आधुनिक सीता - १९

Submitted by वेल on 24 October, 2013 - 08:26

भाग १४ - http://www.maayboli.com/node/45630
भाग १५ - http://www.maayboli.com/node/45696
भाग १६ - http://www.maayboli.com/node/45780
भाग १७ - http://www.maayboli.com/node/45869
भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994

**********************************************************************************************

"तुझ्यासाठी दोन पत्र आली आहेत, तुझ्या आणि सागरच्या घरून. तुझ्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न म्हणून मी ते अजून वाचलेली नाहीत. विचार केला एकत्र वाचूया. वाचशील का मोठ्याने." रफिक आत येता येताच म्हणाला.

माझ्या मनाने ती पत्रे झडप घालून हातात घेतली आणि त्याची कव्हर्स टराटरा फाडून पत्र अधाशासारखी वाचायला सुरुवात केली. पण मी....... मी शांतपणे ती पत्र हातात घेतली. अगदी कॅज्युअली त्या कव्हरकडे नजर टाकली, त्यावर पत्ता नव्हता. दोन्ही पत्रांवर फक्त 'सरितासाठी' एवढेच लिहिले होते. म्हणजे रफिकने कोणाला तरी पाठवून ती पत्र घरी दिली होती आणि त्याचे उत्तर मागवले होते. मी रफिककडे पाहिले. चेहर्‍यावर आणि डोळ्यात कृतज्ञतेचे सारे भाव आणून त्याला थँक्स म्हटले. पत्र फोडताना हात थरथरत होते. डोळ्यात पाणी येऊ लागले. कोण जाणे काय लिहिले होते पत्रात. माझी अवस्था पाहून रफिक म्हणाला,
"तू वाचून घे पत्र. मी नन्तर वाचेन."

मी बाबांचे पत्र अक्षरावरून ओळखले. दुसर्‍या पत्रावरचे अक्षर मला अनोळखी होते म्हणजे ते सागरचे किंवा त्याच्या घरातल्या कोणाचे तरी होते.

"सरिता,"
बाबांनी इतक्या कोरडेपणे पत्र कोणालाच कधीच लिहिले नसेल.
"तुझे पत्र मिळाले.

इतके दिवस आम्हाला वाटत होते तू परत न येण्यात सागरचा हात आहे. परंतु तू पत्रात लिहिलेले खरे असेल, जे खरे आहे असे मी धरून चालतो आहे तर आम्हाला खरच तुझा खूप राग आला आहे. तू सागरला फसवल्यावद्दल आणि इतके दिवस आम्हाला अंधारात ठेवल्याबद्दल. तू जर खरच स्वतःहून तिथे राहिलीस तर आम्हाला सांगू शकली असतीस. विनाकारण सागरला तुरुंगवास झाला आणि त्याच्या आई वडिलांना मानसिक त्रास. तुझ्या ह्या वागण्यामुळे सागरच्या आजीला हार्ट अ‍ॅटॅक आला. शिवाय आमच्या मुलीमुळे असं झालं हा दोष आम्ही कायमचा माथी घेतलाय. तुझं हे वागणं निश्चितच निंदनीय आहे. तुला काय वाटतं तुझ्या त्या कोणी त्या माणसाने सागरला पन्नास लाख दिले की सगळं सुरळित होईल.

खरं तर तुझं पत्र ज्या माणसाने आणून दिलं तो घरात चिकटून बसला नसता आणि आईने उत्तर लिही ताणून धरलं नसतं तर मी तरी ह्या पत्राला उत्तर द्यायचं नाही असंच ठरवलं होतं. तू असं कसं वागू शकलीस? आम्ही तुझ्यावर भौतिक गोष्टीच्या मागे धावायचे संस्कार कधी केले? सागरच्या आईवडिलांना तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस. इतकच नाही तर प्रभाकरलासुद्धा कोणत्या तोंडाने भेटू मी आता?

