दामिनी

Submitted by सुचेता जोशी on 13 October, 2013 - 18:32

नो नो सर ! वुई मस्ट हॅव टू टेक सम लिगल अ‍ॅक्शन."

रागाने लालेलाल झालेला चेहरा, हाताच्या मुठी टेबलाच्या काचेवर त्वेशाने आपटण्याचा अविर्भाव, केबिन बाहेर पोहोचणारा चढता आवाज हा अन असला तिचा अवतार गेल्या दहा एक वर्षात प्रिंन्सिपलसरच काय पण शाळेतल्या कुणाही विद्यार्थ्यांनी, मावश्यांनी, शिपायांनी, बस ड्राईव्हर्सनी, कँटीनच्या आंटींनी, शिक्षकांनी कुण्या पालकांनीही चुकूनही कधीही पाहिलेला कुणालाही आठवत नसावा.

दामिनी दिपक दंडवते
बी. एस. सी. बी. एड. मॅथ्स टीचर !
लॉरेन्स ईंटरनॅशल स्कूलची ६वी 'ब' ची वर्गशिक्षिका !

वय वर्षे ३५. सडपातळ बांधा, गौर वर्ण, पाठीवर कमरेपर्यंत रुळणारे काळेभोर कुरळे दाट केस तिच मुळचं सौंदर्य द्विगुणीत करत असत. शिक्षकी पेश्यामुळे चेह-यावर आलेलं सात्विकतेच तेज, काळ्याभोर टप्पो-या डोळ्यातल करारीपण, कडक स्टार्चच्या साडीतल लोभसवाणं रुप तिच्या व्यक्तिमहत्वात भरच टाकत असे. मुळात बोलघेवडा असलेला स्वभाव वाढत्या वयातील जबादारदारीच्या जाणिवेने किंचित अबोलतेकडे कललेला.

अशी ही दामिनीमिस कडक शिस्तीची असूनही विदयार्थीवर्गात मात्र भलतीच लोकप्रिय ! गणितासारखा
अवघड विषय इतक्या हतोटीन शिकवायची की ढ तला ढ विद्यार्थीही गृहपाठ नियमीतपणे करुन येत असे. आणि हो प्रत्येक आठवड्यातील शनिवारचा पहिला मूल्य- शिक्षणाचा तास म्हणजे ६ वी ब ला एका रंजक गोष्टीची मेजवानीच असे ! बिच्चारे विद्यार्थी, कडवट उपदेशाचे घोटही स्वतःच्या नकळत गोष्टींच्या स्वरूपात स्वतःच्याच गळी उतरवत.अर्थात त्यामुळे पालकही खुष !

पेपर तपासणे असो की कॅटलॉग वर्क, निकालपत्र तयार करण्याच किचकट काम असो की ओपनहाऊस मधील पालंकांसमोरचा प्रसन्न वावर, असेंबली असो की वर्ग, गॅदरींग असो अथवा २६ जानेवारीची प्रमुख पाहुण्यांची सरबराई प्रत्येक कामातील हिची सहजता वाखाणण्याजोगीच ! खेळाच्या मैदानावरही तितकीच तत्पर !

तर महत्वाचा मुद्दा हा होता की मधल्यासुट्टी पुर्वीचा तास संपण्याआधीच्या १५ मिनीटांत ६ वी 'ब' ची घाबरलेली ऋचा वर्ग मॉनेटरसोबत टीचर्स रुममधे रडत-रडतच येऊन धडकली होती. तशी ऋचा चंट, मस्तीखोर, सतत बडबडणारी वर्गभर हुंदडणारी गोंडस, हुशार पोर !

दामिनीचा तो तास ऑफच असायचा रोज . नक्की काय घडल असावं याचा कयासच बांधू शकत नव्हती दामिनी. तिने ऋचाला शांत करायचा कसोशीने प्रयत्न केला. काही दुखतय का विचारल, कुणाशी भांडण, चिडवाचिडवी सारं सारं विचारून झाल. तिच्या शेजारीच खुर्चीत बसवून डबा संपवायला बजावल पण कुठच काय ?ऋचाचा आपला एकच घोषा ' मला आत्ताच्याआत्ता आईकडे घरी जायचयं' . जाम घाबरली होती पोरं !

