‘इतनीसी बात’ – भाग १

Submitted by vaiju.jd on 10 November, 2013 - 00:56

||श्री||

आलोक बंगल्याच्या फाटकातून गाडी पार्क करून आत आला. आज दिपाली त्याच्या बरोबर नव्हती. कारण निघताना अचानक डिलीव्हरीची पेशंट आल्यामुळे तिला थांबावे लागलं. आणि आलोक घरी आला. खरतर आज सर्जरी चा दिवस! सकाळी कन्सल्टिंग , दिवसभर ऑपरेशन्स , आठवड्यातले दोन दिवस असे ठेवले होते. या दिवशी घरातले सगळे रात्री एकत्र जेवण करत. दोन वर्षात हॉस्पिटलचा पसारा खूपच वाढला होता. हॉस्पिटल सुरू करताना जरा धाकधूक होती, पण दिपा होती सतत बरोबर. हवे तेवढे कष्ट करायची तयारी, दैवाने हाताला दिलेले यश आणि पैशासाठी अडवणूक न करण्याची वृत्ती यामुळे पंचक्रोशीत हॉस्पिटलचे चांगलेच नाव झाले होते. या विचाराबरोबर अलोकला वाटले, दीपाने फार छान साथ दिलीय आपल्याला.कोणत्याही प्रसंगात खांद्याला खांदा लावून उभी असते. तिचा वाटा आहेच आपल्या श्रेयामध्ये. आज दिपा नव्हती. एरवी दिपाली रखमाकडून चहा करून घ्यायची, खायला छानसं काहीतरी करायला सांगायची.

आज आलोक स्वत:च चहा सांगावा म्हणून स्वयंपाकघराकडे वळला.एवढ्यात त्याला पांडुरंगाचा आवाज आला. पांडुरंग रखमाला म्हणत होता,

“ह्ये बघ तू म्हण ‘आसं काय करता? प्राणनाथ, मी आपल्या चरणांची दाशी आहे’.”

यावर रखमा म्हणाली, ” मी नाय हां आस म्हणणार! म्या काय दाशी हाये काय? वाटलं तर मी ‘आय लव यू!’ म्हणेन.”

“ह्ये बग तू येकदा मी सांगतो तसं म्हण!”

” मी नाय म्हणणार मी तुझ्या बरोबरीने काम करते, कमावते, मी कशाला आसं म्हणीन मी नाय म्हणणार!”

“तुला सरळपणानं सांगतोय तर म्हणायची नाहीस तू! म्हण सांगतो नां मुकट्यानं, म्हण ‘प्राणनाथ, मी आपल्या चरणांची दाशी आहे!’ नायतर!”

पांडुरंगाचा टोकाचा चिडलेला आवाज.

“मी नाय तसं म्हणणार!” रखमाचा रडका आवाज.

खरं तर आलोक अतिशय थकून आला होता. त्याला गरम चहाची गरज होती. पण आल्या आल्या पांडुरंग रखमाचं भांडण सोडवणे त्याला फारच कंटाळवाणे वाटलं. तसा चहा पिण्याचा विचार सोडून आलोक खोलीकडे वळला.

जाता जाता त्याच्या मनात विचार आला, ही रखमा अडाणी, जरा पांडुरंगाच्या मनासारख वागायाचं ना, काय झाला असतं! म्हणायाचं त्याच्या मर्जीसाठी ‘ मी आपल्या चरणांची दासी आहे!’ त्याने काय होतयं? पण शिक्षणाने येणारी समजूत अडाणी रखमाला कुठून असणार म्हणा! दिपालीला सांगितलं तर लगेच म्हणेल ,’ आलोक, मी तुझ्या चरणांची दासी आहे.’

खोलीत आल्यावरही त्याला दिपालीची उणीव जाणवली. दीपा फारच कर्तबगार आहे. अशी जोडीदारीण मिळाली हे आपले ‘लक’च आहे असाही विचार त्याच्या मनात आला.

