येथे सुवास आहे

Submitted by निशिकांत on 16 October, 2013 - 03:54

नाहीस तू, तुझा पण येथे सुवास आहे
माझे म्हणून जगणे देवा झकास आहे

पंढरपुरी विठूचा म्हणतात वास आहे
दिंडीत भास होतो तो आसपास आहे

पोटास जाळण्याची चिंता पुरून उरते
म्हणतात देश अपुला करतो विकास आहे

आहे भणंग इतका मागे पुढे न कोणी
माझीच सावली पण अंधूक भास आहे

एकास गाठल्यावर नवखेच ध्येय दिसते
तृप्तीविनाच माझा चालू प्रवास आहे

भोगेन दु:ख माझे धावा नकोच देवा
मृत्त्यू करेल सुटका माझा कयास आहे

तू सत्त्य तेच सखये लिहिलेस आत्मवृत्ती
माझी तयात जागा कोरा समास आहे

ओढाळ या मनाचे कोडे, असून राजा
पण का गुलाम इतका राणीस खास आहे

"निशिकांत" सोड आशा फसव्या फिक्या सुखांची
राज्यात वेदनांच्या अपुली मिजास आहे

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोटास जाळण्याची चिंता पुरून उरते
म्हणतात देश अपुला करतो विकास आहे

एकास गाठल्यावर नवखेच ध्येय दिसते
तृप्तीविनाच माझा चालू प्रवास आहे<<<

शेर आवडले.

(विकास या शेरात असलेला उपरोध ही कित्येक उर्दू शेरांची 'जमलेली भट्टी' असायची हे आठवून गेले. उपरोधास्त्राचा वापर उर्दू गझलेत फार नित्यनेमाने केला गेला. गालिबच्या अनेक शेरात उपरोध भरलेला असायचा).

"निशिकांत" सोड आशा फसव्या फिक्या सुखांची
राज्यात वेदनांच्या अपुली मिजास आहे<<<

वा वा! (फसव्या आणि फिक्या या दोन विशेषणांची कितपत आवश्यकता आहे हे तपासले जावे असे वाटले).

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!