नेमक्या वेळी नको ते आठवे

Submitted by मयुरेश साने on 7 October, 2013 - 00:36

हुंदक्यांनी लाख केली आर्जवे
सारखे ओठावरी हासू हवे

आसवांचा आडपडदा दूर कर
एकदा बोलून घे दु:खासवे

रंगलो नाही कधी जागेपणी
कोण देतो रंग स्वप्नांना नवे

छाटल्या फांद्या निराशेच्या किती
एवढेसे सूख आता पालवे

संप दंगा घोषणा झाल्या सुरू
जो इथे खाईल त्याला खवखवे

लोक सारे वाटती आता मला
पारधी निवडून देणारे थवे

लाट प्रेमाची नसे साधीसुधी
बेट प्रेमाचे तिलाही जाणवे

विसरणे असते तसे सोपेच पण
नेमक्या वेळी नको ते आठवे

....मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसवांचा आड पडदा दूर कर
एकदा बोलून घे दु:खासवे<<< व्वा! (आडपडदा हा एक शब्द असावा)

रंगलो नाही कधी जागेपणी
कोण देतो रंग स्वप्नांना नवे<<< (छान शेर आहे)

छाटल्या फांद्या निराशेच्या किती
एवढेसे सूख आता पालवे<<< व्वा! (शक्य तितक्या कमी सुटी घ्यावात असे आपले एक मत! तसेही, निराशेशी आशेचा अधिक घट्ट संबंध जाणवावा)

कृ गै न

-'बेफिकीर'!

आसवांचा आड पडदा दूर कर
एकदा बोलून घे दु:खासवे

विसरणे असते तसे सोपेच पण
नेमक्या वेळी नको ते आठवे

वा, मस्त शेर आहेत.

मतल्यात 'हासू' असे म्हणायचे आहे ना?

हुंदक्यांनी लाख केली आर्जवे
सारखे ओठावरी आसू हवे.........हासू वाचल रे Happy

आसवांचा आड पडदा दूर कर
एकदा बोलून घे दु:खासवे.........वा वा वा !

विसरणे असते तसे सोपेच पण
नेमक्या वेळी नको ते आठवे.........क्या बात ! अगदी अगदी

मस्त शेर !

-सुप्रिया.

हुंदक्यांनी लाख केली आर्जवे
सारखे ओठावरी हासू हवे

पाटिल साहेब लक्षात आणून दिल्या बद्दल आभारी आहे..

रिया +१

पारधी निवडून देणारे थवे<<< खूप वेगळे काहीतरी पण अजून नीटसे लक्षात आले नाही मला नेमके काय ते पण छान आहे खूप

पारधी निवडून देणारे थवे.....(पारधी ..म्हणजे मतांसाठी टपलेले स्वार्थांध राजकारणी आणी थवे म्हणजे तुम्ही आम्ही सारी त्यांना निवडून देणारी जनता)

पारधी सापळा रचतो जाळे टाकतो आणी पक्षांचा थवा च्या थवा पकडतो... राजकारणीही भूल थापांचे जाळे टाकतात आणी आपण भुलतो..आता तर काय जेवायला घालून कपडे वाटून मत विकत घेता येतात ..
या रुपकावर आधारीत एक विचार आला की सध्याचे राजकारणी कसे आहेत हे कळूनही आपण सारे नाईलाजाने त्यांना निवडून देतो म्हणून सारे लोक (माझ्या सकट)मला पारधी निवडून देणारे थवे वाटतात.

आसवांचा आडपडदा दूर कर
एकदा बोलून घे दु:खासवे

व्वा.

छाटल्या फांद्या निराशेच्या किती
एवढेसे सूख आता पालवे

खयाल चांगला आहे. शेर अधिक चांगला होऊ शकेल.
सूख खटकला जो सहज घालवता येईल, असे वाटते.

शुभेच्छा.

धन्यवाद मयुरेश अर्थ सांगीतल्याबद्दल आता नीट समजला तो शेर आता अधिकच छान वाटत आहे Happy

>>लोक सारे वाटती आता मला पारधी निवडून देणारे थवे
भारी...!

>>लाट प्रेमाची नसे साधीसुधी बेट प्रेमाचे तिलाही जाणवे
क्या बात!

>>विसरणे असते तसे सोपेच पण नेमक्या वेळी नको ते आठवे
अगदी..

छान