निसर्गाचा मेकओव्हर

Submitted by मयुरा on 21 October, 2013 - 05:07

हा काळ निसर्गाच्या मेकओव्हरचा. फक्त वरवरचा नव्हे. अगदी मुळापासुनचा.
आणि आपलं काय चाललंय?
तुम्हाला नाही वाटतं, पुरे झालं आता घराच्या खिडकीच्या चतकोर तुकड्यातून आभाळ बघणं...
दिवाणखान्यातल्या चौकोनी डब्यातलं कृत्रिम आभाळ बघत आभासी जगणं...
निसर्गाची प्रत्यक्ष अनुभूती न घेता भावनेने ओथंबलेले कोरडे एसएमएस पाठवणं.
ही तर कर्मदरिद्रयांची लक्षणं.
अरे, निसर्गातील वठलेल्या झाडाला सुद्धा वसतांच्या चाहुलीने नवपालवी फुटते. जिवंतपणा त्याच्या फांद्याफांद्यातून वाहू लागतो. रसरशित पाने उमलून उठतात.
मला सांगा, मोराला कसं समजतं पाऊस येणार असल्याचं? कोकिळेला कसं कळतं वसंत आल्याचं? कसं समजतं आंब्याला मोहोर फुलल्याचं? कडुनिंबाला कोवळी फुले आल्याचं?
भल्या पहाटे तिला देखील गावंसं वाटतं. साद घालावीशी वाटते.
मग आपल्यालाच काय झालंय हो?
आपण तर हाडामांसाची, निसर्गदत्त चेतनाशक्तीने ओतप्रोत भरलेली माणसं. मग आपल्याला कसा जाणवत नाही निसर्गाचा मेकओव्हर?
का नाही दिसत आपल्याला लालभडक बहाव्याने टाकलेला मांडव?
पायाखाली जांभळ्या जॅकरंडाने टाकलेला मखमली सडा?
फांद्या गायब करुन केवळ फुलंच उधळणारा गुलमोहोर?
दोस्तांनो, ही अनुभूती घेणं कोणा कवीची मक्तेदारी नाही. तुम्हाला आम्हालाही शक्य आहे ते. पण
त्याच्यासाठी आळस झटकावा लागतो. उबदार पांघरुणाचा मोह सोडावा लागतो. निग्रहाने भल्या पहाटे घराबाहेर पडावं लागतं. गाडी बाजूला सारावी लागते. पायी चालावं लागतं. बाहेर पडताना मोबाईल हमखास विसरुन जावा लागतो. घरापासुन थोडं लांब जावं लागतं. अजून तरी निसर्ग आपल्याला सोडून जंगलात निघून गेलेला नाही. नजरेला सुखावणारी हिरवाई बघण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत.
मी काय म्हणते, एकदा रुटीन ब्रेक करुन तर पहा.
जरा उठा आणि बाहेर पडा. आता गुलाबी थंडीच्या ऋतुचा पायरव सुरू होईल आता. तो ऐकण्यासाठी भली पहाट (आळशांसाठी रम्य सायंकाळ) हीच योग्य वेळ. हवेत सुखद गारवा असतो. कोकिळेची भुपाळी सुरु असते. साथीला पक्षांची किलबिल असते. पुर्वेला चुकार तांबड फुटू लागलेलं असतं. जिकडे तिकडे फक्त निसर्गायन सुरु असतं. मधून चालणारे आपण. वातावरण इतकं नि:शब्द असतं की आपलाच श्‍वास आपल्याला ऐकू यावा. खरं सांगते, या तंद्रीत किती चाललं ते लक्षात सुद्धा येत नाही.
चालता चालता मनातल्या तारा झंकारतात. एका कोपर्‍यात पं. भीमसेन जोशींचा दमदार आवाज घुमू लागतो. केतकी गुलाब जुही चंपक वन फुले...
मनाच्या दुसर्‍या कोपर्‍यात पं. जसराज गायला लागतात. सब राग बने बाराती....दुल्हा राग बसंत...
मग आशा भोसले गुणगुणू लागते..
वृक्षलतांचे देह बहरले फुलाफुलातुन अमृत भरले
वनावनातुनी गाऊ लागल्या
पंचमात कोकिळा.....
दोस्तांनो,
दोस्तांनो, हे सारं तुम्हालाही जाणवू शकतं.
मग काय, या रविवारी भल्या पहाटे एखाद्या पायवाटेवर नक्की भेटू या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users