इतकी घाइ कशासाठी?

Submitted by मयुरा on 13 November, 2013 - 00:28

त्याने सिग्नल मोडला. तो जोशात आणि वेगात पुढे सरकला. तेवढ्यात त्याच्या कानावर पोलिसाची शिट्टी पडली. तो थांबणार नव्हताच; पण पोलिसाने त्याच्याही पुढे आपली गाडी घातली आणि त्याला थांबणे भाग पाडले. तो नाखुशीतच थांबला. तेवढ्या काळात त्याने खिसाही चाचपला. पोलिसाला शंभराची नोट द्यायची तयारी झाली होती त्याची. पोलीस जवळ आला. त्याच्या हातात त्याने कोर्टाच्या आणि दंडाच्या पावतीऐवजी एक पत्र ठेवलं. त्या पत्रातील मजकूर असा होता...
‘या पत्राच्या पाठीमागे जो फोटो आहे तो माझ्या मुलीचा आहे. जी काही दिवसांपूर्वी शाळेतून घरी चालली होती. सायकलस्वार असूनही ती वाहतुकीचे सगळेच नियम पाळायची. त्या दिवशीदेखील हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरच ती पुढे सरकली होती. पण तुझ्यासारख्याच एकाने तिला धडक दिली. ती धडक इतकी जोरदार होती की, एकदम मोठा आवाज झाला. काय झालं हे कळायच्या आत माझी मुलगी हे जग सोडून गेली होती. नंतर कोर्टकचेर्‍या झाल्या. कारवाई झाली. मोठ्या रकमेच्या दंडावर त्याची सुटका झाली. ज्याच्यामुळे माझी मुलगी कायमची दुरावली तो आरामात फिरतोय आणि आमचं घर मात्र आजही तिच्या आठवणीने गहिवरतं आहे.
यात नेमकी चूक कोणाची होती?
त्या मुलाकडे याचं उत्तर नव्हतं. पोलिसाकडे वळून काही बोलावं म्हणून वर पाहिलं तर समोर कोणीच नव्हतं. पोलीस कधीच निघून गेला होता.
असाच एक प्रसंग खडकाळी सिग्नलवर घडलेला. ते काका इंदिरानगरला राहायचे. शासकीय कर्मचारी होते. एमएटी होती त्यांची. इतके सज्जन आणि पापभिरू होते की पायाखाली मुंगी मेली तरी त्यांचा जीव कळवळायचा. कायदा पाळण्यासाठी असतो. तो सर्वांच्या हितासाठी बनतो. त्यामुळे तो प्रत्येकाने पाळलाच पाहिजे अशा विचारसरणीत त्यांचं अर्ध आयुष्य गेलं होतं.
त्या दिवशी ते खडकाळी सिग्नल पार करत असतानाच रॉंग साईडने बिनधास्त येणार्‍या एका बाईकने धडक दिली. बाईकवाला गंभीर जखमी झाला पण काकांना मात्र आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या घरी कळलं तेव्हा फारच उशीर झाला होता...
यात नेमकी चूक कोणाची होती?
आपल्याला सर्वांना इतकी कशाची घाई असते? बेधडक सिग्नल मोडण्याइतकी, दणादण रॉंग साईडने गाडी चालवण्याची हिंमत कुठून आली? आपल्या जिवाची नाही तरी इतरांच्या जिवाची काळजी न करण्याइतके बधिर आपण कधीपासून व्हायला लागलो?
पराक्रमाची व्याख्या बदलून टाकलेली असावी. वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळणे, भरधाव वेगाने वाहन हाकणे, रॉंग साईडने गाडी घालणे, पोलिसाला गुंगारा देणे हाच खरा पराक्रम समजू लागलो आहोत की काय?
लक्षात घ्या, सर्वांनीच असे वागायचे ठरवले तर? काय होईल आपल्या शहराचे? सगळीकडे अनागोंदी माजणार नाही का? त्याचा फटका सगळ्यांनाच बसेल? मग काय कराल? कदाचित मग कळेल शिस्तीचं महत्त्वं. पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसेल का?
शिस्त मोडण्याची सवय एकवेळ समजण्यासारखी आहे. पण जेव्हा एखाद्याच्या जिवाचा प्रश्‍न असतो तेव्हा तरी नियम नको का पाळायला? कोणत्याही सिग्नलवर जा, कोणत्याही एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर जा. असे मूर्ख नाम शिरोमणी भेटतातच. आजकाल सिग्नल पाळणार्‍यांना, शिस्तीत गाडी चालवणार्‍यांना जिवाची भीतीच वाटू लागली आहे. आपण सिग्नल पाळला तरी समोरचा काय करेल याची शाश्‍वती नसते. कोण कुठून गाडी घालेल आणि आपल्यावर येऊन आदळेल याचा भरवसाच राहिलेला नाही.
