आठवणी - नॅशनल पार्कस भटकंतीतल्या - भाग १ : येसोमिटी नॅशनल पार्क

Submitted by रायगड on 20 October, 2013 - 19:56

मध्यंतरी येसोमिटी नॅशनल पार्कवरचा लेख वाचला नी आमची या नॅशनल पार्कची ट्रीप आठवली नी त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षातील अमेरिकेतल्या विविध नॅशनल पार्क मधील भटकंती आठवली. देशामध्ये असताना कान्हा, रणथंबोर, बंदिपूर, रंगनथीट्टू, भरतपूर अशी अनेक जंगले धुंडाळून झालेली होती नी या नॅशनलं पार्कस च्या भटकंतीला मी फारच सोकावले होते. त्यामुळे अमेरिकेत आल्यावर इथली नॅशनल पार्क बघण्याची उत्सुकता होती. नी गेल्या दहा वर्षात ग्लेशियर, यल्लोस्टोन, ऑलिंपिक, येसोमिटी, डेनाली, बॅन्फ व जास्पर, ब्रायस कॅनयन, झायन ई. पालथी घातली.

ही लेखमाला म्हणजे या भटकंती मधल्या निरनिराळ्या आठवणींचा कोलाज!

१. येसोमिटी नॅशनल पार्क :

२००४ च्या ऑगस्ट महिन्यात आत्ये बहिणीकडे बे एरियात गेलो असताना २ दिवस येसोमिटीला (योग्य उच्चार यशोमती :D) कॅम्पिंगला जाण्याचे ठरवले. Little did we know then that this beauty can’t be justified in 2 days. ५-६ दिवस कॅलिफोर्निया ला आलेलो असल्याने ह्यापेक्षा अधिक वेळ जाणे शक्यच नव्हते.

पण गेलो नी अक्षरश: प्रेमात पडलो. २ दिवस स्वत: तर गाडीने पार्क जमेल तितका पालथा घातला. पण या अमेरिकेतल्या आमच्या पहिल्या वाहिल्या नॅशनल पार्क ची एक सुंदर आठवण मनात राहिल्ये - आज दहा वर्षानी देखील.

पहिल्या दिवशी भटकताना एके टिकाणी माहिती लावलेली पाहिली : Ranger led trek through the forest at dusk...वॉव! रात्रीचं जंगलात भटकायला मिळणार, बरोबर रेंजर नी ग्रुप मधील इतर लोकं असल्याने काही भीती पण नाही. मग त्याला जायचं नक्की करून रात्री जेवून खाऊन ८ च्या सुमारास त्या जागी जाऊन पोहोचलो. रेंजर बाईंनी सुरुवातीला छान माहितीपूर्ण talk दिला १०-१५ मिनीटं, नी मग आम्ही सर्व निघालो छोट्या ट्रेलला! फार नाही, अगदी १.५ - २ मैलाचा ट्रेल, प्रत्येक जागी थांबत तिथली माहिती देत ती आम्हाला घेऊन जात होती...अतिशय सुंदर अनुभव होता तो...पण त्याची उत्कटता गाठली ती शेवटच्या कार्यक्रमाने. एखाद तास चालल्यावर तिने आम्हाला एका मोकळ्या माळरानावर आणल. सर्वत्र अंधार झालेला एव्हाना. चारी बाजूंनी झाडं नी मधोमध मोकळे पठार अश्या त्या जागी सर्वांना स्थानपन्न व्हायला सांगून बाईंनी बासरी बाहेर काढली नी त्या बासरीच्या सुरांवर आम्हाला १०-१५ मिनीटं नुस्तं संमोहित करून टाकलं...काय जादूभरी वेळ होती...वर तार्‍यांनी भरलेलं नि:शब्द आकाश, आजूबाजूला जंगल नी आसमंतात पसरलेले ते बासरीचे सुर्...ती आठवण अजून मनात रेंगाळत्ये...१५ मिनीटांनी बासरी थांबल्यावर सर्वजण भानावर आले. परतताना सर्वजण नि:शब्दपणे त्या रेंगाळणार्‍या सूरांवरच आरूढ होऊन परतलो.

२ च दिवस येसोमिटीला असल्याने पार्क पूर्ण बघून पण झाला नाही....रुखरुखत्या मनाने परतलो ते ठरवूनच की यापुढे नॅशनल पार्कसना जायचे तर भरपूर वेळ घेऊनच्...असं थातुर मातुर नाही.

(त्यावेळी डिजीटल कॅमेरा नव्हता. तेव्हाचे फोटो आता कुठे आहेत ते सापडत नाही आहेत. त्यामुळे इथे फोटो टाकता आले नाहीत. फोटो बघायचे असतील तर वरच्या दुव्यावरील बस्केच्या लेखात बघा Happy पुढच्या नॅशनल पार्कसचे फोटोज टाके न. शिवाय १० वर्षांपूर्वी केवळ २ दिवस केलेया या ट्रीपमधले बाकी फारसे काही आता आठवत नाही, फक्त पार्क खूप सुंदर होता नी वर दिलेला अनुभव एवढच आता आठवतय!)

क्रमशः

पुढील भाग : http://www.maayboli.com/node/45966

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. तुझ्या भारतातल्या नॅशनल पार्क्सच्या अनुभवांबद्दलही लिही नंतर.

लेखाच्या सुरवातीला प्रत्येक पार्काची थोडक्यात माहिती आणि वैशिष्ट्य सांगितलंस किंवा निदान लिंक्स दिल्यास तर उपयोगी होईल.

पराग व रूनी - हो एकेका लेखात एकेक नॅशनल पार्क असाच प्लॅन आहे. कदाचित एका नॅशनल पार्क ला २ भागांत पण टाकावं लागेल! Happy धन्यवाद सूचनेबद्दल.

मामी व सानुली - आभार!

रायगड हे लेख तू ललित म्हणून लिहीतेय्स, त्यात प्रवासाचे अनुभव, अमेरीकेतील आयुष्य हे अजून ग्रूप सामील कर.