बोल ना जरा....

Submitted by मुग्धमानसी on 2 October, 2013 - 03:28

अवघड अवघड बोलत असते
तरी मला मी सांगत असते
बोल जरासे माणसातले
राहूदे जरा काळजातले
स्पर्शांमधली अतर्क्य कळकळ
डोळ्यांतील नेहेमीची खळबळ
श्वासांमधले उष्ण उसासे
हृद्यी घुमती पोकळ वासे
कधी पहाते नुसते भेदक
कधी हासते विषण्ण सूचक
कसे कळावे सांग कुणाला
सर्व इंद्रिये लाव पणाला...

गाठ जरासे शब्दही कधी
ऐक मनाचे सांगही कधी
बोल कधीतरी बोल ना जरा
ओठही कधी खोल ना जरा
सोपे सोपे जोड शब्द अन्
ओव अर्थ त्यातून भाबडा
खोल, गूढ, अन्वयार्थ सारे
टाक! ठेव तो शब्द रांगडा!

हळवे कातर अशक्य काही
सदैव धुमसत काचत असते
आत कुणीतरी सदा सर्वदा
स्वप्न फाटके टाचत असते
’त्यास’ एकटे सोड कधीतरी
खोड स्वतःची मोड कधीतरी
तूच तुला दरडावून काही
सांग, "मी अशी अवघड नाही."

भांडावे तर भांडावे ना
भडभड सारे बोलावे ना
सूख वाटले, दुःख वाटले
बहर उमलला, मळभ दाटले
कशास उपमा कठीण प्रतिमा
आणि विनवणे... "समजून घे ना!"

भिड अशी जा समोर त्याच्या
सोड मोकळी भिडस्थ वाचा
"मी ही अशी... चालेल का तुला?
तुझेच मन... समजेल ना तुला?
नाहितर सोड... बिन्धास्त मोड...
जोडायचं जोड किंवा आत्ताच तोड."
डोळ्यांत प्राण-बिण आणायचे नाहीत
आवंढे-बिवंढे गिळायचे नाहीत
रस्ते झालेच वेगळे तर
विस्कटलेच जर सगळे तर
जाता जाता सोबत निदान
समजुतदार शब्दांचं घेशील दान
"उपयोग नाही" म्हणशील कसे?
शब्दच उराशी धरायचे असे...

ठरलंच आता... बोलायचं...
"आहे फिकीर!"... सांगायचं!
"आज काय झालं माहितीय?" म्हणत...
तुंबलेलं अलवार खोलायचं!
हळूहळू निवळेल गं...
काळीज सुद्धा उकलेल गं...
बोलता बोलता कधीतरी
अंतर सगळं जवळेल गं...
अंतर सगळं जवळेल गं...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__

mastach

धन्यवाद!
सखी-माऊली>> हो गं. खरंच खूप दिवसांनी मा.बो.वर येऊन हायसं वाटतंय. आजारपणानी कंटाळून गेले होते.

खूप सुंदर .मस्त अटीट्यूड .

हळवे कातर अशक्य काही
सदैव धुमसत काचत असते
आत कुणीतरी सदा सर्वदा
स्वप्न फाटके टाचत असते

मी फ्लॅट झाले... पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा वाचत राहावी अशी.... श्वास गोठून शेवटी एक उसासा टाकत.... अव्याहतपणे....
नि श ब्द!!!!

वाह! Happy