कुठला प्रकार आहे?

Submitted by निशिकांत on 4 October, 2013 - 00:07

नगदीत "ना" तुझी अन् "हो" का उधार आहे?
हा प्रेम दावण्याचा कुठला प्रकार आहे?

तू नेहमी शिकारी अन् मी शिकार आहे
घायाळ होत जगणे जडला विकार आहे

बाहूत एवढा मी असतोय धुंद तुझिया
मृत्त्यू खुणावतो पण देतो नकार आहे

रागावणे, अबोला मी झेलतो खुशीने
नक्की तुझ्या मनीही ओली कपार आहे

चुचकारले सुखाला वश ते कधी न झाले
दु:खास हासण्याची विणतो किनार आहे

का कर्मकांड करुनी फाल प्राप्त होत असते?
सूर्यास अर्घ्य पण मी देतो त्रिवार आहे

बुजवावयास भेगा, कसला करू गिलावा?
दोघात फार मोठी पडली दरार आहे

कळपात श्वापदांच्या जगलो निवांत होतो
शेजार माणसांचा मोठा जुगार आहे

भक्तास शोधताना याचक विठूस दिसले
स्वार्थात अंध जो तो जगतो भिकार आहे

"निशिकांत" ओळखावे पंखातल्या बळाला
भाग्यावरी तुझी का इतकी मदार आहे?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक शेर छान आहेत

जुगार काफिया शेरात हाच हवा होता का की दुसरा चालला असता असे वाटले
कपार ह्या काफियास नीट न्याय मिळाला नाही असे वाटले
दुसरा शेर हुस्ने मतला नसता तर अधिक छान झाला असता का असे वाटले
अजून बरेच काही वाटले पण मला उगाच काहीही वाटते असे वाटेल की काय असे वाटले म्हणून इथेच थांबतो
असो.....
मतला व मक्ता सर्वाधिक छान वाटले ...:)

एकंदर इतकेच की गझल बरीचशी काफियानुसारी वागते आहे

धन्यवाद काका