खेळता खेळता आयुष्य- आत्मकथा, मूळ कन्नड लेखक- गिरीश कर्नाड, अनुवाद - उमा कुलकर्णी

Submitted by दिनेश. on 23 October, 2013 - 05:38

खेळता खेळता आयुष्य- आत्मकथा, मूळ कन्नड लेखक- गिरीश कर्नाड, अनुवाद - उमा कुलकर्णी

हे पुस्तक नुकतेच वाचून संपवले. गिरीश कर्नाड या नावाला आपल्या नाट्यचित्रसृष्टीत एक वलय आहे. त्यामूळे पुस्तकाकडून माझ्या मोठ्या अपेक्षा होत्या. त्या पुर्ण झाल्या असे म्हणवत नाही.

या पुस्तकाची अर्पणपत्रिका भन्नाट आहे. ती मूळातूनच वाचण्यासारखी आहे.

आईवडीलांचा जरा वेगळ्या धाटणीचा विवाह आणि त्याचे भावंडांच्या बालमनावर झालेले परीणाम हा भाग
सविस्तर आलेला आहे.

त्या काळात धारवाड मुंबई इलाख्याचा भाग होते. तो काळ, सारस्वत लोकांचे व्यवहार, धारवाड शहराची जडणघडण हे पण वाचनीय आहे. खरं तर त्या काळचे म्हणून अनेक संदर्भ आलेत त्यात मुंबई, चेन्नै शहरातल्या घटना आहेत तश्याच लंडनपर्यंत बोटीने केलेला प्रवासही आहे. त्यांच्या ब्रिटनमधील शैक्षणिक
कालखंडाबद्दल, त्या काळात त्या समाजात होणार्‍या बदलांबद्दल, तिथल्या शिक्षणपद्धतीबद्दल, कर्नांडांना
मिळालेल्या संधीबद्दल सविस्तर लिहिलेले आहे. अपेक्षित यश न मिळाल्याने आणि इतर काही खास
कारणांसाठी भारतात परत येण्याच्या त्यांनी घेतलेला निर्णय हा भाग वाचनीय आहे.

त्यांची एफ टी आय आय या संस्थेतली कारकीर्द वेगळ्याच कारणासाठी गाजली. नासिरने केलेला संप,
कासारवल्लीची विचित्र वागणूक, दिलीप धवनच्या अ‍ॅडमिशनसाठी राज कपूरने केलेली ड्रामाबाजी,
त्याच काळात झालेले दूरदर्शनचे आक्रमण, त्याकाळातल्या अधिकार्‍यांची अरेरावी, ओम पुरीचा प्रवेश,
अभिनयवर्ग बंद करण्याचा निर्णय.. हा भागही सविस्तर आलाय.

त्यांच्या पत्नीपासून न लपवलेली प्रेमप्रकरणेही जरा जास्तच सविस्तरपणे आलीत. धर्मेंद्रच्या पाशातून
हेमामालिनीला सोडवण्यासाठी तिच्या आईने केलेले प्रयत्न. आणि "मद्रासी लोक काळे असतात" या तिच्या
रिमार्कसाठी तिला खोटे कारण देऊन, दिलेला नकार..हे पण एका खास प्रकरणात आहे.

त्यांच्या कारकिर्दीशी खास संबंध नसलेल्या काही कलाकारांबाबत ( उदा. बालासरस्वति आणि सुब्बलक्ष्मी )
किंचित अपमानास्पद मजकूर आहे. त्यासाठी केवळ सांगीवांगीचे दाखले दिले आहेत.

आता तुमच्या लक्षात आले असेलच की, कर्नाडांची आत्मकथा वाचताना तुम्हाला हे सगळे अपेक्षित नसणार.
त्यांना आपण ओळखतो ते एक नाट्यलेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून. त्याबद्दल काय आलेय,
ते आता लिहितो.

त्यांचे पहिले नाटक ययाति, आणि दुसरे तुघलक. या दोन्ही नाटकाच्या लेखनप्रक्रियेबाबत, त्यातही ययाति बाबत जास्त, विस्ताराने लिहिलेय. हयवदन च्या लेखनाबाबत थोडेफार आहे पण नागमंडल बद्दल काहीच नाही.

