शंन्नांची कथा आणि भारलेलं सभागृह......

Submitted by मयुरा on 7 October, 2013 - 00:03

शंन्नांची कथा आणि भारलेलं सभागृह......
ती कथा आजच्या तरुणाईशी देखील रिलेट करणारी..तेव्हा श्रोत्यांमध्ये सगळे होते. काही तरुण होते. काही ज्येष्ठ होते. अधमुर्‍या वयाचे देखील काही श्रोते होते.
पण त्या सगळ्यांना त्या कथेत काही ना काही सापडलं होतं...
त्या श्रोत्यांमधील एक होण्याचं भाग्य मला लाभलं होतं...

ज्येष्ठ साहित्यिक शं.न्ना.तथा शंकर नारायण नवरे यांचं निधन झालं.
शंन्ना आजच्या तरुणाईला किती माहिती असतील किंवा नसतीलही. म्हणून काय झाले, त्यांच्या कथा मात्र निश्‍चितपणे आजच्याही तरूण पिढीशी रिलेट करतात.
मला आठवते एक कथा. ती त्यांच्याच तोंडून ऐकण्याचं भाग्य मला लाभलं होतं. शंन्नानी कथाकथन करताना ती कथा, त्यातील पात्रं समोर उभी केली होती. ऐकणार्‍याला वाटतं होतं हे सगळं आपल्याच बाबतीत घडतं आहे. ते ग्रेट परफॉर्मिंग आर्टिस्ट होतेच. कथा लक्षवेधी तर होतीच पण शंन्नानी ती कथन करताना तिला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली.
शंन्ना सांगत होते....त्या कथेचं मर्म असं होतं....
त्यादिवशी मला अचानक सिनेमा पहायचा मुड आला. माझं वय ज्येष्ठत्वाकडे झुकलेलं होतं. मग माझ्याबरोबर कोण येणार सिनेमाला? घरात विचारलं तर मुळ कल्पनेलाच सुरूंग लागला. अहो, काहीतरीच काय? मला नाही वेळ..असं ऐकवलं गेलं. मग काय, एकट्यानेच जायचं ठरवलं.
एका थिएटरात दर्जेदार इंग्रजी सिनेमा लागला होता. तोच मला पहायचा होता. सरळ उठलो आणि गेलो. तिकिट काढलं. सिनेमा सुरू व्हायला काहीसा अवधी होता. म्हणुन थिएटरच्या आवारात रेंगाळत होतो. आजूबाजूला ओळखीचं कोण दिसतं का ते पहात होतो.
त्या गर्दीत मला अचानक एक ओळखीचा चेहरा दिसला. मी थोडासा पुढे सरकलो. थोडंसं निरखून पाहिलं. मग लक्षात आलं, अरे तो तर माझ्या जीवलग मित्राचा मुलगा. त्याच्याबरोबर एक सौंदर्य देखील होतं. ते त्याच्याच बाजूला उभं होतं. माझ्या चेहर्‍यावर नकळत ओळखीचं हसू फुललं. त्या मुलानेही मला पाहिलं होतं.
त्याला त्या दर्जेदार सिनेमाला पाहून मला फार आनंद झाला होता. मुलं त्यांच्या मैत्रिणीला घेऊन दर्जेदार सिनेमा पहायला येतात हे दृश्य हळूहळू दूर्मिळच होऊ लागलं होतं....(हशा) पण माझ्या मित्राचा मुलगा त्याच्या मैत्रिणीला घेऊन त्या सिनेमाला आल्याचं पाहून मला फार आनंद झाला होता. तो त्याच्याशी शेअर करावा म्हणून मी पुढे सरकणार..एवढ्यात थबकलो. पाहतो तर काय, त्या मुलाने मला ओळखायचं चक्क नाकारलं होतं. त्याच्या चेहर्‍यावर पुटसशी देखील ओळखीची खूण नव्हती. मला वाटलं, चुकून झालं असेल. नसेल त्याच्या लक्षात आलं. म्हणून मीच पुन्हा हसून त्याच्याकडे पाहिलं. त्याने लक्षं नाहीसं दाखवलं आणि तो दुसरीकडे पहायला लागला. मला फारच आश्‍चर्य वाटलं. एरवी त्याच्या घरी आमचा गप्पाचा अड्डा तास न तास रंगायचा. तेव्हा हा माझ्या हातावर टाळ्या देऊन त्यात सहभागी व्हायचा. मग आजच नेमकं असं काय घडलं होतं?
