस बोटं
"कागद" नावाचं आभाळ
तुला पडू लागलंय छोटं

बघ नं लिहून कधीतरी
अक्षरांची भरुदेत की जत्रा
वळणं गिरक्या रेषांच्या
वेलांट्या काना नी मात्रा

--
ऐकून वाईट वाटलं- म्हटलं -
आता लिहायलाच हवं काही
नेमकं सुचलं- तेव्हाच पण
पेनात सुकली आहे शाई

मनातले शब्द सुकायच्या आधी
पुन्हा टाईपच करुन ठेवलंय
आणि कागदभर लिहिण्यासाठी
पेन शाईने भरुन ठेवलंय

: अनुराधा म्हापणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users