पण मग.....

Submitted by कल्याणी कृपाल on 17 November, 2013 - 05:33

आवरलेही असते मी सैरभैर वार्‍याचे पसारे...
पण मग दवभरला गुलमोहोर मनभर सांडायचा कसा ?

घातल्याही असत्या शपथा मी मेघांना अवेळी न दाटण्याच्या
पण मग सात रंगाचा खेळ आकाशात मांडायचा कसा ?

शोधलाही असता मी मनाचा नकाशा कुठल्याशा पुस्तकात
पण मग रानभुलीचा मोहक शाप भोगायचा कसा ?

धाडल्याही असत्या मी तुझ्या सार्‍या आठवणी वेशीपार...
पण मग चंद्र माझ्या पापण्यांखाली भिजायचा कसा ?

घेतलंही असतं मी वागणं मापून-आखून सगळं...
पण मग चुकार कवितांचा संसार थाटायचा कसा ?
------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users