मी तुला शोधीत आहे...उत्तरे मागायला

Submitted by जयदीप. on 17 November, 2013 - 23:43

टाकले जे घास त्यांनी, लागलो मी खायला
मी कुठे जाणार होतो, पंगती जेवायला

प्रश्न भांबावीत आहे, कालचा माझा मला
मी तुला शोधीत आहे, उत्तरे मागायला

तू नको येऊस आता, आठवांच्या त्या घरी
मी अता लाचार आहे... गाव ते सोडायला

का अवेळी जाग आली?..झोप ना लागे मला
पालवीचे स्वप्न माझे... लागले संपायला...

हाक माझी ऐकणारे, कान ते गेले कुठे
आव का बहिरेपणाचे लागले आणायला..?

का अता 'जयदीप' माझा, लागला तेवायला
शेर माझे लागले की..'पावली' मिळवायला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुश्श !! जमली बुवा एकदाची !!! Happy Happy Happy

तरीही संपायला हा काफिया कमी चपखल वाटला आणि मक्त्यात पावली का आली ते समजले नाही पावली ह्या रकमेशी संबंध आहे की दुसरा काही अर्थ आहे ?

जयदीप,

तू नको येऊस आता, आठवांच्या त्या घरी
मी अता लाचार आहे... गाव ते सोडायला
व्वा...
वरील दोन्ही ओळी वरकरणी स्वतंत्र वाटतात. मात्र, दोन ओळीतील संबंध समजल्यावर मजा येते.

पुलेशु.

तुम्हा दोघांचे धन्यवाद!!

Happy

पावली: संबंध रक्मेशी आहे... पावली..(४ आणे)... आज काल ४ आण्यात विशेष काही येत नाही... Happy त्यातच जेवढे काही मिळते...त्यावरून प्रोत्साहन घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करीत राहणे!!! Happy