आलोक वॉश घेऊन फ्रेश होऊन वाचत पडला. जराशाने दीपा आली. आलोकने हॉस्पिटलमध्ये कसे काय, वैगेरे चौकशी केली. दिपानेही हसून ‘ऑलवेल’ असल्याचं संगितलं. दीपा वॉश घेऊन आली. तिने आलोकला ‘चहा घेतलास कां?’ विचारलं. आलोकने चहा घेतला नसल्याचे सांगितले.

“कां रे रखमा कुठेय? नाहीए कां?”

“आहे नां, पण मी आलो ना तेव्हा पांडुरंग आणि रखमाची जुंपली होती.”

“ही रखमा पण नां! थांब मी चहा चं सांगून येते आणि खायलाही काय करता येतयं बघते!”

“अग , गंमत तर ऐक. आज पांडुरंग रखमाला म्हणत होता की तू मला म्हण,’प्राणनाथ, मी आपल्या चरणांची दासी आहे!’”

“मग?”

“मग काय? रखमा काही म्हणायला तयार नव्हती, पांडुरंग भडकला!”

“बरोबरच आहे. असं का म्हणेल रखमा! ती काय दासी आहे कां? काहीतरीच पांडुरंगाच!”

“अगं पण एकदा म्हटलं तर काय होतयं? पण ही अडाणी रखमा हिला समजूतच नाही. हे बघ, मी जर तुला म्हटलं, तू मला म्हण ‘मी आपल्या चरणांची दासी आहे!’ तर तू लगेच म्हणशील, कारण तू समंजस, समजूतदार आहेस!”

“पण तू कशाला मला असलं काही म्हणायला सांगाशील? आणि जाऊ दे, त्या पांडुरंग रखमाचं मी चहाच बघते!”

” नाही, थांब. हे बघ, एकदा म्हटल्यानं काय खरचं तसं होतं का?”

“नाही नां होत, मग उगीच नसता हट्ट हवाच कशाला?”

“मला वाटलं होतं , माझी बायको शिकलेली, समजूतदार, तिचं माझ्यावर किती प्रेम, विश्वास! मी म्हण म्हटलं की लगेच म्हणून टाकेल! पण छे! माझा गैरसमझच होता तो! तुला माझ्यासाठी एवढंही करता येत नाही? आणि इथे बंद खोलीत एकदा म्हटलं तर काय जगाला ऐकू जाणार आहे कां? पण नाही!”

“कुणाला ऐकू जावो न जावो, आपल्या मनाला ऐकू येतंच ना? मी नाही असं काही म्हणणार? आणि आलोक तू माझी सहचारिणी म्हणून निवड केलीस, ती मी स्वतंत्र विचारांची आहे, मनाला न पटणारी गोष्ट मी करीत नाही, तुझ्या बरोबरीनं तुला साथ देईन म्हणून नां? म्हणजे तू तसाच म्हणाला होतास आणि आज तुझ्या म्हणण्यासाठी मी हे असलं काही म्हणणार नाही म्हटल्यावर लगेच संतापलास तू! माझ्या प्रेमाबद्दल शंका घेण्यापर्यंत, पोहोचलास तू! म्हणजे ते सगळं तुझ्या मर्जीपुरतं सोयीस्कर असं होतं कां? असो, काहीही म्हणालास तरी मी असलं काहीही म्हणणार नाही!” शेवटी दीपाचा आवाज भरून आला. धाडकन आवाज करीत तिने बाथरूमचा दरवाजा लावून घेतला. आलोक रागाने धुमसत म्हणाला,” नुसतं एकदा म्हणायला सांगितलं ‘मी आपल्या चरणांची दासी आहे’ तर तेवढं नाही जमलं, मला लेक्चर देतेय.’ईगो’ आडवा येतो नां?”

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये बात कुछ हजम नही हुई!.. कोणतीही अशिक्षित वा सुशिक्षित व कर्तबगार स्त्री आपल्या नवर्‍याला असं "मी तुझ्या चरणांची दासी आहे" म्हणणार नाही. ती तसं गंमतीत तरी म्हणेल अशी अपेक्षाच एखाद्यानी करणं पटलं नाही. इगो इश्यु वगैरे नंतरची बात आहे.

असो, कथेत पुढे ह्याचे जास्त चांगले संदर्भ येतील अशी आशा आहे.
पु.ले.शु.

Great start Happy