श्रद्धांजली!

Submitted by नलिनी on 27 November, 2008 - 06:08

कालच रात्री बातमी कळाली की हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे याशिवाय इतर काही पोलिसांना अतिरेक्यांशी मुकाबला करताना वीरमरण आले.

बापरे! कोसाळायचेच बाकी राहिले. सगळच डोकं अगदी सुन्न झालं. काय काहिच सुचेना.
हेमंत काका आता हयात नाहित हिच कल्पना सहन होत नाही.

अगदी पहिल्यांदा त्यांना भेटलो ते सुनिताच्या घरी, तिने कोजागिरीसाठी काही महाराष्ट्रियन लोकांना बोलावले होते. तिथे त्यांची भेट झाली ती करकरे साहेब म्हणून. रंजना काकींनी त्यांच्याशी ओळख करुन दिली आणि तिथे कळले की, करकरे साहेब Indian Embassy चे visa counsellor आहेत.
त्यांचं पद, त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला मला अडसर वाटत होतं. पण माणुस म्हणाल तर अगदी दिलखुलास आणि सतत हसतमुख.

घरी आलो तरी वाटत राहिलं, आपण त्यांच्याशी बोलायला हवं होतं, आपण काय त्यांनी विचारलेल्या जुजबी प्रश्नांना उत्तरं देऊन आलो. त्यांना भेटण्याचे बरेच योग बाकी आहेत ते थोडे ना मला त्यावेळी माहित होते. पुढचा योग २-३ दिवसांनीच आला.
रंजना काकींनी आम्हाला घरी जेवायला बोलावले होते. घरी गेलो तर काकांनी सांगितले की आज करकरे पण येतायेत. केवढं दडपण आलं आम्हाला. काय बोलणार त्यांच्याशी. ते आपल्याशी बोलतील का पण? हा प्रश्न तर होताच.

थोड्याच वेळात करकरे आले. काका आमची ओळख करुन देऊ लागताच म्हणाले. ओळखतो मी यांना. काल परवाच तर भेटलो. जरा अवघडुनच बसलो होतो आम्ही. पण दोनच मिनिटात वातावरण अगदी हलकं झालं. एवढ्याच वेळात ते करकरे साहेबांचे करकरे काका झाले. दिलखुलास गप्पा झाल्या. कितीतरी कविता त्यांच्या तोंडपाठ. कविता, गाणी, पुस्तकं, लेखक, कवी, आमचं संशोधन क्षेत्र, कीतीतरी विषयांवर चर्चा झाली आमची. कुलकर्णी काका, रंजना काकी आणि करकरे काकांनी मिळुन बरर्‍याच कविता ऐकवल्या. त्यांनी आम्हाला त्यांच्या नागपुरच्या गमती जमती सांगितल्या.
पुढे काकांना भेटणे नेहमीचेच होऊन गेले. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटले त्यांच्याशी मराठीतुनच बोलल्याचे स्मरते. IAEA चे counsellor डॉ. राजन पटेल हे त्यांचे मुंबईपासुनचे मित्र. राजन अंकलशी बोलतानासुद्धा ते मराठीतच बोलायचे.

करकरे काकांनी भारतात परतण्यापुर्वी ईथल्या सगळ्या भारतीय विद्यार्थ्याना जेवणाचे आमंत्रण दिले होते. त्यांना त्यांचा ईथला नोकरीचा कालवधी संपल्यानंतर सुद्धा, एक की दोन वर्ष ईकडेच ठेवून घेण्यात आले होते. त्यामुळे ते एकटेच ईकडे आणि त्यांचा परिवार भारतात. एकट्याला जमेल अशी सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवलीच होती. शिवाय रूचिता आंटी, राजन अंकल, खन्ना आंटी हे सगळे मदतीला होतेच. मी आणि जय पण त्यांना थोडी मदत म्हणून जरा लवकरच गेलो होतो. येणार्‍या मुलांसाठी काय करु आणि काय नको असे काकांना होऊन गेले होते. अगदी जातीने कोणाला काय हवं नको ते पहात होते. सगळ्यांनी जेवायला घेतल्यावरच त्यांनी जेवायला घेतले. खुप गप्पा झाल्या.
राजन अंकलने आणि करकरे काकांनी म्हटलेले
बादल बिजली चंदन पानी
ऐसा अपना प्यार
लेना होना जनम हमे
कई कई बार
हे गाण मी रेकॉर्ड करुन घेतलेलं.

एकीकडे ही उच्च पदावरची मंडळी आणि एकीकडे विद्यार्थी दशेतले आम्ही, पण तिथले वातावरण म्हणाल तर एक परिवार असावा असेच वाटत होते. सगळेच विद्यार्थी काकांच्या स्वभावाने आणि व्यक्तिमत्वाने भारावुन गेलेले. निघताना मला म्हणाले केवढी मदत केलीस, तुझे आभार कसे मानायचे?
काकांच्या घरात, हृदयात जागा मिळाली, तिथे आभाराची गरजच काय?

