माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची...!

Submitted by चेतन.. on 15 October, 2013 - 02:30

माझ्या वेदनेला लाभो जोड तुझ्या वेदनेची...
तुझ्या वेदनेला लागो ओढ माझ्या वेदनेची....

वेदनेला जात नाही, वेदनेला धर्म नाही..
सारे विसरून जाती , वेदना ते वर्म वाही..
डोळ्यांतले अश्रू हाच, वेदनेचा पंथ आहे..
वेदनेला जिंकणारा, हाच खरा संत आहे...
साधू नाही, संत नाही, पाइक मी वेदनेचा...
अधू नाही, अंध नाही, सोशिक मी वेदनेचा...
तुझी वेदना नं काढो, खोड माझ्या वेदनेची... १

तुझं.. माझं.. असं काही, असू नये वेदनेत..
तुझं जे माझंही तेच, सोसू बये वेदनेत..
अश्या सोसण्याने कमी, धार होते वेदनेची...
धगसुद्धा कमी थोडी फार होते वेदनेची...
तळहाती घ्यावे थोड्या, गार झाल्या वेदनेला...
सांत्वनावरती राणी, स्वार झाल्या वेदनेला..
तुझ्या आसवांना मिळो, तोड माझ्या वेदनेची... २

सांजवेळी तळ्याकाठी, गाऊ गाणी वेदनेची..
दुनियेला ऐकवू गं, ही कहाणी वेदनेची..
भरभरून उधळू, दोघं साठा वेदनेचा...
काट्यानं निघतो म्हणे, राणी काटा वेदनेचा..
काटेरी ह्या वाटेवर, खुलवू गं वेदनेला..
पंगू जरी झाली तरी, चालवू गं वेदनेला...
आता अशा वेदनेला, तुझ्या माझ्या विना कोण??
वेदना तिथे नांदते जिथे नांदते गं मौन..
दोघे चाखूया गं फळं, गोड माझ्या वेदनेची... ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

..