आपण आणि मुखवटे

Submitted by मयुरा on 14 October, 2013 - 02:08

आपण उठसूट राजकारण्यांना दुटप्पी म्हणून हिणवतो. त्यांच्या नावाने बोटं मोडतो. आपण कमी दुटप्पी आहोत की काय? आपलेही अनेकदा खायचे एक आणि दाखवायचे वेगळे असतातच की... मग तरीही आपण इतरांना नावे ठेवतो. हे म्हणजे, आपला तो बाब्या आणि लोकांचे कार्टेच झाले की...

आपण सगळे सारखेच. आपण सगळे राजकारण्यांना दुटप्पी म्हणतो. त्यांचे खायचे एक आणि दाखवायचे वेगळेच असतात असं त्यांना सुनावतो. राजकारण आणि राजकारणी हा सार्‍यांच्या हक्काचा टाईमपासचा विषय. पण आपण तरी वेगळं काय करतो? आपण कमी दुटप्पी आहोत काय? आपण कधीच मुखवटे धारण करत नाही काय? आपण आपल्याला सोयीचं असेल तेव्हा कायद्यावर गप्पा हाणतो आणि वेळ आली की हळूच कायदा मोडत नाही काय?
हे प्रश्‍न विचारा बरं स्वत:ला आणि द्या त्याचं प्रामाणिकपणे उत्तर. मनातल्या मनात तरी खरं उत्तर ऐकायची आहे हिंमत?
नवरात्रीच्या पहिल्या माळेची गोष्ट आहे. कार्यकर्त्यांनी भरलेले टेम्पो, त्यातून मंडळाकडे नेली जाणारी मातेची मूर्ती आणि तिचा जयजयकार....हे त्यादिवशीचं कॉमन दृश्य होतं.
घरोघरी श्रद्धेने तिची प्रतिष्ठापना झाली. तिच्या भजनपूजनात दहा दिवस कसे गेले ते कळलंसुद्धा नाही.
एकीकडे शक्तीदेवतेविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा आणि दुसरीकडे स्त्रियांना मात्र सतत दुय्यम ठरवणारं वर्तन. त्यांना मिळणारी कस्पटासमान वागणूक. स्त्रियांचं विश्‍व बदलतंय खरं; पण हा बदल खूप वरवरचा आहे. तळागाळातील स्त्रियांपर्यंत त्याचंी चाहूलदेखील लागलेली नाही.
समाजात त्यांना समान दर्जा देण्याचं राहू द्या बाजूला, घरात तरी त्यांना मान देतो का? त्यांचं अस्तित्व मान्य करतो का? आपल्याच घरातले असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. ज्यावेळी आपण आपल्या बायकोला, मुलीला गप्प बसवतो, त्यांना कधीतरी शब्दसुद्धा बोलायला मनाई करतो. एखादीने धाडस केलंच तर...गप्प बस! तुला काय कळतं त्यातलं? बायकांचं डोकं चुलीपुरतं. तुम्ही आपलं स्वयंपाकघर सांभाळा...असं म्हणून तिचं तोंड बंद करतो. देवीची पूजा करणारे पण आपण आणि बायकांची अवहेलना करणारे पण आपण.
ती घरादारांचं बजेट सांभाळते. ती नवर्‍याने दिलेल्या पगारात घर चालवते. जमेल तसा संसाराला हातभार लावते. मुलांना तिच्यापरीने वळण लावायचा प्रयत्न करते. तरीही तिला सहज बिनडोक समजलं जातं. आर्थिक बाबतीत तिला काही कळणार नाही म्हणून गृहीत धरलं जातं. किती बचत केली आहे. पैसा कुठे गुंतवला आहे हे तिला सांगायचे कष्ट कोणीच घेत नाही. घेतलेच तर फक्त सांगितलं जातं. विचारलं जात नाही.
घरातील कारटा दिवसभर उंडारतो. रात्री कधीही घरी येऊ शकतो. मुलीला मात्र नियमांचा काच लावला जातो. त्याला ‘मुलींच्याच हिताचा’ मुलामा दिला जातो. घरातील सहचारिणीशी वाद घालून घरात आगमन झालेल्या शक्तीरुपिणीची आरती करायला आपण उभे राहतो.
एका घरातला प्रसंग आहे. घरात एकदम मोठ्या आवाजात महिलेला झापण्याचं काम चाललं होतं. तिच्याकडून आरतीच्या तयारीला उशीर झाल्यामुळे तिला चार शब्दांचा लाभ झाला होता. त्याला मात्र आरतीचा मान दिला गेला.
जे घरात तेच बाहेर.
देवीची मूर्ती नेतांनाही मुलं मधूनमधून अंबामातेचा गजर करत होती. पण तरीही एका सौंदर्याकडे बघून मात्र फक्कड शिट्टी मारली गेली.
विचारा बरं, देवीच्या जत्रेत महिला बिनधोक फिरल्या का? त्यांना गर्दीचा टिपिकल त्रास झालाच नाही का? त्यांना घराबाहेर पडायची चोरी का झाली?
आपण कधीच कोणत्या मुलीची छेड काढलेली नाही? कोणाकडे बघून कमेन्ट पास केलली नाही? एखादीकडे बघून शिट्टी मारलेली आठवतेय तरी का?
हे वयाचे लक्षण खरे. पण सगळ्यांचे हेतू तसेच नसतात हेच खरं दुखणं आहे. सगळेच तसे नसतात हेही खरं. पण मेजॉरिटीचा एक नियम असतो. दुर्दैवाने दुटप्पी वागणार्‍यांची संख्या जास्त आहे.
