कोण तू आहेस माझी ??

Submitted by सुशांत खुरसाले on 18 November, 2013 - 02:54

तल्खली ,उन्हाळा ,कधीही न सुधारण्याची प्रवॄत्ती ,बारावी, सीईटी ,मॉक टेस्ट ,सभोवतालचं तिचं अस्तित्त्व आणि गझल!
जीवनाचा एक ॠतू असाही होता यावर आता विश्वास बसत नाही, पण तो तसा होता खरा ..वर उल्लेखलेल्या घटकांपैकी फक्त शेवटच्या दोन घटकांनी माझ्या त्या कालखंडातल्या जगण्याच्या इच्छा सतेज ठेवल्या आणि करपलेल्या अस्तित्वाला उन्हाळाभर पाणी घातलं.

"निकाल कधीये बारावीचा सोनु ?"

काळेभोर केस पुसता पुसता भर उन्हाळ्यात मनावर कोणी असं प्रश्नाचं पाणी शिंपडलं की छान वाटतं..!!

"हो ना खरंय्.."-मी

"हो ना काय हो ना??रिझल्ट कधीये रिझल्ट ??"

"निकाल कधीये ?" या प्रश्नाचं उत्तर "हो ना खरंय!" हे कुठल्याच दॄष्टीने होऊ शकत नाही ,हे मला तिने केस मध्येच जोरात झटकल्यावर कळलं ! तिने झटकले असतील केस पण माझं मनच भिजल्यासारखं वाटत होतं !

त्या क्षणाची धुंदीच अशी होती की, सर्वसामान्य प्रकारचे शाम्पू वापरूनही तिच्या केसांना एवढा भारी सुगंध कसा येतो ,या विषयावर समिक्षाग्रंथ लिहायला तयार होतो मी त्या क्षणी !

"बोर्डावाले म्हटलेत की तीस तारखेपर्यंत लावू रिझल्ट."
आता त्या प्रश्नाचं मी बरोबरच्या जवळपास जाणारं उत्तर दिलं .

"हो का; बरं रिझल्ट लागल्यावर पहिला पेढा मला हं."
असं तिनं म्हटल्यावरती "तू कोण लागतेस माझी ?" हे विचारायची हिंमत झालेली नसली तरी मनाचे सगळे कोपरे दणाणून सोडले या प्रश्नानं .....

"कोण तू आहेस माझी??"
--------

शिक्षणासाठी मी आजी-आजोबांकडे राहत होतो .पण माझ्या बारावीच्याच वर्षी मावशीचं लग्न निघालं आणि आता या गजबजाटात मी अभ्यास कुठे करावा,हा प्रश्न घरच्यांना (मला नव्हे) पडू लागला.तेव्हा कुठेतरी तात्पुरती दोन-चार महिन्यांसाठी भाड्याने खोली घेऊन राहावे आणि तेथे अभ्यास करावा ,असा भयंकर तोडगा घरच्यांनी काढला आणि मला स्वतःपेक्षाही एकांतवास जास्त प्रिय असल्यामुळे मी तो आनंदाने स्विकारला. जेवण आणि झोपण्यासाठी घरी येतच होतो..बाकी वेळ एकतर तिथे 'अभ्यास' करायचो, बाहेर उंडारायचो किंवा मग क्लासला जायचो .

तिची आणि माझी पहिल्यांदा औपचारिक भेट झाली तेव्हा बघितलं..तिच्या तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला होता .नुकतंच लग्न झालेलं.!
औपचारिक यासाठी की, त्याआधी तिला एकदोनदा तिला पाहिलं होतं .-आमच्या परसात फुलं तोडताना .
पाणीदार डोळे, गोर्या रंगावर खुलणारी लांबसडक वेणी, काहीसे लाजरे हावभाव...
आपण तिच्याकडे सारखं -सारखं पाहिलं तरी ती एक दोनदाच पाहणार, लगेच नजर सोडवून घेणार , चुटपुट लावून जाणार !!

मग आम्ही तिकडं नित्यनेमाने जाऊ लागलो 'अभ्यासाकरीता' .पाच सात दिवस झाले ,आम्ही नुसती तोंडओळख झाल्यासारखे वागत होतो एकमेकांशी ! बहुतेक दोघांच्याही स्वभावातला भिडस्तपणा कारणीभूत असावा त्याला .

