आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला - (तरही)

Submitted by रसप on 30 October, 2013 - 23:50

'म.क.स.'च्या 'अशी जगावी गझल - भाग ३१' मधील तरहीत सहभाग -

प्रत्येक दु:ख सरता मज हाच भास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

माझ्यासमोर जेव्हा बसलो निवांत थोडा
ओळख पटावयाला भलताच त्रास झाला

थांबून ज्या ठिकाणी अश्रू तिचा झिरपला
तेथेच उंबरा ह्या माझ्या घरास झाला

आयुष्य-चोपडी ही माझी लिहू कशी मी ?
जागा मला मिळाली तेथे समास झाला

माझ्या मिठीत जेव्हा तू श्वास एक भरला
प्रत्येक श्वास माझा निव्वळ सुवास झाला

येशील एकदा का भेटायला मला तू,
थोडा उशीर जर का मज दर्शनास झाला ?

मी शब्दखेळ केला ना छंद एक जमला
ती गोड हासली अन् अनुप्रास-प्रास झाला

उरली असेल थोडी माणूसकी कदाचित
दिसता 'जितू' म्हणूनच मुखडा उदास झाला

....रसप....
३० ऑक्टोबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/10/blog-post_31.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला त्रास समास खूप आवडले
घरास सर्वाधिक आवडला (अश्रू -उंबरा ह्या दोन प्रतिमाना जोडण्यातले नाविन्य व कल्पकता फार आवडली)
खालचे शेर कमी कमी आवडत गेले ...(मक्त्याचा नेमका अर्थ नीट हाताला लागला नाही अजून )

'प्रास' ला मी गा-ल असे वाचतो तर 'अनुप्रास' ला ल-गा-गा-ल असे !! त्यामुळे मला खटकले असावे ...कदाचित मी चुकतही असेन किंवा काही शब्दांच्या वाचनात लोकांनी उच्चारण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे अशी किरकोळ तफावत होत असते तसे काहीसे असेल
असो
चांगली आहे गझल