एखाद्या चौकात पोलीस वाहतूक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने एका दिशेची वाहने हात दाखवून थांबवलेली असतात. तो बिचारा शिट्टी वाजवत असतो. पण त्याच्या नाकाखालून वेगात पुढे निघून जाणारे महाभाग कमी नाहीत. तो हात दाखवतोच आहे आणि त्याची नजर थोडीशी हटताच गाडी पुढे सरकते. बहुतेक जण असंच वागतात. मग कोणत्या तरी एका क्षणी वाहतूक जाम होते. हॉर्न वाजायला लागतात. पेट्रोलचा धूर व्हायला लागतो..मग कोणीतरी पोलिसांवर दुगाण्या झाडतं. त्यांचं कसं लक्ष नाही यावर तावातावाने मत मांडलं जातं.
सगळं खुंटीला टांगून पुढे जाण्याइतकी नेमकी कशाची घाई झालेली असते आम्हाला?
बसथांब्यावरही फारसं वेगळं दृश्य नसतं. बस येऊन थांबेपर्यंत चढण्याची घाई होते. सगळ्यांनाच बसमध्ये पहिल्यांदा चढायचं असतं. गर्दीत कोणालाच धड चढता येत नाही. शेजारचा तसा वागतो म्हणून आपणही तसेच वागतो. मेंढरं तरी शिस्तीत चालतात. एकामागोमाग जातात. माणसांना इतक्या घाईने नेमकं कुठे जायचं असतं तेच कळत नाही. आपल्या आजुबाजूला दिवसाचे निम्मे तास बिझी असणार्‍यांची कमी नाही. ते घाईत असल्याचं बघितलंय कधी?
आपण वाट्टेल तसं वागायचं. पाहिजे तशी गाडी पळवायची. सगळे नियम-कायदे खुंटीवर टांगायचे. पोलिसाला, सिग्नलला कोणालाच जुमानायचे नाही. पण हीच वेळ आपल्यावर आली तर....दुसर्‍याच्या चुकीमुळे आपला जीव पणाला लागला तर...असं आत्तापर्यंत झालं तेव्हा काय घडलं.
स्वत:वर वेळ आली की माणसं टमाटमा बोलायला लागतात. समोरच्या माणसावर कारवाई व्हावी असा आग्रह धरतात. लोक कसे बेशिस्त झाले आहेत. कायदे कसे धाब्यावर बसवले जातात. पोलीस कसे काहीच करत नाहीत...असं लेक्चरही झोडतात.
तो क्षण संपला की पुन्हा प्रत्येकाचे पहिले पाढे पंचावन्न होतात.
बेकायदा वागण्याची सुरूवात कोणीतरी एक जण करतो आणि मग इतरांची भीड चेपत जाते. बेकायदा वागायचं ठरतं तेव्हा प्रत्येकाचं आतलं मन काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतं. इशारा देत असतं. प्रत्यकाने आतला आवाज ऐकला तर कदाचित जिवावर बेतणारी ही घाई संपून जाईल. पण इथे आतला आवाज ऐकायला वेळ कोणाला आहे? सगळ्यांच्या पाठी वाघ लागला आहे. सगळ्यांना फक्त दुसर्‍याच्या पुढं जायचं आहे. दुसरा चुकतो आहे हे माहिती असूनही प्रत्येकाला गर्दीचा, बेशिस्तीचा एक भाग व्हायचं आहे.
आपण किती दिवस नुसतं बघत बसणार?
बेकायदा वागणार्‍याला, वाहतूक जाम करणार्‍याला, सिग्नल मोडणार्‍याला, वाहतूक पोलिसाच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करणार्‍याला कधीतरी थांबवणार आहोत की नाही? सगळ्यांच्या भल्यासाठी पुढाकार घेणार आहोत की नाही? पांढरपेशा वृत्ती कधीतरी सोडणार आहोत की नाही? मला काय त्याचं....या भूमिकेचा त्याग आपण कधी करणार?
आपल्याला हे करावंच लागेल. सर्वांनी शस्त्रं म्यान करून कसं चालेल? परिस्थिती बदलायला हवी असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहमत..
पुण्यात कोथरुड डेपोच्या सिग्नलला रोज हा प्रकार होतो.. लाल दिवा लागला तरी लोक गाड्या दामटवणे सुरुच
तिथल्या एका गणपती मंड्ळाने एक बोर्ड लावला होता असा-
जिवंत देखावा - सिग्नल नि वाहतुकीचा खोळांबा
कलाकार - तुम्ही,आम्ही सर्वजण ..
कार्यकर्ते जीव लावुन बोलत होते माईकवर -- बघा बघा.. काका आले पुढे तोडा सिग्नल नि घ्या जीव.. थांबु नका .. या पुढे या आपला खेळ दाखवा..
नंतर जनजागृतीही सुरु होती.

