आईची रेसिपी - गव्हाची खीर आणि चपाती/पोळीचे लाडू

Submitted by स्वप्ना_राज on 24 October, 2013 - 23:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गव्हाच्या खीरीचे जिन्नस - पाव किलो गहू, आवडीप्रमाणे गूळ, एक नारळ, वेलदोडा पूड

चपाती/पोळी लाडू जिन्नस - शिळी चपाती/पोळी, गूळ, तूप, शेंगदाणा कूट, वेलदोडा पूड

क्रमवार पाककृती: 

गव्हाची खीरः

गहू संध्याकाळी धुवून वाळत घालायचे.
ओलसर असतानाच मिक्सरमधून फोलपटं निघतील इतपत फिरवून घ्यायचे. (गहू साधारण अख्खे रहायला हवेत. रवा होऊ देऊ नये.)
गहू पुन्हा वाळत घालायचे. वाळले की पाखडून फोलपटं काढून टाकायची.

gahu1.JPG

गहू रात्रभर पाण्यात भिजत घालायचे.
सकाळी पाणी घालून कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे.
पाणी असल्यास काढून टाकायचं (पाणी उरलं नसल्यास उत्तम कारण मग सत्त्व निघून जात नाही)
गरम असतानाच त्यात आवडीप्रमाणे गूळ किसून घालायचा.
एक नारळाचं दाट दूध घालायचं. वेलची पूड घालायची.
फ्रीजमध्ये ठेवून गार सर्व्ह करायची.

gahu2.JPG

चपाती/पोळी लाडू:

चपाती/पोळीचे तुकडे करुन घ्यावे,.
त्यात गूळ, शेंगदाणा कूट, वेलदोडा पूड इत्यादि जिन्नस घालावेत.
शेवटी पातळ केलेलं तूप घालून सर्व नीट मिक्स करून लाडू वळावेत.

ladoo.JPG

अधिक टिपा: 

१. लागणारा वेळ दोन्ही पाककृतींसाठी मिळून दिला आहे. त्यात आदल्या दिवशीच्या तयारीसाठी तसंच चपाती/पोळीसाठी करण्यासाठी लागणारा (!) वेळ समाविष्ट नाही.
२. ह्या पाककृती एकाच वेळेस करायच्या असं अजिबात नाहिये. चपातीच्या लाडवाची कृती छोटीशी असल्याने खीरीच्या कृतीसोबत दडपून दिली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
३. गव्हाची खिरीची तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी करावी. रात्री अपरात्री मिक्सर फिरवून शेजार्‍यांना वात आणू नये. Happy

माहितीचा स्रोत: 
आईसाहेब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण दलियाची करणार. गुळ घालून. जायफळ घालेन.

चपातीचा लाडू नाही पण गूळ-तुप-चपाती खाल्ली जाते सटीसामाशी. मात्र हल्लीच्या पोरांना हे असलं खाणं आवडतच नाही. त्यांच्या चवीचे जीन्स पार बदललेत.

कुरमुर्‍याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, गूळ-शेंगदाणे, दुध- पोहे कसले सह्ही लागायचे. (अजूनही लागतात. Happy )

अजून एक "शास्त्र" सांगून ठेवते. गव्हाची खीर केल्या दिवशी पोळ्या करायच्या नाहीत अशी पद्धत आहे. मसालेभात अथवा बिसीबाळेअन्ना वगैरे भाताचा प्रकार केला जातो... मलातरी ही पद्धत फार आवडते!!!!

लोक्स, एखाद्या रेसिपीबुकातल्या रेसिपीज इथे टाकायला परवानगी नसेल ना? मी नुकतीच एक अशी पोह्याची रेसिपी ट्राय केली. चांगली झाली होती. म्हणून विचारतेय.

इथे तर टाकतात की लोकं, फक्त जराशी मापं बदलायची, टोपाएवजी तवा, तूपाएवजी तेल असे घेवून स्वप्रयोग म्हणून टाकायची इतकेच.

(ह. घ्या.)

स्वप्ना धन्स!! माझ्याही आईची गव्हाची खीर ही खासीयत आइ मी ती तब्बेतीनी खात असे... गेले ते दिवस!!
सांगलीला असताना हनुमान जयंतीला मात्र सगळ्या मैत्रीणींच्या घरून आग्रहाचं आमंत्रण असे ही आवड माहीत असल्याने आणि मग घट्ट चवदार गरमागरम खीर वाडगं भरून आणि वर कणीदार तूपाची धार अज्जीबात कंजूशी न करता (घाटावरचे लोक पाहुणचार करायला एकदम नादखुळे Happy ) आहाहा हा... धन्स गो आठवणी ताज्या केल्यास आणि आता आपली आवड आपणच जपेन म्हणतेय या रेसीपीतून Wink नंदिनी ने दिलेली दलीया खीर पण मस्त वाटतेय ... Happy नक्की करून बघणार!

चपातीचा लाडू तर एनी टाईम्/ऑल टाईम फेव Happy

स्वप्ना प्लीजच शेअर कर... माझा नवरा कधी नव्हे ते माबो ला मनापासून धन्यवाद देतोय... यावरील पदार्थ वाचून पाहून मी घरी करायला शिकले...(बर्‍यापैकी बरे Happy )

माहीतीच्या स्त्रोतात पुस्तकाचे नाव टाक हाकानाका

ड्रीमगर्ल, झंपी धन्यवाद! अ‍ॅडमिनना विचारून बघते. उगाच त्याच्यावरुन गदारोळ नको. फालतु कमेन्ट्स देणारे लोक कमी नाहीत इथे.

अख्खा गव्हाची खीर करायची आहे. मिक्सर नाही. त्यामुळे गहु भिजवुन खीर करणार आहे. गहु किती वेळ आधी भिजत घालायचे? डयरेक्ट गहु न ब्जिजवता शिजवले तर शिजतात का?

Pages