अकल्पित..

Submitted by प्राजु on 21 November, 2008 - 15:11

"सुमना, निघतो गं." रावसाहेबांनी सुमनाला म्हणजे त्यांच्या सुनबाईला हाक मारून सांगितलं.
"हो बाबा या. आणि हो, संध्याकाळी दाजी काका येणार आहेत तेव्हा ओफिसधून लवकर या. मी, सुशांतलाही सांगितलं आहे. तो ही संध्याकाळची त्याची डिप्लॉयमेंट उद्या करतो आहे. मी ही आज स्टुडीओतून लवकरच येणार आहे." सुमनाने, स्वतः चा डबा बॅगमध्ये ठेवत ठेवत सांगितलं.
"पण आज तू उशिरा निघाली आहेस का? कारण ८.३० वाजले गं" .. रावसाहेबानी विचारलं.
" हो.. आज ९.३० वाजता जाणार आहे मी. आज डेमो आहे क्लायंटला माझ्या डिझाईनचा. त्यामुळे डायरेक्ट तिकडेच जाईन. बर, तुम्ही निघा.. मी ही आता अंघोळ वगैरे आटोपून घेते." असे म्हणत सुमना आत वळली. रावसाहेब निघून गेले.
रावसाहेब म्हणजे अनंतराव पेठे, नामवंत वकिल. शहरात त्यांच्याबद्दल खूप आदर. पत्नी आनुसयाला जाऊन १५ वर्ष झालेली. मुलगा सुशांत खूपच लहान होता. पण त्यांनी दुसरं लग्न नाही केलं. सुशांत वयात आल्यावर आपल्या पसंतीने त्यांनी त्याचं लग्न सुमनाशी लाऊन दिलेलं. सुमनावर मुलीपेक्षा जास्ती माया त्यांची. सुमना घरी आल्या आल्या तिच्या हाती सगळं घर सोपवून "मुली, आता या घराबरोबर ही दोन बाळही सांभाळ तू." त्यांनी स्वतःचा आणि सुशांतचा उल्लेख बाळं असा केलेला पाहून सुमना खुदकन हसली होती.
सुमना इंटीरियर डिझाईनर होती. वयानुसार वेगवेगळ्या फॅशन्स करणे.. नटने .. मुरडणे..तिचा छंद होता. रावसाहेबांना तिचं खूप कौतुक होतं.
रावसाहेब गाडीत बसले.. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. आजूबाजूला तुरळक दुकानं उघडली होती. कोणी रस्त्यावर पाणी मारत होतं. कोणी रस्ता झाडून काढत होतं. दूधवाले दूधाचे कॅन घेऊन त्यांच्या दूधावाला स्पेशल एम ए टी गाडीवरून निघाले होते. १० मिनिटे अशीच गेली. आज कोण कोण अशील येणार आहेत भेटायला असं म्हणत त्यांनी आपल्या ब्रिफकेस मधून डायरी उघडली. "देवदत्त माने.. ९.१५ वाजता... अरे!!!!!!! छे!! अरे, पांडू, जरा गाडी घराकडे वळव रे. मान्यांची फाईल स्टडीरूममध्येच राहिली काल रात्री. घेऊन जाऊया. त्यांचीच पहिली आपॉईनमेंट आहे."
"घेतो सर.." म्हणत पांडूने गाडी वळवली.
-----
घरी आल्यावर त्यांच्याकडे असलेल्या लॅच कीने त्यांनी दार उघडलं आणि ते स्टडीरूमकडे निघाले. हॉलमधून डाविकडे वळले. आणि वाटेत असणार्‍या सुशांत्-सुमनाच्या बेडरूमकडे सहजच त्यांचं लक्ष गेलं....... आणि....... ते तिथल्या तिथे थिजले...
सुमना.. ......नुकती अंघोळ करून आलेली.. केस पुसत.. ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर पाठमोरी उभी... .. फक्त टॉवेलमध्ये. ती तिच्याच नादांत गुणगुणत्..घरात कोणीही नाही या समजूतीने बिनधास्त होती. तिचे नितळ पाय.. तिची ओली पाठ.. ओले केस.. रावसाहेब क्षणभर भान हरपल्यासारखे बघतच राहिले. "छे!!! छे!!! काय हे.... श्शी!! " वीज संचारावी तसे ते पटकन तिथून बाजूला झाले. हॉल मध्ये आले आणि डोळे मिटून सोफ्यावर बसून राहिले. आपण हे काय केलं...?? अनुसयाबाई गेल्यापासून कोण्याही स्त्रीस्पर्शापासून दूर राहिलेले.. मोहावर विजय मिळवलेल रावसाहेब आज एकदम सुमनाचं सौदर्य पाहून विचलीत झाले होते. सारखी त्यांच्या डोळ्यासमोर सुमना येत होती.. टॉवेलमध्ये अर्धवस्त्रांकित... तिचं ते स्वतःच्याच मस्तीत गुणगुणणं.. केस झटकणं.. मानेवर, छातीवर पाठीवर क्रिम लावणं .. त्यांच्या नजरेसमोरऊन जात नव्हतं.... बराच वेळ ते तसेच बसून होते.. "हे पाप आहे.. हे पाप आहे.. असं नकोय व्हायला".. मन सारखं समजावत होतं. पण जे पाहिलं होतं.. ते विसरणं केवळ अशक्य होतं..
"सर.. जायचं का?" पांडूने आत येऊन विचारलं.