मधली सुट्टी संपल्यावर मात्र दामिनी तिला गायनाच्या रूममधे घेऊन गेली , तिथल प्रसन्न वातावरण, मिळालेला आश्वस्त एकांत, ऋचा बरीच मोकळी- बोलती झाली पण..... पण तिने कथन केलेला प्रकार ऐकून मात्र दामिनीचीच बोलती बंद होण्याची पाळी आली. तिच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली नुसती !
ऋचाची कशीबशी समजुत काढली तिने. तिला मॉनेटरच्या हवाली करुन तडक प्रिन्सिपॉलसरांची केबिन गाठली दामिनीने.

सर अनुभवी होते त्यांनी तिला बसायला खुर्ची दिली, पाणी मागवल नि तिच म्हणण शांतपणे ऐकून घेतल, हतबुध्द झालेल्या प्रिन्सिपलांनी शाळा सुटल्यावर सर्व शिक्षकांनी अर्जंट मिटींगसाठी थांबण्याच फर्मान काढल अन खेळाच्या शिक्षकांना ताबडतोब केबिनमधे शिपायाकरवी बोलावून घेतलं.

स्टाफरुममधे परतलेल्या दामिनीची अवस्था हवा काढून टाकलेल्या फुग्यासारखी झाली होती. तिचा मगाशीचा जोश कुठल्या कुठे पळून गेला होता. घडलेल्या घटनेने ती आयुष्याची पंचवीस एक वर्षे मागे गेली होती....विचारांनी !

साधारण चवथीत असेल ती, आई-बाबा दोघेही नोकरीत व्यस्त, तिचा वाढता अभ्यासक्रम , खेळण्यात अधिक लक्ष असे तिचे अभ्यासापेक्षा. व्हायचा तोच परीणाम झाला शेवटी. सहामाहीचा रिझल्ट ढेपाळला, गणिताखाली तर लाल रेघ ! झालं आई-बाबांच धाबच दणाणलं रिझल्ट पाहून. त्यांनी वर्गशिक्षिकांकडे चौकशी केली शिकवणीबद्दल अन गणिताच्याच गुरुजींकडे रोज संध्याकाळी एक तास जायचे पक्के झाले. आठवडाभर चांगला गेला . जाता-येता टिवल्या-बावल्या करत, चिंचा-गजगे गोळा करत पोहोचायचे अन रमत-गमत तासाभराने परतायचे. मात्र जस-जसे दिवस जायला लागले गुरुजींच्या वागण्यात
फरक पडायला लागला. त्यांचा हात हळू- हळू गणित समजावून देण्याच्या मिषाने मांडीवरच्या वहीच्या खालून स्कर्टच्या आत रेंगाळायला लागला. सुरवाती सुरवातीला बरेच दिवस काय चाललय काय नेमकं तेच कळालं नव्हत तिला पण जसजसशी कृतीतली वारंवारता वाढत गेली होती तसतशी जाणिवेची तिव्रताही वाढत गेली होती. मग काय दांड्या पडायला लागल्या होत्या तिच्या भरपूर शिकवणीला . खुप विचित्र वाटत असे. तिने एकेदिवशी मनाचा हिय्या करुन ही गोष्ट जशीच्या तशी बाबांना सांगितली होती. परिणामास्तव दुस-या दिवसापासून तिचे बाबाच तिच्या गणिताचा अभ्यास घ्यायला लागले होते ! कालांतराने विसरलीही होती ती हे सगळं.

पण वयाच्या वाढत्या फेजमधे हे गणिताचे गुरुजी कोणा ना कोणाच्या स्वरुपात अनेकवार भेटून गेले होते तिच्यातील न उमलेल्या भावविश्वाला कधी कंडक्टर काकांच्या रुपात , कधी शेजारच्या शिकत असलेल्या
डॉक्टर दादाच्या रुपात, कधी दुरच्या नातेवाईकाच्या रुपात तर कधी रीटायर्ड व्हायला आलेल्या संगित शिक्षकांच्या रुपात !