आता मात्र मी पुढे सरसावलो. त्याला आपली ओळख करुन द्यायचं मी ठरवलं. त्याला माझे इरादे लक्षात आले की काय कोणास ठाऊक. पण मी त्याच्याजवळ पोचणार एवढ्यात त्याने सरळ मैत्रिणीचा हात हातात घेऊन पुढचा रस्ता पकडला....
मी थबकलो. क्षणभर विचार करायला लागलो. मग माझ्या लक्षात आलं, अरे हा त्याच्या सुंदर मैत्रिणीला घेऊन आला आहे. हे प्रकरण कदाचित घरात माहिती नसेल. त्याला एवढ्यात ते कोणाला सांगायचं नसेल. कदाचित ते एवढं सिरियस नसेल. ते सहजच टाईमपास म्हणून सिनेमाला आले असतील. कदाचित त्या मुलीच्या घरी हे माहिती नसेल. त्यांना एवढ्यात त्यांच्यात काही सुरू आहे हे सगळ्यांना माहिती व्हावं असं वाटत नसेल...
दोस्तांनो, या सगळ्या शक्यता खर्‍या होत्या. कारण हा काळ आजच्या तुलनेत साधारण २० वर्ष तरी जुना होता.
मला ओळख दाखवली असती तर त्याचं भांडं नसतं का फुटलं? म्हणूनच त्याने मला ओळख दाखवायचं चक्क नाकारलं होतं.
मित्रांनो, तात्पर्य काय तर आपणही कधी कधी कोणाला नको असतो...आपण ओळख दाखवू नये असंही कोणाला कधी कधी वाटू शकतं...
मी हसून सिनेमागृहात प्रवेश केला...
इथे कथा संपली होती. सभागृह विलक्षण भारलेलं होतं. प्रेक्षक टाळ्या वाजवायचं सुद्धा विसरले होते. त्यांच्यात तरूण होते..ज्येष्ठ होते...अधमुर्‍या वयाचे काही श्रोते होते...या सगळ्यांना त्या कथेत काही ना काही सापडलं होतं. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसू फुललं होतं. हे सामर्थ्य त्या कथेचं आणि शंन्नाच्या सादरीकरणाचं होतं. अनेकांच्या आयुष्यात असा प्रसंग नक्की घडलेला असणार..त्याचा अर्थ त्यांना तेव्हा उलगडला होता. कथेचं गारूड कमी झालं तेव्हा टाळ्यांचा दणदणाट झाला. लोकांनी उभं राहून शंन्नांना दाद दिली.
काहींनी आपणही आपल्या तरूण मुलांना किंवा त्यांच्या मित्रांना अशा प्रसंगी ओळख दाखवायची नाही असं ठरवून सभागृह सोडलं होतं.
शंन्नाच्या चेहर्‍यावर तेव्हा चमकलेलं मिश्किल आणि टिपिकल त्यांचंच हसू मी कधीच विसरणार नाही.
.....मला नेहमी भली माणसे भेटली किंबहुना मला भेटणारी माणसे भलीच वाटत गेली. मला जिथे जिथे आनंद मिळत गेला, तो आंनद मी इतरांना वाटत गेलो.....असे उद्गार त्यांनी दादर माटुंगा सांस्कृतिक केंदाच्या साहित्यरंग महोत्सवात बोलताना काढले होतेे..
तेव्हा सर्वाना ते पटले होते...

मयुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users