"अं.... अं.. हो.. हो. आलोच" म्हणत रावसाहेब उठले. कसलीशी चाहूल लागल्याने सुमना बाहेर आली. मरून रंगाचा स्लिवलेस सल्वार कमिझ आणि त्यावर काळि ओढणी.. केस ओलेच होते अजून.. रावसाहेबांना आज सुमना किती रेखिव आहे हे जाणवलं. त्यांना आज ती विलक्षण सुंदर दिसत होती. ते तिच्याकडे पहातच राहिले.
"हे काय बाबा, तुम्ही परत कधी आलात?? काही राहिलं का?" सुमनाने गोंधळून विचारलं.
तिच्या आवाजाने ते भानावर आले. "अं.. हो. अगं ती मानेंची फाईल राहिली स्टडीरूम मध्ये."
"थांबा मी आणून देते." म्हणते सुमना गेली आणि ती फाईल घेऊन आली. ती फाईल रावसाहेबांसमोर धरत ती म्हणाली,"ही घ्या."..... "बाबा... अहो बाबा.. ही घ्या ना फाईल". रावसाहेब भानावर आले. फाईल घेत असताना सुमनाच्या हाताला त्यांचा स्पर्श झाला. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.. तो स्पर्श त्यांना हवाहवासा वाटू लागला.
"सुमना.......... अगं........" रावसाहेब बोलता बोलता थांबले.. "...... काही नाही..येतो मी"
"बाबा.. काय झालं?? काही होतय का?" सुमनाने विचारलं.
"नाही काही नाही.." एक सुस्कारा टाकत रावसाहेब वळले. दरवाज्यातून बाहेर पडताना त्यांनी एकवार सुमनाकडे पाहिलं.... त्यांची नजर.. काहीतरी वेगळी होती आज.. सुमनाला हे जाणवलं. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते रावसाहेब.. काय असेल बरं?? सुमनाने घड्याळ पाहिलं.. आणि तीही आवरायला गेली.
दिवसभर रावसाहेबांसमोर पाठमोरी सुमनाच येत होती. जितकं ते लक्ष कामावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते तितकी ती जास्त आठवत होती. मेंदू सांगत होता.. नाही हे योग्य नाही, ती तुझी मुलगी आहे.. पण मन ऐकायला तयार नव्हतं. स्वतःला आरशात न्याहाळत असलेली सुमना.. केसांवरून हात फिरवणारी सुमना.. हात वर उंचावून केसांवरून ड्रायर फिरवणारी सुमना.. हाता-पायावर मन लावून क्रिम लावणारी सुमना.. आणि शेवटी त्या मरून काळ्या रंगात खुलून दिसणारी सुमना.. तिची नाना रूपं त्यांच्या समोर येऊ लागली.. लक्ष कुठेच लागत नव्हतं. कोणीतरी गळा घोटतं आहे असं वाटायला लागलं. मनातली मळमळ बाहेर पडत नव्हती. इतक्यात फोन वाजला.सुमनाच होती फोनवर. "हॅलो, बाबा.. अहो किती वाजले?? लवकर येणार होतात ना? दाजीकाका येतील इतक्यात.. निघा बघू लवकर." सुमनाने भडिमार केला. "अं.. हो. निघत निघतो." म्हणत ते फोन ठेऊन उठले.
घरी त्यांचा भाऊ म्हणजे दाजीकाका.. आलेले होते. गप्पा रंगत होत्या. चेष्टामस्करी चालू होती. पण सुमानाकडे पाहण्याचे रावसाहेब टाळत होते. सुमानाच्याही हे लक्षात आलं. चुकुन काही देताना घेताना सुमनाचा स्पर्श झाला तर.. .. चटकन हात काढून घेत बाजूला. तिचं लक्ष नसताना तिच्याकडे पहात.. पण तिच्याशी नजरानजर करण्याचं टाळत होते.. सुमनाला जाणवलं.. काहीतरी वेगळ आहे आज. काहीच समजत नाहिये. बाबा नेहमी सारखे नाहियेत. त्यांची नजर.. नजरेत काहीतरि वेगळं आहे.. आपल्या हाताला स्पर्श झाला तर चटकन हात बाजूला घेणं... नक्की काय झालंय..?
जेवणं झाल्यावर ती आवरा आवरी करत होती. रावसाहेब स्वयंपाकघरात आले.. "सुमना.......... आज सकाळी फाईल विसरली आहे हे लक्षात आल्यावर मी लगेचच आलो होतो घरी......................"
"बाबा.............................." सुमना तिथल्या तिथे थिजली. रावसाहेबांच्या वागण्याचा अर्थ तिच्या लक्षात आला होता.
"शक्य झाल्यास मला माफ कर...." राव साहेब त्यांच्या खोलीत निघून गेले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुसरे दिवशी सकाळी..
"काल पर्यंत तर सगळं नीट होतं गं.. आज एकदम काय झालं हे" सुशांत रडत होता..सुमना सुन्न होऊन बसून होती आणि समोर रावसाहेबांचं कलेवर चेहर्‍यावर अपराधी भाव घेऊन पडून होतं.