का वागत असावीत ही लोकं अशी इतकी विचित्र ? त्यांच्या जवळच्या नात्यातही अशा अजाण कोवळ्या मुली वाढत नसतील का? अगदीच शारीरीक नाही पण मानसिक पातळीवर झालेला हा कोवळ्या वयातील आघात मुलींच्या भावविश्वावर तत्कालिन का होईना घाला घालतच असणार ना? की मुलींनी फक्त 'होवू घातलेली एक स्त्रि' याच भूमिकेत दडपणाखाली जगावं सदोदीत ?

दामिनी निश्चयाने उठली तोंडावर सपासप हपकारे मारले तिने पाण्याचे..... नि निघाली मिटींग अटेंड करायला. तिला तीचं नाव निदान आजतरी सार्थ करुन दाखवायचच होतं !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गद्य लेखनाचा पहिला-वहिला प्रयत्न !
विषय कळकळीने मांडायचा होता परंतू तितक्या प्रभावीपणे मांडू न शकल्याची बोच राहीलच मनात .
दिलगीर आहे.
सुचेता.

।अ हम्म्म्म.....

चाईल्ड अ‍ॅब्युजचे प्रकार ओळखीच्या.... अतिपरिचयातील किन्वा नातेवाअ‍ॅकांकडून जास्त प्रमाणात केले जातात.

लेख आवडला..... मात्र अपूर्ण राहिल्याने मजा नाही आली.

सुचेता,

प्रत्येक स्त्रिच्या आणि मुलीच्या मनातल्या नको त्या आठवणी जागृत झाल्या असतील. पण त्यासोबत त्या विरुद्ध काही तरी केलं पाहिजे ही जाणीवदेखील जागृत झाली असेल.

दामिनीने काय केलं आणि त्या कलप्रिटला कशी शिक्षा केली तेदेखील लिहा ना.

चांगले लिहिले आहे.

अनेक स्त्रियांच्या नशिबी येणारी ही गोष्ट असणार. कथनाची शैली चांगली आहे. या कथेचा शेवट 'दामिनीने प्राचार्यांसकट सर्वांना फैलावर घेऊन आणि जाहीर नाचक्की करून त्या मुलीला न्याय व आत्मविश्वास मिळवून दिला' असा वाचायला आवडला असता.

थोडे अधिक स्पष्ट बोललेले चालणार असेल तर माझे मत मांडायचा प्रयत्न करतो.

दामिनीच्या रुपाचे वर्णन, शाळेचे / गावाचे नांव इत्यादी तपशील मूळ कथानकाशी तितकेसे संबंधित नाहीत. तेच पॅरा जर 'ती जी मुलगी आहे तिचे वागणे किती निरागस आणि अवखळ होते आणि त्या प्रसंगानंतर कसे अचानक ते निगेटिव्हली बदलले' यासाठी वापरले असते तर इंपॅक्ट अधिक आला असता. (आठवा - मिस्टर इंडिया या चित्रपटात जी सर्वात गोंडस आणि छोटी मुलगी आहे तिच्याबद्दल प्रेक्षकाच्या मनात अतीव स्नेह निर्माण करून मग नंतर एका स्फोटात नेमके तिलाच मारलेले दाखवलेले आहे. यातून प्रेक्षकाच्या मनावर सर्वाधिक प्रभाव पाडणे शक्य झाले).

हा विषय 'इतक्यात आटोपण्यासारखा' वाटत नाही, शक्य असल्यास अजुन दोन ते तीन भाग अवश्य लिहावेत.

शुभेच्छा व चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

लिखाण चालु ठेवा, खुप योग्य विषया ला हात घातला आहात,वल्लरि सागतात त्या प्रमाणे ...>>त्या विरुद्ध काही तरी केलं पाहिजे ही जाणीवदेखील जागृत झाली पाहिजे.

