तिथे थांबणे रास्त संगनमताने

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 November, 2013 - 01:48

किती सार्थ तक्रार केली उन्हाने....
'निशा ग्रासते चांदव्याच्या ज्वराने'

बदलत्या ऋतुंना कुणी जाब मागा
अशी मीच वागू किती संयमाने ?

जसा वाटतो तो, नसावा तसा तो...
तुला राग येतो नि जातो कशाने ?

उतरल्या मनातील संदर्भ सारे
विचारात घ्यावेस चढत्या क्रमाने

जसे वागले ते, तसे वागले मी
तरीही विपर्यास केला जगाने !

जिथे पायवाटेस फुटतात फाटे
तिथे थांबणे रास्त संगनमताने

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बदलत्या ऋतुंना कुणी जाब मागा
अशी मीच वागू किती संयमाने ?

उतरल्या मनातील संदर्भ सारे
विचारात घ्यावेस चढत्या क्रमाने<<<

मस्तच शेर आहेत.

मस्तssss झालीये... ट्टॉक्क!!
बरेच शेर आवडलेत...

उतरल्या मनातील संदर्भ सारे
विचारात घ्यावेस चढत्या क्रमाने>>> वाहव्वा

वा! अत्यंत सुंदर गज़ल!!

<<< बदलत्या ऋतुंना कुणी जाब मागा
अशी मीच वागू किती संयमाने ?

उतरल्या मनातील संदर्भ सारे
विचारात घ्यावेस चढत्या क्रमाने

जिथे पायवाटेस फुटतात फाटे
तिथे थांबणे रास्त संगनमताने >>> या द्वीपदी खूप आवडल्या.

मत्ल्यावरून माझी एक द्वीपदी आठवली. सांगण्याचा मोह आवरत नाही :--

"यंदा वसंत आला, आला तसाच गेला.....
मी चांदणे उन्हाचे, अंगावरी सजवतो !"

मध्येच लुडबूड केल्याबद्दल क्षमस्व.

किती सार्थ तक्रार केली उन्हाने....
'निशा ग्रासते चांदव्याच्या ज्वराने'

बदलत्या ऋतुंना कुणी जाब मागा
अशी मीच वागू किती संयमाने ?

जिथे पायवाटेस फुटतात फाटे
तिथे थांबणे रास्त संगनमताने

वा वा ..अगदी अफाट!!
Happy

अख्खी गझलच झक्कास....
प्रत्येक शेर, प्रत्येक मिसरा...प्रत्येक शब्द...झक्कास...

खूप खूप आवडली...

धन्यवाद....!!!

गझल ओके वाटली.

संगनमताने हा शब्द जनरली निगेटीव्ह अर्थाने वापरला जातो. या शेरामध्ये तो समर्पक वाटला नाही.

बदलत्या ऋतुंना कुणी जाब मागा
अशी मीच वागू किती संयमाने ?

जसे वागले ते, तसे वागले मी
तरीही विपर्यास केला जगाने !

अप्रतीम ....

सुधीर

जिथे होत मतभेद, फुटतात फाटे
तिथे थांबणे रास्त संगनमताने

-

असे एक सुचले. कृ गै न! हा दुरुस्तीचा सल्ला वगैरे नाही.

नचिकेतशी सहमत आहे.

दुर्दैवाने आंतरजालावर प्रकाशित केलेल्या साहित्यावर सगळ्याच साहित्यकारांची एक झटपट तयार झालेली अनावश्यक ठाम भूमिका असते जिच्याद्वारे असे मुद्दे लीलया खोडता येऊ शकतात किंवा दुर्लक्षिले जातात.

खरे चिंतन होत असल्यास त्या त्या लेखकाला फायदा होत असेल कदाचित.

सर्वांचा दर्जा उंचावो हीच प्रार्थना.

<<<जिथे होत मतभेद, फुटतात फाटे
तिथे थांबणे रास्त संगनमताने>>>>

वा ! आवडलीच सुचवणी, बदल करतेय बेफिजी , धन्यवाद!

