२६ नोव्हेंबर २००८

Submitted by सुधाकर on 27 November, 2008 - 08:44

काल सकाळी १०:३० वाजता, कुलाब्याच्या काश्मीर एंपोरीयम जवळच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज च्या परीक्षा केंद्रामधे फाईनेंसियल मार्केट चा पेपर देऊन बाहेर पडलो आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे चालत निघालो. आर बी आय च्या समोरच्या चिंचोळ्या वाटेने मुंबईकर चाकरमाने लगबगीने ऑफिस गाठायच्या बेतात भरभर चालत होते.
स्टेशन साठी रस्ता ओलांडताना कोपर्‍यावर उसाचा ठेला पाहिला आणि रस प्यायची हुक्की आली. पाच रुपयात इतका मोठा ग्लास भरून रस मिळतो तो ही अशा महागड्या ठिकाणी याचं कौतुक वाटलं. किती तरी दिवसांनी मुंबई मधे सकाळचे ऊन कोवळे भासत होते. गर्दीतुन वाट काढत स्टेशनचे मेन गेट समोर आलो व लोकल कडे जाण्यासाठी डावीकडे वळलो. तिथे तपासणी साठीच्या गेटवजा चौकटिसमोर आलो तर दोन्हीकडुन जाणारे आणि येणारे समोरासमोर येऊन थांबत आणि मग एकाच माणसाला जाता येणार्‍या त्या चौकटीतुन दोन ओळी करुन जात होते. त्या चौकटीवर तर दोन-तीन लाल दिवे लुकलुकत होते. दोन तीन हवालदार पलिकडे एका टेबलावर बसुन वेळ काढत होते. क्षणभर वाटले एवढ्या गर्दीत जर कुणाकडे जर स्फोटकं असतील तर काम अगदी सोप्पं आहे. कोणीही नाही इकडे लक्ष द्यायला....................
आणि काल संध्याकाळ पासुन सुरु असलेला थरार अजुन संपला नाही. एखादे भयानक स्वप्न पडल्यासारखा. अजुन ही स्वप्नातच असल्यासारखे वाटतय. सकाळी प्रवाश्यांनी व्यापलेले स्टेशन संध्याकाळी रक्तात सड्याने न्हाऊन निघाले होते. भयाने,वेदनेने सग़ळे आसमंत कोंदुन गेले आहे.
आणि त्या तिघा अधिकार्‍यांच्या बलिदानच्या बातमीने तर....
होत्याचे नव्हते झाले आहे.

सोलापुरात गेल्याच वर्षी झालेली घटना आठवली.
"कामटे साहेब त्यावेळी सोलापुर मधे होते. सांगली मधुन त्यांची बदली तिथे झाली होती. त्या रात्री त्यांनी कर्नाटकातील एका आमदाराला त्याच्या वाढदिवसाच्या रात्री १२ वाजता फटाके वाजविल्याबद्दल तिथे जाऊन 'शुभेच्छा' दिल्या होत्या(यासाठी नंतर विधानसभे पर्यंत रान उठविले गेले होते आणि काही महीन्यांनीच त्यांची मुंबईला बदली झाली होती). दुसर्‍या दिवशीच सकाळी पोलिस भरती होती. सगळी मुले रात्री घडलेल्या या घटनेची चर्चा करीत होती. जेव्हा त्यांची जीप पोलिस ग्रांउड वर भरती साठी आलेल्या मुलांमधुन वाट काढत येऊ लागली तेव्हा भारावलेले सगळेजण टाळ्या वाजवीत उठुन उभे राहु लागली. काही मुलांनी तर चक्क सॅल्युट ठोकला. रात्रीच्या प्रकाराचे कसलेही तणाव त्यांच्या चेहर्‍यावर नव्हते. साहेबांनी मग ड्रायव्हर ला गाडी थांबवायला सांगितले. काहिंशी हस्तांदोलन करुन तसेच पुढे निघुन गेले. 'काय डॅशींग माणुस आहे' मुलं कुजबुजत राहीली."

आणि हा कालपासुनचा प्रकार, अजुन अविश्चसनीय वाटतेय सगळे... झोपेतल्या भयानक स्वप्नातल्या सारखा. झोपेतुन उठल्यावर निदान घाम पुसत हायसे तरी वाटते. पण इथे हे स्वप्न कधी संपणार देव जाणे.

गुलमोहर: 

कामटे साहेबांची रजा नुकतीच पास झालेली होती. रविवार ची साप्ताहिक सुट्टी घेऊन १ डिसेंबर पासुन ते रजेवर जाणार होते. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी च्या धावपळीनंतर त्यांनी रजेचा अर्ज केला होता. पण त्याआधीच हे अघटित घडले.

देव त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना यांतुन सावरण्याची शक्ती!

तो आमदार रवी पाटील सोलापुरातील एक नामचीन गुंड आहे.
मुंबईत जशी अरुण गवळीची दहशत आहे तशी सोलापुरात रवी पाटील याची आहे. अशा खतरनाक माणसाला त्याच्या घरी जावुन जाब विचारायचे धाडस कामटे साहेंबाकडे होते.
अशा या महाविराला शतशः प्रणाम.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

शतशः प्रणाम....