<<<<लेख आवडला..... मात्र अपूर्ण राहिल्याने मजा नाही आली.>>>>

<<<<दामिनीने काय केलं आणि त्या कलप्रिटला कशी शिक्षा केली तेदेखील लिहा ना.>>>>

<<<<या कथेचा शेवट 'दामिनीने प्राचार्यांसकट सर्वांना फैलावर घेऊन आणि जाहीर नाचक्की करून त्या मुलीला न्याय व आत्मविश्वास मिळवून दिला' असा वाचायला आवडला असता.>>>>

<<<<हा विषय 'इतक्यात आटोपण्यासारखा' वाटत नाही>>>>>

<<<<<लिखाण चालु ठेवा, खुप योग्य विषया ला हात घातला आहात,>>>>

<<<<<विषय संवेदनशील आहे पण पकड घ्यायच्या आत कथा संपली असे व्हायला नको.>>>>>

आपल्या प्रत्येकाच्या उत्साह द्विगुणीत करणा-या प्रतिक्रीयांनी प्रोत्साहीत होवून पुढील निदान दोन एक भाग लिहीण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मंडळी. Happy

धन्यवाद !

बेफिकीरजी,

आपल्या लिखाणातून तर प्रोत्साहन मिळतच मिळत परंतू आपण दिलेल्या मौल्यवान सुचना नजरेसमोर ठेवून पुढील भाग लिहीण्याचा प्रयत्न करेन.

खर तर दामिनीवर गुदरलेल्या काही विचित्र प्रसंगांवर लिहीण्याचा मनोदय होता माझा परंतू स्त्रिसुलभ संकोचाने मधेच कच खाल्ली मी पण म्हणूनच दामिनीबद्दल जास्त लिहील्या गेले, ऋचाच व्यक्तीत्व खुलवण्याच डोक्यातच नाही आल माझ्या.

आपली ऋणी,

सुचेता.

काय बोलू? प्रत्येक मुलिच्या मनातली व्यथाच लिहिलीत. नि:शब्द झालेय मी.
आपण फक्त आपल्या पुढच्या पिढिला या अशा घडणार्‍या प्रसंगाबद्द मोकळेपणाने बोलण्यासाठी सक्षम करू शकतो इतकंच. पुर्वी झालेल्या घटना आता बदलू शकत नाही, पण आपल्यावर झालेला अन्याय इतर लहानांवर होऊ नये यासाठी प्रयत्न करणं नक्कीच स्तुत्य आहे.

चांगला प्रयत्न, सुचेता.
बेफिकीर यांची प्रतिक्रिया पटली. काही आवश्यक तपशील ओझरते राहिले आहेत जसे की खेळाचे शिक्षक..
या विषयावर तपशीलात लिहायला मन घट्ट करावं लागतं, स्त्रीत्वातूनही अलिप्त व्हावं लागतं. खरं हेच आहे की हे सगळं वाचण्याचंही पुरेसं धैर्य आपल्यात नसतं कित्येकदा. फक्त हादरून जात रहाणं होतं , मी समजू शकते..ले.शु.

पहिला प्रयत्नं वाटू नये इतका चांगल जमला आहे, सुचेता.
बेफिकिर ह्यांच्याशी सहमत.
पण हा विषयच असा की, मुळात त्याचे डिटेल्स मनात-डोक्यात "जगवणं" अन त्यातले नेमके निवडून कथेत समाविष्टं करणं ही प्रक्रिया प्रचंड मानसिक त्रासाची आहे.
पण बेफी म्हणतायच्त तसे ह्या कथेचे अजून भाग यावेत असं वाटत नाहीये. हीच कथा अधिक प्रगल्भ करता येईल असं नक्की वाटतय. इथे देण्यासाठी नाही वाटलं तर नसू दे... पण स्वत:साठी तरी ह्या कथेवर अजून थोडं काम करता आलं तर बघशिल?
लिहीत रहा गं. तुझ्या लेखनाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.