संध्याकाळची वेळ. संक्रांतीचा दिवस. मी आमच्याच घरी बसलेलो होतो आजोबांसोबत्.तेवढ्यात ती आणि तिचा नवरा आले तिळ्गूळ घेण्यासाठी .मी आणि तिच्या नवर्याने एकमेकांकडे पाहून भुवया उडवल्या.
करावे लागतात असे नकली हावभाव समोरच्याशी आपली मामुली का होईना ओळख आहे हे दाखवण्यासाठी !त्यांनी आजोबांचे तिळगूळ घेतले .मी पेपर वाचायचं नाटक करत बसलो होतो..हो.नाटकच !

अशावेळी वातावरण जरा गंधाळल्यासारखं होतं ,काळ जरा हळू चालावा असं वाटायला लागतं...मलातरी !!
निघताना ती माझ्यासमोर आली ,हात पुढे करत म्हणाली ,"हॅपी सक्रांत !"
मला अपेक्षित नव्हतं ते..मी ताड्कन उभा राहिलो.."सेम टू यू.." कसंबसं म्हणालो .
तिच्या नवर्यानेही मग नंतर हेच केलं.

हाताला कसलंसं अत्तर लावलं होतं तिने ..थोडा वास माझ्याही हाताला लागलाच .त्यावेळी एकच प्रार्थना होती- "हा गंध र्‍हदयात जाऊ नये म्हणजे झालं !"

----------

सकाळीच आमचा पहिला सलाम व्हायचा .ती फुलं तोडायला यायची तेव्हा मी दात घासत असायचो तेव्हा किंवा मग ती सडा टाकत असायची तेव्हा .दिवसेंदिवस नवनव्या रांगोळ्या आणि नखरे मला पहायला भेटत होते.
कधी मी सकाळी क्लासला चाललो की, मुद्दाम गेट वाजवायचो .मग जमलंच तर ती हलकाच 'बाय' करायची. ही वाट पूर्णपणे चूक नसली तरी पूर्णपणे बरोबरसुध्दा नाही , हे जाणूनही या वाटेवर आनंदाने चालत होतो मी.

जेव्हा अभ्यासाच्या नावाखाली मी दिवसभर तिकडे बसायचो तेव्हा ती दोन चकरा तरी मारायची. कारणे वेगळी असतील कदाचित तिच्या येण्याची.

हळूहळू वरवरच्या ओळखीला गहिरेपणाचे रंग येऊ लागले.
"बरं जमतं रे तुला हे टॅन ,कॉट ??" असे काही अभासविषयक प्रश्न सुरुवातीला विचारले गेले तिच्याकडून .
" जमतं ना कामापुरतं." मी काही मोघम उत्तरे द्यायचो !

सुशांत चा 'सोनु' करण्याची आणि दुष्काळात पाऊस पाडण्याची कला तिला या काळातच जमायला लागली.

माझी परिक्षा आणि अभ्यास या आम्च्या चर्चेच्या मुख्य विषयापासून ते जगजितने गायलेली 'आहिस्ता आहिस्ता' गझल सोबत एकण्यापर्यंत आमच्या नात्याने प्रगती केली.

"शब्द-अर्थ काहीच कळत नाही रे, पण एकायला बेफाट वाटतं!!" हे तर तिचं या गझलेबाबत खास मत .

तिनंही तेव्हा कॉलेज जॉईन केलं होतं .तिथले काहीबाही अनुभव सांगायची .माझी आंघोळीविषयीची पराकोटीची अनास्था आणि चहाविषयीची अतिरेकी आस्था या गोष्टींवर आमची भांडणेही व्हायची !!

त्यांच्या घराला समोरून एक चायना गेट होतं .एकदा मी गेलो तेव्हा गेट बंद .मी उघडण्यासाठी आवाज दिला तर ती आली. मी पाहतच राहिलो. ती छानच दिसत होती . पण बहुतेक ती दुखावली गेली. मी असा काय विचित्र वागलो ,यामुळेच बहुधा!

मनाचा खेळ अजब आहे .ते प्रवाही असणं वेगळं आणि प्रवाहात वहावत जाणं वेगळं..मी दुसर्या आणि चुकीच्या मार्गाने चाललो होतो त्या वेळी.
मला एक अक्षर वाचवेना . सारखं वाटायला लागलो की, सालं फारच चुकलं आपलं.ती काही चिड्ली नसती ,बोलली नसती, पण उगाचच स्वतःला त्रास करवून घेतला असता तिने.

तेवढ्यात ती आली.
"सॉरी हं, ते मी मघाशी....." मी दिलगिरीच्या स्वरात बोलू लागलो.

