लंबी जुदाई: रेश्माला श्रद्धांजली

Submitted by व्यत्यय on 19 November, 2013 - 06:17

हिंदी चित्रपट संगीतामध्ये विरह गीतांचं स्वत:च एक स्थान आहे. मिलना, तकरार, इकरार, जुदाई आणि शेवटी पुन्हा मिलन असा एक सरधोपट फोर्मुला वर्षानु वर्ष वेगवेगळ्या चित्रपटांना मसाला पुरवत आला आहे. विरह गीतांच्या मांदियाळी मध्ये मला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी विरहाची गाणी फार थोडी आहेत. तुफान गाजलेल्या हिरो चित्रपटा मधलं "लंबी जुदाई" हे त्यातलं एक गाणं. १९८३ सालच्या या चित्रपटाने जयकिशन श्रॉफला बॉलीवूड मध्ये स्थान मिळवून दिलं. त्याचा आधल्या वर्षी आलेला स्वामी दादा कोणाच्या लक्षात देखील आला नव्हता. सुभाष घई सारख्या शो-मन च्या जादुई स्पर्शाने अमिताभ बच्चनच्या ऐन चलतीच्या काळात देखील दोन अनोळखी चेहरे घेऊन बनवलेला हा पिक्चर दणकून चालला. लक्ष्मीकांत प्यारेलालच्या संगीताचा या पिक्चरच्या यशात सिंहाचा वाटा होता. "निंदियासे जागी बहार" किंवा "Ding Dong, O Baby sing a song" ही अतिशय प्रसन्न गाणी या पिक्चरमध्ये आहेत. त्यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहीन.

आनंद बक्षीचे साधेच पण अत्यंत समर्पक शब्द, L. P. च्या संगीताचा सुंदर ठेका आणि रेश्माचा हटके आवाज याचं जादुई मिश्रण "लंबी जुदाई" या गाण्यात आहे. गाण्याची सुरवातच रेश्मा आपला टिपेचा सूर लावून करते.

बिछडे अभी तो हम बस कल परसो..., जिउंगी मै कैसे इस हाल मे बरसो.....

हे शब्द रेश्माच्या वरच्या सुरात कानावर पडले की हमखास माझ्या छातीत धडधडायला लागतं. जिउंगी मै कैसे मधला "कैसे" रेश्मा असा काही आळवते की त्या शब्दांमधली हतबलता, व्याकुळता थेट काळजाशी जाऊन भिडते. ही गुणी गायिका राजस्थानच्या बिकानेर इथे एका भटक्या बंजारा कुटुंबात जन्मली. फाळणी नंतर तिचं कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झालं. रेश्माच्या सुंदर आवाजावर शास्त्रीय संगीताचे संस्कार होऊ शकले नाहीत. पारंपारिक लोकसंगीताचा ठसा मात्र तिच्या आवाजात पुरेपूर जाणवतो. हे लंबी जुदाई गाणं इतकं लोकप्रिय झालं की तिची "दमा दम मस्त कलंदर" आणि तत्सम सिंधी पंजाबी गाणी पण आवडीनं ऐकली गेली.

तारुण्याचे नव्हाळीचे दिवस, मनात नुकतीच उमलणारी प्रेम भावना यामध्ये डुंबत असतानाच जालीम दुनिया जेव्हा प्रेमात अडथळे निर्माण करते तेव्हा कधी कधी प्रचंड वैफल्य येतं. नैराश्यामध्ये सोडलेला एक उसासा हजार शब्दात सांगता न करता येणारी भावना व्यक्त करतो.

मौत ना आई तेरी याद क्यो आई... हाय.... लंबी जुदाई

या ओळीमधला "हाय" एखादाच सेकंद रेंगाळतो पण त्या क्षणार्धात तो आपलं काम अगदी चोख बजावतो. सारंगीच्या ताणलेल्या तारांवरती गज फिरवून आर्त आवाज निघावा तशी रेश्मा गातच असते. "बाग उजड गये......" लगेचच सूर बदलून हेच शब्द हताशपणे आळवले जातात

बाग उजड गये खिलने से पहले....पंछी बिछड गये मिलने से पहले...

