देव जाणे!

Submitted by मुग्धमानसी on 22 October, 2013 - 07:02

पूर्ण रात्रभर कोण सतत ते ठोकत होते... देव जाणे!
रात्रीत एका कुठले देऊळ बांधत होते... देव जाणे!

ठाक-ठूक, खाट-खूट छिन्नी हथोडा दगडमातीचा ढीग सारा...
कुठलं कायकाय खोल खोल ते गाडत होते... देव जाणे!

तोडत होते, कापत होते, खोदत होते सततच काही
लपवत होते स्वतःस की ते शोधत होते... देव जाणे!

लोखंडी गज, पितळी दारे खणा-खणा ती वाजत होती
कुणास नक्की तुरुंगात ते कोंडत होते... देव जाणे!

उंच मनोरे, प्रदिर्घ शिखरे... पहाटे परी कोसळणारी...
ठिसूळ भिंती घामाने का सिंचत होते... देव जाणे!

अशा वास्तूला छप्पर नाही, पाया नाही, नुसत्या भिंती
गाभार्‍याला देव कुठून ते आणत होते... देव जाणे!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अशा वास्तूला छप्पर नाही, पाया नाही, नुसत्या भिंती
गाभार्‍याला देव कुठून ते आणत होते... देव जाणे!<<

वाह्, क्या बात है! ही कविता आवडली Happy

आवडली

<<काहीतरी अतार्किक, अनाकलनीय असे भाव कवितेतून चांगले व्यक्त झालेत.>>

अतार्किक, अनाकलनीय? नसावे! एका रात्रीत नसतील; पण अल्प काळात देवळे, मशिदी उभा राहिलेली कधी पाहिली नाहीत ? त्याचेच हे वर्णन असावे.

़डोक्यात रात्रभर थैमान घालून झोपू न देणार्या विचारांविषयी मी बोलते आहे या कवितेतून. ़कविता एवढी दुर्बोध वाटू शकेल हे लक्षात आले नाही. ़क्षमा असावी.

*

*

*

*

*

मुग्धमानसी - सुरेख आहे कविता आणि निश्चितपणे अर्थपूर्ण आहे. "कोणाला" नसेल समजली तर त्यांचा तेवढा आवाका नाही असं म्हणून सोडून दे… क्षमा मागायच काही एक कारण नहिये.

अशा वास्तूला छप्पर नाही, पाया नाही,
नुसत्या भिंती
गाभार्याला देव कुठून ते आणत होते... देव जाणे!
व्वा ! सुरेख कविता .

या कवितेचा फॉर्म पहाता आपण गझलेसाठी जरूर ट्राय केले पाहिजे असे वाटते .

<<<मुग्धमानसी - सुरेख आहे कविता आणि निश्चितपणे अर्थपूर्ण आहे. "कोणाला" नसेल समजली तर त्यांचा तेवढा आवाका नाही असं म्हणून सोडून दे… क्षमा मागायच काही एक कारण नहिये.>>> + १

धन्यवाद!
सुशांत>> गज़ल लिहिण्याचा प्रयत्न केला हो मी. पण कविता जितकी सहज होते... गज़लेत तो सहजपणा रहातच नाही माझ्या! Sad

<<गज़लेत तो सहजपणा रहातच नाही माझ्या!>> हे ओळखू येणं खूप महत्वाचे आहे. प्रयत्न केल्याने आधी कृत्रिम वाटणार्‍या द्वीपदी लिहू शकतो. नंतर हळूहळू वृत्तबद्धता अंगवळणी पडली की अकृत्रिम द्वीपदी होऊ शकतात. सगळे शायर याच ध्यासात असतात की; "माझी प्रत्येक द्वीपदी सहजगत्या आलीय असे वाटले पाहिजे!"

छान आहे कुणालाही समजावी अशी सोप्पी आहे आणि आवडावी अशीही
<<देव जाणे >> असे केलेत तर अधिक उठावदार होईल आणि लयीलाही बरोबर राहील
अजून काही एक दोन जागी लयीसाठी तुरळक बदल केले की झ्झाले

गझलेसारख्या आकृतीबंधातली एक अप्रतीम कविता आहे ही फार आवडली

एक वेगळीच अभिव्यक्ती आहे,उल्हासजींशी सहमत, काहीतरी अतार्किक भाव आहेतच, अगदी रात्रभर चाललेलं विचारांचं वादळ असं कवयित्रीने म्हटलं आहे तरी कवितेत एक हवीशी गूढता आहे..