इथे सागर एकटा आला तेव्हा आम्हाला म्हणाला तुला कोणीतरी किडनॅप केलं आणि त्याला धमकावून सौदीतून परत पाठवून दिलं. आमचा विश्वास बसला नाही, काय रावण राज आहे का असं तुला कोणी पळवून न्यायला? पण ते कोणी केलं हे सांगायलाही त्याचे मानसिक संतुलन ढासळले होते. आम्ही त्याला पोलिसात दिले आणि तिथून तो तुरुंगात गेला. एका सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू होते. त्यातून थोडा बरा झाल्यावर तो परत तुरुंगात गेला. आता कळतय की तो तुझ्या चुका झाकत होता. किती बेजबाबदारपणे वागलीस तू! अग तुला वेगळं व्हायचं होतं तर सांगून समजावून वेगळं व्हायचस ना, आम्ही तुला फार अडवलं नसतं ग, त्या बिचार्‍याची फरफट तरी नसती झाली. आता हे सगळं समजल्यावर तू स्वतःला क्षमा करू शकशील?

आणि एवढा गोंधळ घातल्यावर तू संस्काराच्या गोष्टी करतेस?

घटस्फोटाबद्दल सागरशी आम्ही बोललो, तो तुला घटस्फोट द्यायला तयार आहे. लवकरच तो वकिलाकडे जाईल. आम्ही केवळ तो या लग्नबंधनातून मोकळा व्हावा आणि त्याने लवकरात लवकर सर्वसाधारण आयुष्य जगावे ह्यासाठी तुझ्यासोबत संपर्कात राहू. एकदा तुमचा घटस्फोट झाला की तुझा आणि माझा संबंध संपेल, आई, बाबा, भास्कर आणि मीना ह्यांनी त्यांना काय हवं ते करावं.

केशव गोखले."
एवढे पत्र वाचून मला हुंदका फुटला. त्या पत्रासोबत अजून एक पत्र होत. मी डोळे पुसतच ते पत्र उघडलं.

"छकुली,

कशी आहेस ग? असं कसं काहीतरी केलंस तू? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग कधी. आमचं काही चुकलं का तुला संस्कार देण्यात? का सागर म्हणतो ते खरं आहे? पण तो म्हणतो ते खरं असेल तर तुझं असं पत्र नसतं आलं. आम्हाला काही कळत नाही आहे. पण तुझं पत्र आलं म्हणजे तू सुखरूप आहेस अशी आशा आहे.

धर्म बदलणार म्हणतेस, मी तरी तुला अडवणार नाही, तुझा वैयक्तिक निर्णय आहे तो, तू पूर्ण विचारांती घेतला असशील अशी खात्री आहे.

आम्ही सगळे इथे बरे आहोत. कमलला हार्ट अ‍ॅटॅक आला होता, पण आता ती बरी आहे. सागरदेखील खूपच डिप्रेशन मध्ये गेला होता. सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि प्रभाकरच्या बायकोकडे त्याची ट्रीटमेण्ट कौन्सेलिंग चालू होतं. आता बरा आहे. तुझ्या पत्रामुळे तो तुरुंगातून सुटला. हे खूप चांगलं केलस तू. स्वार्थासाठी का होईना हे पत्र पाठवलस.

मी स्वत: सागरसोबत बोलले आहे. त्यानेही तुला पत्र लिहिले आहे. त्याला दिलेले पन्नास लाख तो वापरणार नाही म्हणतो आहे. मी त्याला समजावतेच आहे. तुझ्या चुकीची शिक्षा त्याने स्वतःला देउ नये म्हणून.