हिरो पिक्चर मी पाहिलेला नाही. त्याची गाणी youtube वर सहज उपलब्ध असतानापण मला त्याचं चित्रीकरण बघायची अजिबात इच्छा नाही. Earphone कानाला लावून डोळे मिटले की एका विरहिणीचा आर्त आक्रोश मूर्तिमंत समोर उभा रहातो. तसं बघायला गेलं तर कुठल्याही तद्दन फिल्मी गाण्यासारखंच हे एक गाणं, पण रेशमाचा आवाज आणि लक्ष्मी प्यारेच अतिशय समर्पक संगीत या गाण्याला पुन्हा पुन्हा ऐकायला भाग पाडतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्त व्याकूळ विरहाची भावना पुरेपूर पोहोचवणारा बावनकशी आवाज. तिच्या आत्म्यास शांती लाभो!

हिरो पिक्चर मी पाहिलेला नाही. त्याची गाणी youtube वर सहज उपलब्ध असतानापण मला त्याचं चित्रीकरण बघायची अजिबात इच्छा नाही. संपूर्ण सहमती

'लंबी जुदाई' बद्दल लिहीलेल्या प्रत्येक शब्दाला अगदी अगदी. हे आणि जिहाले मिस्कीन मुकुन..जेव्हा रात्रीच्या शांततेत रेडिओवर लागतं तेव्हा आज आपल्यावर नक्कीच कुणीतरी खुश आहे असं वाटतं. Happy

अनुमोदन. .हे गाणं डोळे मिटुन ऐकण्यातच मजा आहे.. अक्षरश: डोळ्यासमोर सगळे गाणे तरळुन जाते आणी डोळेही नकळत पाणावतात.....

गप्पिष्ट , रेशमा भारतीय उपखंडाची गायिका होती. तुमचा हलकटपणा निदान या बीबी वर तरी दाखवू नका कृपया... तुमच्या या साळसूद प्रश्नामागचा विषारी फणा कोणता आहे हे इथे सर्वाना माहीत आहे....

रेश्माची निदान ६०-७० टक्के गाणी माझ्याकडे आहेत. फार पूर्वी नव्वदीच्या दशकात वेस्टन नावाच्या कम्पनीने रेशमाची एक कॅसेट काढली होती ती माझ्या संग्रहातून गेली. कम्पनी बन्द झाली . त्यातली गाणी कुठेही मिळत नाहीत. तू नळीवर नाहीत, नेटवर नाहीत्,पाकिस्तानातल्या म्युझिक कम्पनीच्या कॅटलॉग मध्यीही दिसत नाहीत. फारच हळहळ वाटते ती कॅसेट न जपल्याबद्दल.....

जेव्हा रात्रीच्या शांततेत रेडिओवर लागतं तेव्हा आज आपल्यावर नक्कीच कुणीतरी खुश आहे असं वाटतं. >>> संपूर्ण सहमत.

छान लेख Happy

आर्त व्याकूळ विरहाची भावना पुरेपूर पोहोचवणारा बावनकशी आवाज. तिच्या आत्म्यास शांती लाभो!>>>>>+१

आशुडीच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन. Happy

रॉबिनहुड
पाकिस्तान भारताला देत असलेली वागणूक बघता पाकिस्तानी कलाकार व खेळाडू तसेच सर्व नागरिकांवर बहिष्कार घालावा हे सर्व सच्च्या भारतीयांचे मत आहे. याउपर मला कोणताच वाद घालायची इच्छा नाही.

@ अ‍ॅडमिन
कृपया आपण रॉबिनहुड यांनी दिलेल्या शिवीगाळीकडे लक्ष द्यावे. आपल्या संदर्भासाठी स्क्रीनशॉट इकडे पोस्ट करत आहे.

RBHNOD.jpg

रेश्माचं गाणं हृदयापर्यंत पोहचतं. हे गाणं आणि त्यातली ती अजरामर बासरीची धून... अहाहा... चार चार वेळा रिपीट करुन हे गाणं ऐकलंय मी.