स्वप्न होते कोवळे

Submitted by मृण_मयी on 3 October, 2013 - 01:02

स्वप्न होते कोवळे अन्‌ वय जरी निष्पाप होते
भंगण्याचे ह्यास, त्याला वाढण्याचे शाप होते

ठरवुनी काही कधीही चूक केली जात नाही
तोल सुटतो, भान जाते, सर्व आपोआप होते

का तुम्हाला वाटते, माझ्यात विष त्याने भिनवले?
माझिया गात्रातही लाखो अनावर साप होते

रक्तरंजित पावले होणार हे ठरलेच होते
उंबर्‍यावर स्वागताला कंटकांचे माप होते

कोण कुठली मृण्मयी, मीरेस येथे विष मिळाले
कृष्णभक्तीचे जिच्या हातून घडले 'पाप' होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठरवुनी काही कधीही चूक केली जात नाही
तोल सुटतो, भान जाते, सर्व आपोआप होते<<< व्वा वा

का तुम्हाला वाटते, माझ्यात विष त्याने भिनवले?
माझिया गात्रातही लाखो अनावर साप होते <<< मस्त

ठरवुनी काही कधीही चूक केली जात नाही
तोल सुटतो, भान जाते, सर्व आपोआप होते>>> अप्रतिम शेर

सापही छान!

व्वा. गझल फार आवडली.
विचारांतील सफाई शिकण्यासारखी आहे.

ठरवुनी काही कधीही चूक केली जात नाही
तोल सुटतो, भान जाते, सर्व आपोआप होते....कित्ती सहज ...व्व्व्वा !

का तुम्हाला वाटते, माझ्यात विष त्याने भिनवले?
माझिया गात्रातही लाखो अनावर साप होते.............मस्त मस्त !

दुसरा आणि चौथा सर्वात विशेष वाटले.

"का तुम्हाला वाटते, माझ्यात विष त्याने भिनवले" >> हे लयीत वाचताना काहीसे अडखळल्यासारखे झाले.
(कदाचित मला नीट वाचता आले नसेल.)

छान