कोणीही सिग्नल तोडला तर मी त्याला ओरड्ल्याशिवाय पुढे जात नाही किंवा पोलिसमामा असले तर त्यांना दाखवुन देत

सहमत आहे, पण मुंबईची परिस्थिती पुणे वगैरेच्या तुलनेत बरी आहे, बरेच जण जा बाबा तू पहिला असा विचार करतात.. माझ्यापेक्षा तुला जास्त घाई आहे तुझ्यापेक्षा माझा जीव जास्त किमती आहे ..

पुण्यात तर सर्वात बेकार परिस्थिती आहे >> अनुमोदन

सगळ्यात घाणेरडा / धोकादायक प्रकार = मोबाईलवर बोलत दुचाकी/चारचाकी चालवणे व (१) स्वतः व इतरांचा जीव धोक्यात घालणे आणि (२) वाहतुक कोंडीत भर घालणे. असल्या XXXX लोकांना चाबकाने मारायला हवं.
हॉर्न वाजवला तर "मी बोलतोय दिसत नाही का सेलवर?" असे भाव असतात चेहर्‍यावर.

अभिषेकने लिहिल्याप्रमाणे मुंबईत खरेच परिस्थिती चांगली आहे.
पुण्यात चालवून घेतले जाते म्हणून चालते. एकदा विरोध करायला लागा ( आणि अर्थातच स्वतः शिस्त पाळायला शिका ) म्हणजे लोक शिकतील.

त्यावरुन आठवले, सिग्नल पाळायचे असतात हे कधीतरी कुठल्या शाळेत / चित्रपटात / टीव्हीवरच्या कार्यक्रमात कधी शिकवले जाते का ?

सहमत << पुण्यात तर सर्वात बेकार परिस्थिती आहे>>> खरये , दिवाळीभर पोर रस्त्यावर मरतायेत .... Sad

पुण्यात तर सर्वात बेकार परिस्थिती आहे>> अहो, असं बर्‍याच शहरात आहे.
कोल्हापुरातदेखील अनुभव घेवुन आलोय. आपण जिथे राहतो तिथे जास्त जाणवतं.
एक तर शहरातुन शहराच्या बाहेर घेउन जाणारे रस्ते छोटे आहेत.
बाइक वाले त्याचे दोन्ही आरसे काढुन टाकतात. (इट्स स्टाइल यु नो)
मागुन येणारे वाहन त्याना दिसत नसतेच.
बर्‍याच वेळा कानात मोबाइलच बोन्डुक. त्यामुळे त्याने वाजवलेला हॉर्न देखील ऐकु येत नसतो.
लेफ्ट राइट इन्डिकेटर देत नाहीत. (जणु त्यामुळे घरचं विजेच बिल वाढणार आहे)
५०-६० हजाराची बाइक घेतात.
पण तिचा खराब झालेला ५०-६० रुपयांचा टेल लॅम्प, इन्डिकेटर बदलत नाहीत.
पुण्यात दुचाकींची संख्या जास्त आहे हे मान्यच.

त्यावरुन आठवले, सिग्नल पाळायचे असतात हे कधीतरी कुठल्या शाळेत / चित्रपटात / टीव्हीवरच्या कार्यक्रमात कधी शिकवले जाते का ?
>>>>>>>>
बहुतेक हो, आमच्या शाळेत कोण्या एका अधिकार्‍याचे सेमीनार देखील होते. सिग्नल, स्पीडब्रेकर, झेब्राक्रॉसिंगचा अर्थ, वापर, उपयोग वगैरे अन कोणत्या परिस्थितीत काय करायचे याचे बालबुद्धीला झेपेल इतपत ग्यान पुरवले होते. अभ्यासक्रमात असे होते की नाही ते आता आठवत नाही. पण आधी उजवीकडे मग डावीकडे मग परत उजवीकडे आणि मग रस्ता क्रॉस हे आपण शाळेपासूनच शिकतो.

बाकी न शिकवताही कॉमनसेन्स सर्वांकडेच असतो, शिक्षणपद्धती यात दोषी नसावी.

त्यावरुन आठवले, सिग्नल पाळायचे असतात हे कधीतरी कुठल्या शाळेत / चित्रपटात / टीव्हीवरच्या कार्यक्रमात कधी शिकवले जाते का ?<<< हो शाळेत एखादे लेक्चर असायचे दुसरी तिसरीत असताना
आता आभ्यासक्रमात सहभाग असं फार गरजेचे वाटू लागले आहे

पुण्यात दुचाकींची संख्या जास्त आहे हे मान्यच.<<< याचे कारण बजाज ला आणि पवारांना विचारावे लागेल