माझं बोलणं अर्ध्यात तोडत ती म्हणाली, " यांना जरा फोन लावायचाय रे अर्जंट.माझ्या सेलमध्ये बॅलंस नाहीये . "

मी मोबाईल दिला.
बोलणं झाल्यावर तिनं दोन क्षण चक्क हसून पाहिलं माझ्याकडे..भर दुष्काळात धो-धो पाऊस पडावा तस्सा आनंद झाला मला .
आपण असेच का वागलो याचे स्वतःसहीत इतर होणालाही स्पष्टीकरण द्यावेसे न वाटणे म्हणजे प्रगल्भता !
मी अप्रगल्भ होतो स्पष्टीकरणे देत बसलो.. ती प्रगल्भ होती . शब्दांपलिकडचं ओळखणारी !
तिच्या कानातल्यांमुळे माझ्या मोबाईल स्क्रीनला पड्लेले चरे मी अजून जपलेत ..र्‍ह्दयावरचे जपलेत ते वेगळेच !!

मध्यंतरी तिचं चार पाच दिवस माहेरपण झालं. असे रिते क्षण भोगणं ,म्हणजे आपण त्या व्यक्तिला किती मिस करतोय ,हे तपासण्याची लिटमस टेस्टच जणू !ती इथं असल्यावर खिदळते, अनाकलनीय वागते, बर्याच गप्पा करते आणि त्या छोट्या गोष्टींचा आपल्याला आधार व्हायला लागलाय ,हे जाणवलं पुन्हा पुन्हा !पण बाकीची परिस्थिती बर्यापैकी प्रतिकूल असताना अशा एखाद्या गोष्टीमुळे क्षणभंगूर अनुकूलता का जाणवावी , याचंच मला कोडं पडत होतं .

नंतर ती परत आली . कुठेतरी जाताना मला दिसली . पण अभ्यासाला तिकडे गेल्यावर कळलं की, तिची कॉलेजात परिक्षा होती. च्यायला बेस्ट ऑफ लक पण नाही बोललो आपण सकाळी ती जाताना दिसली तेव्हा .तसा माझ्या शुभेच्छेने काही विशेष फरक नसता पडला पण ती मला नेहमी शुभेच्छा द्यायची म्हणून रुखरुख वाटली.
ती परत आल्यावर गेट उघडायला मीच गेलो आणि म्हणालो , "सॉरी ,बेस्ट लक म्हणायचं विसरलोच सकाळी!"
त्या क्षणी ती कशी हसली हे आती नक्की सांगता येणार नाही .कारण त्यावेळी माझे ठोके ७२-७४ च्या पार पुढे गेलेले होते.
मुळातच इतरांकडून अपेक्षा कमी ठेवणारे ते भाव होते. आपल्या जीवनव्यवहारातल्या एका क्षुल्लक गोष्टीची कोणी जाणीव ठेवतो आहे, यासाठीचा तो क्षणभंगूर आनंद असावा आणि असा विचार करणार्या सर्व स्त्रियांची ती प्रतिनिधीच वाटली मला.

मध्यंतरी भरगच्च पाहुणे येऊन गेले त्यांच्या घरी . माझ्या अवतीभवती फिरकणेही अवघड झाले तिला. तरी तीन चार फुटांवर ती असताना तिची चाहूल ओळ्खायचं शिकलो मी त्या काळात !

पाठ ना सोडीत माझी रुक्ष वारे एरवी
झुळुकही आली तुझी तर जखम ती करते किती !

आधी ती येत नाही म्हणून त्रास ,आल्यावर होणारी जखम वेगळीच !!

या पाहुण्यांच्या काळातच मी जेवायला घरी आलेलो असताना तिचा फोन आला की, मार्केटमध्ये सोबत येशील का म्हणून ?
आतुन तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या . नाही कशाला म्हट्लो असतो मी..
"घरातलं कोणी नाही येत का? मला जरा अभ्यास आहे आज !"-मी

प्रचंड धाकधूक !! काही गोष्टींना कितीही मनात असलं तरी एकदम हो नाही म्हणता येत ..त्यातलाच हा प्रकार होता.

"पाहुण्यांपैकी कुणाला कसं काय म्हणणार रे मी ??" -ती.

चला ..म्हणजे मी तरी पाहुणा नाही वाटत तिला ! अजून एक आनंदाची कळ उठ्ली र्‍हदयात .