नचिकेत,

<<<संगनमताने हा शब्द जनरली निगेटीव्ह अर्थाने वापरला जातो. या शेरामध्ये तो समर्पक वाटला नाही.>>>>

माझे बाबा नेहमी म्हणत की कुठल्याही मुद्यावर नुसता वितंडवाद घालण्यापेक्षा एकत्र बसून, सविस्तर चर्चा करून संगनमताने काय तो निर्णय घेवू . Happy

इथेही तो याच अर्थाने घेतला गेलाय.

<<<<दुर्दैवाने आंतरजालावर प्रकाशित केलेल्या साहित्यावर सगळ्याच साहित्यकारांची एक झटपट तयार झालेली अनावश्यक ठाम भूमिका असते>>>> अगदी, अगदी !

जिच्याद्वारे असे मुद्दे लीलया खोडता येऊ शकतात किंवा दुर्लक्षिले जातात>>>>>

विदिपा मागच्या गझलेच्या धाग्यावर तुम्ही बदलेला अभिप्राय लक्षात आलाय माझ्या,

'जाब घेणे, जाब देणे' दोन्ही प्रकारात जाब हा शब्द वापरता येत असावा. (वै.म.)

विलंबाबाबत दिलगीर आहे.

-सुप्रिया.

दुर्दैवाने आंतरजालावर प्रकाशित केलेल्या साहित्यावर सगळ्याच साहित्यकारांची एक झटपट तयार झालेली अनावश्यक ठाम भूमिका असते जिच्याद्वारे असे मुद्दे लीलया खोडता येऊ शकतात किंवा दुर्लक्षिले जातात.

>> सहमत! याचसाठी हल्ली मी फार हात राखून प्रतिक्रिया देतो किंवा द्यायलाच आपणहून जात नाही... फक्त वाचत असतो. भारंभार मिळणार्‍या चांगल्या प्रतिक्रियांपुढे त्यांना छेदून जाणार्‍या केवळ प्रतिक्रियाच नव्हे तर प्रतिक्रिया देणाराही शेवटी ब्लॅक लिस्टेड होतो हा माझा स्वानुभव आहे. नकारात्मक प्रतिक्रिया सहजी स्वीकारल्याही जात नाहीत. (अगदीच ईलाज नसेल तर मग स्वीकाराल्या जातात). माझ्या मते हल्ली लिखाणाच्या प्रकारापेक्षाही 'स्वतःला व्यक्त करणे' हाच मुख्य गाभा झालेला असल्यामुळे (जो स्वागतार्हही आहे) 'प्रकारावरून' आलेल्या प्रतिक्रिया खेळीमेळीने घेतल्या जात नाहीतच, पण व्यक्त होतानाही नेमके शब्द वापरले न गेल्यामुळे मग 'जे लिहिलंय तेच बरोबर आहे' असा पवित्राही घेतला गेलेला दिसतो. पण 'व्यक्त होणे' हे अधिकाधिक नेमके होण्यासाठी शब्दांचं, विरामचिन्हांचं मोल खूप आहे खरंतर!

सुप्रियांच्या या रचनेवर हा वरचा पॅरा अवांतर (आणि कदाचित असंबद्धही) आहे, पण विदिपांच्या त्या जनरल वाक्यामुळे जनरल 'व्यक्त' व्हायला मला संधी मिळाली म्हणून लिहिलं Wink

माझे बाबा नेहमी म्हणत की कुठल्याही मुद्यावर नुसता वितंडवाद घालण्यापेक्षा एकत्र बसून, सविस्तर चर्चा करून संगनमताने काय तो निर्णय घेवू .
>> ओके.
(मला तो वरचा प्रतिसाद टायपायला बराच वेळ लागला, तेवढ्यात तुमचं उत्तर आलं)

अवांतराबद्दल धन्यवाद नचिकेत पण ते इथे या धाग्यावर देण्याच काही खास उद्दिष्ट माझ्या गझलेशी व्यक्तीशः संबधीत नसेल तर आपल्या अश्या व्यक्त होण्याच स्वागतच राहील. Happy

-सुप्रिया.

