का अपेक्षा ठेवशी तू उत्तराची ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 November, 2013 - 22:59

जाणुनी घे जीवनाचा गोड कावा
चार दाणे टाकुनी साधेल दावा

पश्चिमेला या उजेडावे असे की
साजणाला भेटण्याचा योग यावा

एवढे माझ्यात मी तल्लीन व्हावे
आठवांना छेडताना प्राण जावा

रंग माझा गंध माझा ज्ञात त्याला
जाणला ना काळजाचा आर्त धावा

का अपेक्षा ठेवशी तू उत्तराची
कोणत्या शब्दात त्याने जाब द्यावा

स्वैर-वेड्या जाणिवा पोसू नको या
पाळला नाही कुणी अद्याप छावा

केवढा हा धन्य होतो शेर माझा
ऐकुनी उत्स्फुर्त त्याची वाह वा वा !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वा वा !
वाह वा वा !!
.......( Wink )

_____
एक शेर आठवला

बा पांडुरंगा इतके तरी दे
मी शेर व्हावे तू व्वा म्हणावे
______

सगळे शेर छान झालेत काफिये सहज उतरलेत सगळे खयाल टॉप क्लास !..अंदाजे बयान नेहमीसारखाच शैलीदार नजाकत्दार !!!
धन्स

पश्चिमेला आज उजडावे असे की
साजणाला भेटण्याचा योग यावा

का अपेक्षा ठेवते तू उत्तराची
कोणत्या शब्दात त्याने जाब द्यावा>>उत्कृष्ट !

केवढा हा धन्य होतो शेर माझा
ऐकुनी उत्स्फुर्त त्याची वाह वा वा !>>कळस !!

सुप्रियाजी...

उजडावे ऐवजी उघडावे जास्त योग्य आहे का?
उजडा हा हिंदी शब्द आहे ना? की मराठीतही आहे?

उजेडावे केलं तर मात्रा चुकतील का?

'का अपेक्षा ठेवतेस तू उत्तराची' हे जास्त योग्य आहे का? पण मात्रा चुकतील ना..

मग तू च्या जागी मी केलं तरीही योग्य वाटेल का?

जयदीप जी अस काही नाही .

'उजडावे' बाबात विचार करतेय.

बाकी 'मी' 'तू' या शब्दांच्या प्रयोजनाबाबत.........प्रत्येकाची एक अंगभूत शैली असते शब्दात व्यक्त होण्याची त्यानुसार व्यक्त होणेच ज्याला त्याला जास्त आवडते. होय ना?

धन्यवाद !

-सुप्रिया.

रंग माझा गंध माझा ज्ञात त्याला
जाणला ना काळजाचा आर्त धावा

का अपेक्षा ठेवते तू उत्तराची
कोणत्या शब्दात त्याने जाब द्यावा

वाह वा वा ......................................

आयुष्य कितीसे कळले मला माहीत नाही,
खूशाल जगलो आहे एवढेच खूप आहे ........

//उजडावे ऐवजी उघडावे जास्त योग्य आहे का?
उजडा हा हिंदी शब्द आहे ना? की मराठीतही आह//

'उजाडणे 'हा मला वाटते मराठी शब्द आहे . आपण नाही का म्हणत "चांगले उजाडले आहे"
उघडले आहे असे नाही म्हणत. फक्त आभाळ आले कि किंवा पाऊस थांबला कि म्हणतो.
'उजडावे' ऐवजी ' उजाडावे.
अर्थात expert सांगतीलच.

सुप्रियाताई मस्त!

जाणुनी घे जीवनाचा गोड कावा
चार दाणे टाकुनी साधेल दावा

एवढे माझ्यात मी तल्लीन व्हावे
आठवांना छेडताना प्राण जावा

हे दोन्ही शेर आवडले.
'उजडावे' खटकते आहे.

एवढे माझ्यात मी तल्लीन व्हावे
आठवांना छेडताना प्राण जावा

का अपेक्षा ठेवते तू उत्तराची
कोणत्या शब्दात त्याने जाब द्यावा

हे दोन सर्वात विशेष वाटले. त्यातही प्राण जावा हा अधिकच.
फक्त "का अपेक्षा ठेवते तू उत्तराची"
यात 'ठेवते' ऐवजी 'ठेवतेस' असे व्याकरणदृष्ट्या योग्य आहे,
परंतु त्याने वृत्तभंग होत असल्याने 'ठेवशी' असे केल्यास ....?? कृगैन.

काका 'ठेवतेस' वृत्तात बसत नाही आणि 'ठेवशी' पेक्षा 'ठेवते' सहज वाटतय मला वाचताना (वै.म.) तरीही तुम्हा सगळ्या तज्ञांचं मत स्विकारून बदल करतेय.

मनःपुर्वक धन्यवाद !

-सुप्रिया.

सुप्रियाताई,

छान गझल.
पण....

पश्चिमेला आज उजडावे असे की
साजणाला भेटण्याचा योग यावा

**** माझ्यामते उजडावे हा शब्दप्रयोग बरोबर नाही. त्याऐवजी काही बदल करावा असे वाटते.

का अपेक्षा ठेवते तू उत्तराची
कोणत्या शब्दात त्याने जाब द्यावा

***** हा शेर मक्ता म्हणूनही वापरता आला असता.
का अपेक्षा सुप्रियाला उत्तराची...

असे चालले असते असे वाटते.

शेवटी निर्णय गझलकाराचाच.

अजयदादा, ज्ञानेशजी, जयदीप,

'उजेडावे' केले Happy

अजयदादा,

धन्यवाद आपल्या सुचवणीबद्दल परंतु 'प्रिया' हा तख्खलुस वापरते मी. Wink

pradyumn,

योग्यवेळी छाटण्याने वेलही फ़ोफ़ावते...
गझल धरते बाळसे, होता खरी-परखड टिका Happy

धन्यवाद मंडळी.

-सुप्रिया.

एवढे माझ्यात मी तल्लीन व्हावे
आठवांना छेडताना प्राण जावा << सुंदर >>

ठेवतेस तू ...असे म्हणतात

का अपेक्षा ठेवते तू उत्तराची (ठेवशी?)
कोणत्या शब्दात त्याने जाब द्यावा

केवढा हा धन्य होतो शेर माझा
ऐकुनी उत्स्फुर्त त्याची वाह वा वा !<<<

वा वा!

pradyumn निवडक १० बद्दल आभार.

अरविंदजी, बेफिजी

धन्यवाद !

-सुप्रिया.

मथळा बदलल्याचा खूप आनंद झाला.

संपूर्ण गज़ल उत्कृष्ट आहे यात वादच नाही. सध्या मी व्यस्त असल्याने इतकेच. नंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन तुमच्या सर्व गज़लांवर Happy

सुप्रिया, अगं किती छान आहे गझल! वा! सगळेच शेर चांगलेत. हे दोन जास्त खास वाटले...

जाणुनी घे जीवनाचा गोड कावा
चार दाणे टाकुनी साधेल दावा

एवढे माझ्यात मी तल्लीन व्हावे
आठवांना छेडताना प्राण जावा

Jhakaas !!

शरदजी मला आवडेल वाचायला,
पुलस्तीजी, भाग्यश्री, काका..

धन्यवाद !

-सुप्रिया.