(डिस्क्लेमर : कथेतील पात्रं पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणाला त्यांचा स्वतःशी संबंध वाटला तर लेखिकेला दोष देऊ नये.)

- प्राजु

गुलमोहर: 

प्राजु, आत्ताच मिपावर तुझी ही कथा वाचली..अ प्र ति म !! कुठेही फापटपसारा न होता छान उतरलीये !!
तुझी लेखणी काव्यासोबतच गद्यातही सहजसुंदर विहरतेय.... पुढच्या लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा !!

चलो मि.पा. कर आपली प्रतीभा इकडेही खुलु दे ! शुभेच्छा !
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

प्राजू, बहोत अच्छे! अगदी अथ-पासून्-इति पर्यंत, सुरेख. नेमक्या शब्दांत कितीतरी. (मला फापटपसारा न घालता असं लिहिता येत नाही Sad )
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

प्राजु,
छान लिहीलंयस. Happy
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

अप्रतिम लिहिलं आहे? प्राजु पुधच्या लिखाणासट्।ई खुप शुभेच्छा !!!! Happy

अनघ
------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

समोर रावसाहेबांचं कलेवर चेहर्‍यावर अपराधी भाव घेऊन पडून होतं. >>> म्हणजे रावसाहेब गेले का ???

छे हो , तुमच्यात कलेवर कशाला म्हणतात ??

खरतर मला ह्या शब्दाचा अर्थ नाहिये कळाला.... Sad

छान लिहिलं आहे...

पण.... डिस्क्लेमर मधलं वाक्य थोडंसं खटकलं...

"...तर लेखिकेला दोष देऊ नये."

याऐवजी,

"...तर निव्वळ योगायोग समजावा." असं नेहमीचं वाक्य सुद्धा चाललं असतं. माफ करा, पण तुमचं वाक्य थोडंसं आगाऊपणाचं (rude या अर्थी, गैरसमज नसावा.) वाटतं.

-योगेश-

सर्वांना मनापासून धन्यवाद.

अहो.. तेच ते डिस्क्लेमर वाचून कंटाळा येतो लोकानाही म्हणून थोडासा आगाऊपणा करून बघू म्हंटलं. इतकंच. जास्ती मनावर घेऊ नका. Happy

प्राजु

खुपच छान आत्ताच वाचली आनि तुझा आगाऊपणाही,
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

चांगली लिहिली आहे.
डिस्क्लेमर बाबत योगींशी सहमत. गोष्ट हलकीफुलकी नाही आहे, त्यामुळे दुसरं वाक्य अनावश्यक वाटलं.

आरती,

कलेवर = मृत शरीर / प्रेत / पार्थिव / शव

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

प्राजु,
छान आहे कथा आणि लिहीण्याची पध्दत ... आवडली.

प्राजु,
छान आहे कथा. आवडली. Happy
पण हे मि.पा काय आहे?

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

पण हे मि.पा काय आहे?<<< ती वडापावची नातेवाईक आहे. Proud