हा विषय एवढ्यापुरता मर्यादित नाही. ठरवलं तर अशी असंख्य उदाहरणं शोधता येतील. कोणत्याही कट्‌ट्यावर पाच मिनिटे जाऊन बसा. कोणत्याही गु्रपमध्ये गप्पा मारायला सामील व्हा. ज्येष्ठ नागरिकांच्या जगाचा कानोसा घ्या. एखाद्या महिला मंडळाच्या बैठकीला जाऊन बसा. सगळे जण कायदे मोडणार्‍यांच्या नावाने पोटतिडकेने आपले मत मांडत असतात. पैसे खाण्यात सगळेच कसे पटाईत आहेत यावर उच्चरवात चर्चा सुुरू असते. पोलिसांच्या नावाने लाखोली वाहिली जाते. शहर कसं बेशिस्त होत चाललं आहे. रोजच्या वाहतूक जामने कसा वैताग आणला आहे यावर तासन्‌तास चर्चा रंगते.
पण आपली गाडी पकडल्यावर मात्र पोलिसांनी पैसे घेऊन आपल्याला सोडून द्यावे असेच प्रयत्न सगळे करतात.याची त्याची ओळख सांगतात. पोलिसांवर दबाव आणायचा प्रयत्न करतात. त्याने आपल्याला कायदा शिकवू नये अशी सर्वांची अपेक्षा असते. आपण चुकलो आहोत..त्याचा दंड आपण भरलाच पाहिजे...असं आपल्याला कधीच वाटत नाही.
सत्संगात लोकांना सामाजिक शिस्तीचे पाठ पढवले जातात. लोकही भक्तीभावाने ते ऐकतात. सत्संग सुरू असेपर्यंत शिस्त पाळण्यासाठी सगळे आग्रही असतात. एका ओळीत बसतात. दुसर्‍याशी सौजन्याने वागतात. रांगेत चालतात. पण सत्संग सुटू द्या. या शिस्तीची सगळी ऐशीतैशी होऊन जाते. शिस्तीचा मुखवटा गळून पडतो. बेशिस्तीचा पूर येतो. मग वाहतूक जाम होते. पेट्रोलचा धूर होतो. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो. अशावेळी पाच मिनिटांपूर्वी पढलेले शिस्तीचे पाठ कुठे जातात?
आपलं हे वागणं दुटप्पी नव्हे काय? आपणही मुखवटाच लावला आहे. त्याचं काय?
कधीतरी आपल्यातील या दुटप्पीपणाचं सीमोल्लंघन आपण करणार आहोत की नाही? निदान यंदा तरी सच्चेपणाचं, समान दृष्टीकोनाचं, समन्यायी भूमिकेचं सोनं आपण लुटायला हवं. आहे आपली तयारी?
जिथे चूक असेल तिथे जरूर रोखायला हवे. मग चूक करणारा माणूस असो अथवा बाई. पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. एकाच्या चुकीकडे शक्यतो डोळेझाक केली जाते. तर दुसरीच्या चुकीचा काट्याचा नायटा होतो.
यातून नक्की मार्ग निघू शकतो. पण त्यासाठी सर्वांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. चांगल्यांना एकत्र यावं लागणार आहे. सकारात्मक शक्तींचे बळ वाढावे यासाठी प्रयत्न करायला लागतील. कोणाची साथ नाही मिळाली तरी थकून चालणार नाही. हार पत्करून भागणार नाही.
यात तिचीही साथ महत्त्वाची ठरणार आहे. माणसाच्या दुटप्पीपणाचा सगळ्यात जास्त त्रास तिलाच सहन करावा लागतो. समाजाच्या मानसिकतेत बदल व्हावा असं वाटत असेल तर तिचा तिलाच पुढाकार घ्यावा लागेल. देवीची कोणतीही पोथी अथवा कथा वाचा. बदल घडवून आणणारी प्रत्येक लढाई देवीनेच लढली आहे. तिने दुष्टांचा नायनाट केला. आपण कुप्रथा संपविण्यासाठी लढायला हवं.
माणसांचं दुटप्पी वागणं बदलेल की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. आपण दुटप्पी वागतो आहोत हे आधी मान्य व्हायला हवं. ते जाणवायला हवं.
बदल घडवायचा असेल तर मला तर बळ मिळावंच पण माझ्यासारख्या अनेकांना ते मिळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नरत व्हायला हवं. या नवरात्रीच्या निमित्ताने तेवढं तरी घडावं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

पण सत्संग सुटू द्या. या शिस्तीची सगळी ऐशीतैशी होऊन जाते. शिस्तीचा मुखवटा गळून पडतो. बेशिस्तीचा पूर येतो. >>> हे १०० दा तरी अनुभवलं आहे. आणि शिवीगाळही. बहुतेक ओवीनंतर शिवी दिल्याशिवाय हिशोब टॅली होत नसावा.

मयुरा, खरच छान लिहिल आहेस. देवीची पूजा करणारे पण आपण आणि बायकांची अवहेलना करणारे पण आपण.>>>> यात पुरुषमंडळींपेक्षा स्त्रियाच आघाडिवर आहेत. ऐकिव वगैरे नाही अनुभवाचे बोल आहेत हे. बाईच बाईची शत्रु असते म्हणतात ते खोट नाही.