कुठली भावना कशी व्यक्त करायची; कुठला शब्द कुठे वापरायचा हा वैयक्तिक निर्णय असला तरीही---

"जिथे पायवाटेस फुटतात फाटे
तिथे थांबणे रास्त संगनमताने"

या ओळींनी तो मतितार्थ प्रकट होतो तो

"जिथे होत मतभेद, फुटतात फाटे
तिथे थांबणे रास्त संगनमताने"

या ओळींमध्ये ठळक (बटबटित) होतो; आणि म्हणूनच तो फारसा भावत नाही.

चुभूदेघे Happy

ही मतमतांतरे वगैरे मोस्टली एखाद्या गोष्टीकडे पाहण्याच्या भिन्न व व्यक्तिगत दृष्टीकोनातून /त्याच्या सवयीतून निर्माण होतात
संगनमत हा शब्द मला तरी तितकासा निगेटिव्ह वाटत नाही
गझल छानच पण काहीतरी मिस करतोय मी अनेक शेरांत ज्यामुळे अप्रतीम असे म्हणत नाही आहे
पण सर्व शेर आवडलेच
धन्स

<<<<बदल केलेल्या शेरानेही संगनमत शब्दाचा अर्थ पोहोचत नाही आहे सुप्रिया.>>>

तो पोहोचण्यासाठी शेर बदलला नाहीय बागेश्री , शेर थेट होण्यासाठी बदललाय.

संगनमत हा शब्द फक्त निगेटीवली वापरला जातो या मताशी मी असहमत आहे .

-सुप्रिया.

हा हा हा बेफिजी ! सहमत Happy

संगनमत (p. 808) [ saṅganamata ] n A confederacy, combination, alliance, league; a compact of coöperation or of mutual support.

http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/

http://marathibhasha.com/
परिभाषा कोश | मराठी भाषा
marathibhasha.com

माझ्यामते पेपर/ कादंबरी/सिनेमा/ आणि कायदा .. ह्यात हा शब्द वारंवार .. संगनमताने गुन्हा केला असा वापरल्यामुळे ...त्याला निगेटिव्ह शेड वाटते इतकेच

चु भू दे घे

-सुप्रिया.

माझ्यामते पेपर/ कादंबरी/सिनेमा/ आणि कायदा .. ह्यात हा शब्द वारंवार .. संगनमताने गुन्हा केला असा वापरल्यामुळे ...त्याला निगेटिव्ह शेड वाटते इतकेच<<<

हम्म्म्म्म्म्म

अ‍ॅक्च्युअली, निगेटिव्ह गोष्टी केल्या गेल्यावर त्या संगनमताने केल्या गेल्या असे छापण्यात आल्याने त्या शब्दाला नको तो सेन्स अ‍ॅटॅच झालेला असावा. नक्की माहीत नाही.

संगनमत आणि एकमत यात जो फरक आहे ते त्यामागचं कारण असावं. संगनमत होत नाही, करावं लागतं - आणि सहसा काहीतरी व्हेस्टेड इन्टरेस्ट असल्याशिवाय ते करण्याची मानवी वृत्ती नसावी. म्हणून ती निगेटिव्ह शेड. Happy

<<<या ओळींमध्ये ठळक (बटबटित) होतो; आणि म्हणूनच तो फारसा भावत नाही.>>>>

शरदजी आपले मतही एकाअर्थी पटतय मला पण शेर थेट व्हावा हा बदलण्यामागचा माझा हेतु आहे.

धन्यवाद !

-सुप्रिया

मला वाटतं सुप्रियाताई, की आधीच्या शेरातून भाव पुरेसा प्रकट होत होता ... त्या शेराला स्वतःच एक वलय होतं . असो ! शेरात आपण बदल केलाय अधिक थेट होण्यासाठी ते ठीक आहे .पण पहिलं impression मलातरी मिस झाल्यासारखं वाटलं.

गैरसमज नसावा . Happy

Pages