चित्रपटांपैकी, संस्कार बद्दल विस्ताराने आहे. वंशवेल बद्दलही आहे. त्यातही चित्रपटापेक्षा पडद्यामागच्या
घटना ( निर्माता, कलाकारांची विचित्र वागणूक ) जास्त विस्ताराने आहे. मंथनचा केवळ नामोल्लेख आहे.
अंकूर बाबतीतही तेच. हे राम, सूरसंगम चा तर उल्लेखही नाही. सुबह / उंबरठाचाही नाही.

त्यांच्या नाटकांची अनेक भाषांत भाषांतरे झाली, प्रयोगही झाले. तुघलक इंग्लीशमधे कबीर बेदीने, हिंदीत
यशपाल शर्माने आणि मराठीत अरुण सरनाईकने केले. कर्नाडांनी हे प्रयोग बघितले नाहीत का ?
त्याबद्दल एक शब्दही नाही. केवळ उल्लेख आणि काही फोटो आहेत.

नागमंडल आणि हयवदन बद्दल, विजयाबाईंनी "झिम्मा" मधे भरभरून लिहिले आहे. या पुस्तकात त्या
प्रयोगांबद्दल काहीच नाही.

पुस्तकाचे शीर्षक महाकवि बेंद्रे यांच्या एका कवितेच्या ओळीचे भाषांतर आहे. पण ते अर्ध्याच ओळीचे असल्याने, या पुस्तकाचा पुढील भाग येऊ शकेल असे सुचवलेय. मी उल्लेख केलेली नाटके ही त्याच काळातली असल्याने, त्याबद्दल ते लिहितील अशी अपेक्षा करु या.

अनुवाद मात्र झक्क जमलाय. वाक्यरचना कुठेही अवघड नाही. आपण अनुवादीत पुस्तक वाचतोय, असे
अजिबात वाटत नाही. दोन चार ठिकाणी अय्यो आणि एका ठिकाणी अय्यप्पा हा शब्द सोडल्यास
कन्नडचा प्रभाव जाणवत नाही. काही शब्द मात्र मला अनोळखी वाटले. ( उदा. प्रचोदन )
डॉक्यूमेंटरी साठी साक्षीचित्र असा शब्द योजलाय. ( पण तसा उल्लेख मात्र तिसर्‍यांदा केलेल्या वापरानंतर आहे ) तो मूळ कन्नड शब्द आहे का ? मराठीत माहितीपट असा रुळलेला शब्द आहेच कि.

सध्या लिखित मराठीत "म्हणे" शब्द वापरून वाक्यरचना क्वचितच दिसते. पण या पुस्तकात ती
अनेकवेळा केलीय. त्या शब्दाच्या आधीचे वाक्य मात्र ऐकीव असल्याचे सुचित होतेय. आत्मकथा लिहिताना
अशी ऐकीव माहिती टाळायला हवी होती.

नाटक आणि चित्रपटांची जी नावे दाक्षिणात्य भाषेत आहेत, ती तशीच देऊन कंसात त्यांचा अनुवाद दिला आहे.

मुखपृष्ठावरचा कर्नाडांचा फोटो तितका खास नाही. आतले फोटोही जुनेच आहेत.

राजहंस प्रकाशनाची निर्मितीमूल्ये दर्जेदार आहेत. पुस्तकात मुद्रणदोष एखादाच दिसला. पानांची जाडीही
नेहमीपेक्षा मोठी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, अगदी सहमत.
मीसुद्धा अर्पणपत्रिका वाचूनच पुस्तक घेतलं..
पुस्तक बघितल्यबरोबर घ्यावसं वाटण्याइतकं छपाई, वगैरे दर्जेदार आहे. अनुवाद छान जमलाय.
मलाही खूप अपेक्षा होत्या ह्या पुस्तकापासून पण...

म्हणेबद्दल थोडंसं-
जर कानडीतून मराठीत अनुवाद असेल तर असे होणे शक्य आहे.
आपण मराठीत राजाची गोष्टं सांगताना 'एक होता राजा' अशी सुरूवात करतो तर कानडीत बहुतेकदा
'एक राजा होता म्हणे' अशी सुरूवात/पद्धत असते.

दाद, दुसरा भाग येईल अशी आशा करु या.

साती, आता उलगडा झाला. आणि अर्पणपत्रिकेत हे पुस्तक एका डॉक्टरला अर्पण केलेय.. पण विचित्र कारणासाठी.