तुझे पत्र वाचून केशवला खूप राग आला आहे, भास्करदेखील रागात आहे. तुझ्या आजोबांनाही धक्का बसला होता. पण तुझ्या पत्रानंतर सावरलेत ते. मीना मात्र अजून रडते आहे. तिला आणि मलाही तुझ्याशी बोलावसं वाटत आहे. जमलं कधी तर बोल ग आमच्याशी. आणि स्वतःची काळजी घे. खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस. आणि प्राणायाम, योगासनं साधना करत राहा.
माझातरी तुझ्यावर राग नाही बाळा, स्वतःला एकटी समजू नकोस. स्वतःला एकटी समजून तू तिथे डिप्रेशनमध्ये जाऊ नकोस. माझी साधना, माझे प्रेम आणि परमेश्वर तुझ्यासोबत आहे.

तुझी आजी"

पत्र वाचून झाल्यावर मी डोळे मिटले, आजीचं हे असं पत्र म्हणजे तिला सत्य समजलं होतं. कमीत कमी काही तरी गडबड आहे हे तिला जाणवलं होतं. तिला जाणवलं होतं म्हणजे तिने घरातल्या सगळ्यांना पटवलं असणार मग बाबांचं पत्र असं का होतं. का बाबांनी मुद्दाम हे असं पत्र लिहिलं होतं?

मी दोन्ही पत्र रफिकच्या हातात दिली त्याला वाचायला.

दुसर्‍या एनव्हलपमध्ये सागरचं पत्र असणार. रफिकला नक्की माहिती होतं ते. आणि ते पत्रही मला वाचायला देत होता. मोठाच विश्वास टाकत होता तो माझ्यावर. ही नकी रफिकची पुढची चाल असणार, माझा विश्वास आणि मला जिंकण्यासाठी.

मी स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवून ते एनव्हलप उघडलं. पत्र उघडलं.

"आपले आपण घरच्यांना लिहिलेले पत्र मिळाले. आपल्या ह्या पत्रामुळे मी तुरुंगातून सुटू शकलो, तेव्हा ह्या पत्राबद्दल आपले आभार. आपला निर्णय समजला. आपण तिथेच राहाण्याचा निर्णय घेतल्याने मी आपल्याला या लग्नबंधनातून मो़कळे करायचे ठरवले आहे. त्याकरता गरज पडेल त्या सर्व कायदेशीर बाबी मी पूर्ण करेन.

सागर साने"

एक सुस्कारा सोडून मी ते पत्रही रफिकच्या हातात दिले.

क्रमशः

*********************

http://www.maayboli.com/node/46199

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच चालू आहे ग.
आता ती काय करेल याची उत्सुक्ता लागून रहीलि आहे.
अन ति त्या नरकातून लवकर बाहेर पडलेली दाखव (थोडी घाई केली ना Sad )
पुलेशु

मस्तच चालू आहे.
आता ती काय करेल याची उत्सुक्ता लागून राहीली आहे.+१०००००००००००००००
पुलेशु

एवढ्या लवकर पुढचा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद वल्लरी Happy आजचा भागही नेहमीप्रमाणे मस्त... आजीची भूमिका आवडली. पुलेशु

व्वा.. सकाळी सकाळीच नवा भाग आला.. छान सुरुवात झाली दिवसाची Happy
आजी आणि नातीतल नातं खूप आवडल.. जे आई बाबा समजुन घेऊ शकत नाही ते आजी समजु शकते.. मस्त!

ह्म्म्म आजीवर गेलेली दिसते नात. वल्लरी थांकु हा पुढचा भाग लगेच टाकल्याबद्दल अग काय होत ना मध्ये गॅप पडली ना की आधीच कथानक विसरायला होत ग....

वल्लरी तुम्ही खूप छान लिहिता. उत्कंठा वाढवता. रोज मी दोनदा तरी गुलमोहर बघते तुमच्या कथेचा पुढचा भाग आलाय का यासाठी?

मस्तच... पण अस वाटतय की सरिताच्या डोक्यात काहितरी जबरदस्त plan असणार आहे... वल्लरी plz पुढचा भाग लवकर टाक...

Pages