तू आवडण्याला नव्हते काही कारण..

Submitted by रसप on 21 November, 2013 - 01:04

तू आवडण्याला नव्हते काही कारण
तू नावडण्याला देखिल नाही कारण

मी झुरलो प्रेमाच्या ह्या नजरेसाठी
उपकारालाही असेल काही कारण

साचला बर्फ भवताली आयुष्याचा
दे सुटकेसाठी एक प्रवाही कारण

जो योग्य ठिकाणी पोचवायचा रस्ता
आता चकवा देण्याला पाही कारण

लागावा पैसा तिज बघण्यासाठीही
बरबादीला मग मिळेल शाही कारण

तू कितीकदा येण्याचे टाळुन झाले
बघ सुचेल जाण्याचे आताही कारण

....रसप....
२१ नोव्हेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/11/blog-post_21.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रसप,

तू कितीकदा येण्याचे टाळुन झाले
बघ सुचेल जाण्याचे आताही कारण

व्वा.... सुंदर.

लय थोडी विचार करून लावावी लागत आहे ...

साचला बर्फ भवताली आयुष्याचा ..... म्हणजे या ठिकाणी वाटले तसे. पण ठीक आहे.

पुलेशु.

ही गझल फारशी आवडली नाही. कदाचित त्या मनस्थितीत मी याक्षणी नसेन, त्यामुळेही असेल!

चु भु द्या घ्या

शाही कारण भारी आवडले... आणि तिथपर्यंत एक व्याकरणशुद्ध, शुद्धलेखनाच्या चुका नसलेली, आणि अकारण अथवा अवास्तव सूट न घेतलेली (खरंतर काहीही सूट न घेतलेली) गजल वाचून खूप छान वाटले होते.
पण, (इतक्या छान) मक्त्यात "टाळुन" बघितले आणि थोडासा(च) रसभंग झाला.

बर्फ फारसा भावला नाही, चकवा आवडला... बाकीचे ठीक.

शेवटचा अप्रतीम आहे बाकी सर्व खयालात सहजता आहे पण शेर काफियानुसारी जाणवत राहत आहेत
माझे मत की "काही करण" ही रदीफ आणि असेल . नसेल . सुचेल ,मिळेल असे काफिये असते तर अधिक छान गझल बनून गेली असती

एकंदर गज़ल खास आवडली असे म्हणता येत नाही. लय अडखळते... म्हणजे प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे असेल.

<<<<तू कितीकदा येण्याचे टाळुन झाले
बघ सुचेल जाण्याचे आताही कारण >>>>

यावरून एक सुंदर द्वीपदी आठवली. मा.बो.च्याच कुठल्यातरी सदस्याची आहे

"होकार देण्यावाचून पर्याय उरलाच नव्हता...
लाजून झाले, सारे बहाणे सांगून झाले !!" Happy

तो शेर लिहिताना मनात कुठे तरी - 'जैसे तुम्हे आतें हैं न आने के बहाने' - वाजत होतं.

लयीबाबत........

'समिधाच सख्या ह्या त्यात कसा ओलावा
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा
जात्याच रुक्ष ह्या एकच त्यां आकांक्षा
तव आंतरअग्नी क्षणभर तरि फुलवावा
- कुसुमाग्रज'

ह्याची लय आहे.

साचला बर्फ भवताली आयुष्याचा
दे सुटकेसाठी एक प्रवाही कारण

सुंदर शेर आहे हा.

लागावा पैसा तिज बघण्यासाठीही
बरबादीला मग मिळेल शाही कारण

व्वा.. वा!

'चकवा' शेर- यात दोन कर्ते आहेत किंवा मग 'कारण' शब्द अनावश्यक आहे, असे काहीतरी वाटते. किंवा मला शेर समजला नसावा.

'चकवा' शेर- यात दोन कर्ते आहेत किंवा मग 'कारण' शब्द अनावश्यक आहे, असे काहीतरी वाटते. >>

ज्ञानेशदादा,

जो योग्य ठिकाणी पोचवायचा रस्ता
आता चकवा देण्याला पाही कारण

ह्या शेरात 'रस्ता' हाच कर्ता आहे ना?
अर्थ असा अभिप्रेत होता - 'पूर्वी रस्ता इतका सरळसाधा होता की तो स्वतःच योग्य ठिकाणी पोचवत असे. आता मात्र तोच रस्ता चकवा देण्यासाठी जणू कारणच शोधत असतो.'
नक्की काय गडबड झाली आहे, कळत नाहीये.. बहुतेक 'देण्याला'चा 'देण्यासाठी' असा अर्थ तुम्ही लावला नसावात किंवा तो तसा लावण्यात माझी चूक झाली असावी.

धन्यवाद !

बरोबर.. 'चकवा देण्याला पाही कारण' चा अर्थ मी 'कारण चकवा देऊ पाहते' असा लावला. माय मिस्टेक.
शेर समजला, आवडला.

मीपण सांगणार होतो पण ज्ञानेशजींस मी काही सांगणे त्याना आवडेल की नाही म्हणून गप्प बसलो मग उघाच त्यांना का दुखवा आधीच ते माझ्यावर रागावले आहेत असे वाटते मला माझ्या रचनेवर चुकूनही प्रतिसाद देत नाहीत ते पण निदान वाचत तरी नक्कीच असतील असे वाटते ..मी ह्या धाग्यावर काही बोललो असतो तर त्यांनी तेही बंद केले असते की काय अशी भीती वाटली म्हणून गप्पच बसलो मी Sad

साचला बर्फ भवताली आयुष्याचा
दे सुटकेसाठी एक प्रवाही कारण...वा !