"बरं आलोच मी ."
-----

कधी कधी सोबत खरोखर नकोशी वाटते . विशेषतः अशा वेळेला जेव्हा समोरच्या माणसाचं आपल्याशी असलेलं नातं एका विशिष्ट उंचीला पोचलेलं नसतं. अशा वेळेला मग उगाच तो शांततेचा बर्फ फोडा, त्या माणसाला आवडणारे किंवा उगीच काहीबाही विषय काढा आणि त्याचे एका संपूर्ण वेगळ्या विश्वातले विचार गपगुमान समजून घ्या , हे उद्योग बळ्जबरी करावे लागतात. बर्याच वेळा समोरच्यालाही कळतं की हे काहीच्या काही चालू आहे .

आणि हे माझ्यासारख्या माणसाला तर फार अवघड जातं ,जो घनगर्द ओळख असलेल्या माणसाशी सुध्दा लवकर बोलत नाही .
....तेवढ्यात मला आठवली तिची कालची रडवेली नजर आणि "थांब हिच्या बापालाच फोन करतो आता ",हे तिच्या नवर्याने उच्चारलेलं वाक्य.

आम्ही सोबत चालू लागलो .अपेक्षेप्रमाणे दहा-पंधरा पावले कोणी काही बोललं नाही .आता बर्फ फोडणे आवश्यक होते .पण हा शांततेचा बर्फ फोडून तिच्या डोळयातून पाणी वाहू लागेल याची मला जराही कल्पना नव्हती .

"काल काही प्रॉब्लेम झाला का??"-मी

"आता विचारतोयस??"

बाप रे बाप ..केवढं पाणी त्या डोळ्यांत्..जणू या क्षणासाठीच दाबून ठेवलेलं.

"सॉरी!!"

"अच्छा, म्हणजे स्वप्नांची नशा चढलेल्या तुझ्या डोळ्यांना इतरांच्या नजरेतलं पाणीही दिसू शकतं .
काल तुझ्यातला हा माणूस कुठे गेला होता ?"

"सॉरी ना ..मी विचारणारच होतो तुला येऊन्..पण विसरलो मित्राकडे गेल्यावर !"

"आणि मी एक वेडी जी तुझी वाट पाहत बसले "

स्वतःचा राग आला ..मला नेहमीच येतो त्यापेक्षा कैकपटीने जास्त !
"एवढा गझलेचा शेर एक ना.." म्हटलं की ती हवी तेव्हा येऊन दाद देणार , त्यांच्या घरात केलेला खास पदार्थ ती आवर्जून आपल्यासाठी ठेवणार , आपण शुन्यात पाहत बसलो की ती चारचारदा येऊन विचारणार ...आणि जेव्हा आपली तिला गरज असेल तेव्हा आपण तिला शब्दानेही विचारणार नाही??

आपली व्यक्त होण्याची वेळ आली की तिच्याशी व्यक्त करणार आणि तिला व्यक्त व्हावंसं वाटतं याची मात्र आपल्याला जाणिवच नाही !

परत येताना पुन्हा सॉरी म्हट्लो . मग तिचं ते दुष्काळात पाऊस पडल्यासारखं हसणं आणि मला नव्या चुकांसाठी संधी देणं ,या गोष्टी परत घडल्या.
आणि या ख्ररेदीदरम्यान 'खरेदी करताना बायका नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसतात की काय' हा एक नवा प्रश्न मला भेडसावू लागला.

क्र.म्.शः.

(चु.भू. द्या.घ्या.)

धन्यवाद !!

--सुशांत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स

धन्स

"कोण तू आहेस माझी??"<<<< मस्तच मिसराय !!!!
अख्ख्या लेखातच गझलियत जागोजाग पेरलीत अक्षरशः
अप्रतीम लिहिलेत . सध्यातरी सत्यघटना वाटते आहे
पुढील भागाच्या प्रतीक्षेत !!

शुभेच्छा !!

निशिगंध84 , वैवकु प्रतिसादाबद्दल आभारी आहे .

"कोण तू आहेस माझी??"<<<< मस्तच
मिसराय !!!!<<<क्या बात है ...सही पेहचाना !
शेर असा आहे
' मोडली मी वेस माझी
कोण तू आहेस माझी ?'

पुढील भाग लवकरच टाकण्याचा प्रयत्न करतो .

धन्यवाद ! Happy

सही पेहचाना !<< Happy अहो खुरसाले ,,,चोरांच्या वाटा ....!! Happy

पण शेर आवडला नाही फारसा

असे सुचले आहे ..
वाट का बघतेस माझी
कोण तू आहेस माझी

एक मिसर असा ....
गाव मी तू वेस माझी
Happy

धन्यवाद दाद ..तुमच्या प्रतिसादाने विशेष आनंद झाला .:)

शिवाय निवडक 10 मध्ये ज्यांनी हे लेखन घेतले , त्यांचे विशेष आभार ! Happy