काकांना इकडुन निघायचे होते त्याच्या ३ दिवस आधी त्यांचा फोन आला, तुम्हाला दोघांना वेळ असेल तर मला Embassyत भेटायला येता का म्हणून विचारले. तासाभरात आम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये होतो. आम्हाला दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, त्यांची आठवण म्हणून मला एक जरीकामाची लेडीज पर्स दिली आणि जयला एक बटवा दिला. जडांतकरणाने पुन्हा नक्की भेटु म्हणून आम्ही त्यांचा निरोप घेतला.

भारतात गेली त्यावेळी त्यांना भेटायचे म्हणुन गेले होते. चंपकची पण त्यांना भेटण्याची इच्छा होती त्याची ही भेट घालून द्यायची होती. काकांच्या तिथल्या कामच्या व्यापाने काही त्यांना भेटण्याची वेळ घेता आली नाही. त्याच दरम्यान त्यांचा व्हिएन्नाला एक दौरा झाला आणि कुलकर्णी काकांकडे जयची भेट झाली. म्हणतात प्रत्येक गोष्टीला योगच यावा लागतो.

काल रात्री कुलकर्णी काकांचा भारतातून हेच सांगायला फोन आलेला. काकांचा फोन झाल्यावर ईथल्या United Nation मधल्या तसेच Embassyतल्या काही लोकांना संपर्क केला. ही बातमी केव्हाच व्हिएन्नात येऊन पोहचलेली. कुणाचे म्हणून अश्रू थांबत नव्हते. काकांच्या आमच्या परिचयातले सगळेच शोकसागरात डुबलेले. कालची रात्र डोळ्याला डोळा म्हणुन लागला नाही. मुंबईची झालेली अवस्था, मृतांची वाढत चाललेली संख्या, शहिदांच्या यादी आपल्याच ओळखीच्यातल्यांची नावं, काही काही ऐकवत किंवा पहावत, वाचवत नाही.

यापुढे आठवडाभर तरी मी CNN, BBC पहाणार नाही आणि एकही पेपर वाचणार नाहीये.

वीरमरण आलेल्या अधिकार्‍यांना, पोलिसांना तसेच ह्यात बळी पडलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते.

गुलमोहर: 

तुमची अवस्था समजण्या सारखी आहे, हाच अनुभव सर्व ठिकाणचा आहे. माझ्या सारख्या कधीही न भेटलेल्या व्यक्तीला यातना होत आहेत, तुम्हाला तर त्यांना जवळून बघण्याचा योग आला.

मी पण तुमच्या सारखाच बातम्या बंद करायचा निर्णय घेतला होता, पण मग कामतही लक्ष लागत नाही, हे पण नाही आणि ते पण नाही करता येत. शेवटी आता मनाची तयारी करुन ठेवावी.

धारातिर्थी पडलेल्या सर्व विर जवानांना माझी आदरांजली.

नलिनी... Sad तुझे सांत्वन तरी कसे करायचे गं.. Sad

नलू.... काय लिहावं तेच सुचत नाही.

खरच ग नलु, हे वाचुन अंगावर काटा आला. सांभाळ स्वतःला.

काय लिहायचे यावर... Sad

आपण किती दुर्दैवी आणि लाचार आहोत हे पदोपदी जाणवतय.... Sad

त्या सर्वांचं वीर मरण वाया न जावो !!! योग्य ती शिक्षा योग्य वेळी अतिरेक्यान्ना मिळो..
सर्वांना शांती मिळो.
-------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

एक नवीन बातमी, नुकतेच नरेंद्र मोदी यांनी शहीद करकरेसाहेब आणि साळसकर साहेबांच्या कुटुंबीयांना भेट दिली. त्यानंतर मोदींनी शहीदांच्या कुटुंबियांना गुजरात सरकार तर्फे एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

पण करकरे साहेबांच्या कुटुंबीयांनी ही मदत घ्यायचे नाकारले.
धन्य ते करकरे साहेब आणि धन्य त्यांचे कुटुंबीय. या सर्वांना शतशः प्रणाम.

http://www.ndtv.com/convergence/ndtv/mumbaiterrorstrike/Election_Story.a...

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

नलिनी
भाग्यवान आहेस. करकर्‍यांच्या आवाजातलं गाणं तुझ्याकडे आहे!
किती दुर्दैवी आहोत आपण ....असे वीर हकनाक धारातीर्थी पडतात!
खरंच आणि मदत नाकारणारे त्यांचे कुटुंबीय धन्य आहेत.
त्या सर्वांना आदरांजली.