कोबीची भाजी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 8 November, 2013 - 10:11

जेव्हा तुमच्या ताटात वा डब्यात
नियमित पणे दिसू लागते
कोबीची भाजी
समजायचे की
आता तुमची वेळ आलीय
वानप्रस्थानाची

जास्त काही बोलायाचे नाही
दटावून काही मागायचे नाही
आपणच आपल्या जिभेला
उगा शांत करायचे
पोट भरलंय ना तेवढेच पाहायचे
भाजी शिळी होते
तसे प्रेम हि शिळे होते
गरज संपली की
गरजेचे माणूसही नकोसे होते

नकोपणाच्या काठावर
जेव्हा आपले आयुष्य
येवून ठेपते
कोबीच्या खुणांनी सारे
समजून घ्यायचे असते

कोबीसारखे एक एक
आवरण मग
हलकेच सोडायचे असते
शेवटी जे काही उरते
तेवढेच फक्त
आपले असते
एवढच आपण
जाणून घ्यायचे असते
कोबीची भाजी तर
केवळ निमित्त असते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users