कदाचित-

Submitted by अलका गांधी-असेरकर on 17 October, 2013 - 06:43

कदाचित-

रावणा… तुझे जरा चुकलेच
जरा नाही… भरपूरच चुकले

तू विज्ञानाचा उपासक
महान तपस्वी
तुझ्या संपन्न नगरीची
वर्णने रामायणात …
दहा डोक्यांची
तुझी बुद्धिमत्ता

तरी बदनाम झालास
इतका, की इतक्या ग्रेट माणसाचे नाव
आपल्या मुलाला ठेवायचे धाडसच
कुणी माता करू शकणार नाही
इतका पद्धतशीरपणे बदनाम झालास ….
युगेयुगे शिव्या खात राहिलास
जळत राहिलास

कारण, दहा डोक्यांची बुद्धिमत्ता असुनही
तू गडबडलास
डोक्याचा वापर पुरता नाही केलास
डोके गहाण ठेवून करण्याचा
आज्ञाधारकपणा कुटुंबाला नाही शिकवलास

अन्यथा बिभीषण देखील गद्दार बनता ना
आणि वानर सेनेसमोर तू हरता ना ….

असो, पण चूक तीही नव्हती
खरी चूक वेगळीच होती
'परस्त्री मातेसमान'.. असते, हे 'आर्य'तत्त्व
तुला ठाऊक नव्हते

तू मंदोदरीशी कसाही वागला असतास
तिला जाळले अथवा पुरले असतेस
किंवा लंकेतून तिची हकालपट्टी केली असतीस
किंवा शाप देऊन तिला दगड केले असतेस
किंवा भर सभेत तिची निलामी केली असतीस
किंवा तिचे मुंडके उडवून टाकले असतेस
तर काही प्रश्न नव्हता रे …
तो तुझा हक्कच ठरला असता
तुझ्या जाज्ज्वल्य कीर्तीला
त्यामुळे तसूभरही बाधा आली नसती
जे काही करायचे असेल
ते स्व-स्त्रीबाबत करावं
हा साधा नियम जो तुला नाही कळला
तो आदर्श आम्ही युगेयुगे पाळला

पण परस्त्री रे … परस्त्री …
हातही न लावता तिची बडदास्त जरी तू ठेवलीस
निर्णयस्वातंत्र्याचा अधिकार तिला दिलास
म्हणून तू काही मोठा नाही ठरलास

परस्त्रीला काही करू धजू जाता
आजही बेड्या पडती हाता
पण स्वस्त्रीला कुणी जाचतो
तो त्याचा अंतर्गत मामला ठरतो
अन शेजारीही मध्ये न पडतो …

म्हणून म्हटलं बघ
तुझं जरा चुकलंच
साधा नियम विसरलास
अन्यथा आज कदाचित
घराघरातली मुले
रावणायन शिकली असती

ज्ञानाची, विज्ञानाची,
शक्तीची, संपन्नतेची
उपासक झाली असती

कदाचित ………….!

-अलका

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं! विचारांत पाडणारी कविता.
त्यात 'रावण' केवळ प्रतीक आहे हे समजून घेतले आहे Happy