तुला तर पाहिजे श्रावण!

Submitted by प्राजु on 30 September, 2013 - 11:04

नको प्राजक्त देऊ तू मला सजवावया अंगण
जमीनीला तडे माझ्या तशातच माजलेले तण

न आंब्याचे न झेंडूचे, न मोत्यांचे न नक्षीचे
कधीचे बांधलेले मी मनाला बाभळी तोरण..

बर्‍यापैकी अता पडले मनांमध्ये पहा अंतर
कशाला वेगळे होण्या उगा तू शोधसी कारण??

कधीची वाट बघते मी, अता ना सोसवे काही
कधी पासून रे मरणा, तुलाही लागते अवतण??

बरसते मी कधी केव्हा, खुळ्या वळवापरी लहरी
भरवसा काय देऊ मी, तुला तर पाहिजे श्रावण!

कधी आले, समजले ना, कधी गेले, समजले ना!!
सुखानेही व्यथेचे रूप केले वाटते धारण!

अताशा वाटते गोडी, सवे तुमच्याच जगण्याची
पहा एकांत दु:खांनो तुम्हा केलाय मी अर्पण !

भिडावे वाटते 'प्राजू' तुला, तर त्या व्यथेपाशी
कशाला आत्मविश्वासास तू मग ठेवले तारण??

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुखानेही व्यथेचे रूप केले वाटते धारण<<< सुरेख शेर!

बर्‍यापैकी अता पडले मनांमध्ये पहा अंतर
कशाला वेगळे होण्या उगा तू शोधसी कारण??<<<

उत्तम!

संपूर्ण गझल एका 'खास गझलेच्या' मूडमध्ये झालेली दिसते.

गझल आवडली. अनेक ओळीही आवडल्या.

अनेक शुभेच्छा! Happy

-'बेफिकीर'!

नको प्राजक्त देऊ तू मला सजवावया अंगण
जमीनीला तडे माझ्या तशातच माजलेले तण

व्वा.

कधी आले, समजले ना, कधी गेले, समजले ना!!
सुखानेही व्यथेचे रूप केले वाटते धारण!

पहिली ओळ अधिक सुलभ वाटली.
दुस-या ओळीत व्यथा (म्हणजे वेदना) ऐवजी दु:ख योग्य वाटले असते कदाचित.
अवतण आणि श्रावण प्रेडिक्टेबल शेर वाटले.
शेवटच्या शेरात व्यथेपाशी की व्यथेशी, असा प्रश्न पडला.

शुभेच्छा.

बर्‍यापैकी अता पडले मनांमध्ये पहा अंतर
कशाला वेगळे होण्या उगा तू शोधसी कारण?? उत्त्त्तम ग!

कशाला वेगळे होण्या नव्याने शोधसी कारण??

असा वाचला हा मिसरा Happy

अवतण, श्रावणही आवडले .

सुंदर गझल .

मतला आणि धारण हे शेर फार आवडले.

मतल्यात 'सजवावया' ह्या द्राविडी प्राणायामाऐवजी 'सजवायला' योग्य ठरले असते. सहज सांगीतले, कृगैन.

बर्‍याच सुट्या ओळीही आवडल्या.

सुपर्ब गजल....

कधी आले, समजले ना, कधी गेले, समजले ना!!
सुखानेही व्यथेचे रूप केले वाटते धारण! >>>>> हे फारच आवडले ......

अख्या गझलेत मला मनापासून एकच बदल सुचवावा वाटला जो कणखरजींनी सांगून झालाच आहे
बाकीचे अनेक शेर अजून छान झाले असतेही कदाचित पण असो ...आहेत तसेही आवडलेच आहेत शिवाय मला हल्ली स्वतःलाच काही सुचत नाहीये मग कुणाला कशाला बदल सुचवून द्यायचे उगाचच नाही का !! Happy

(व्यथा बाबत समीरजी +१)

धारण हा शेर सर्वोत्तम वाटतो आहे मतलाही फार छान प्राजक्त म्हणताना तूच मनःचक्षूंपुढे उभी राहते आहेस माझ्यातरी ..म्हणून हा शेर फार आवडला ( आय मीन तखल्लुसाच्या शेरासारखी मजा आली )

दुसर्‍या शेराची पहिली ओळही मस्त ..दुसर्‍या ओळीबाबतची उत्सुकता फार छान ताणून धरलीस मला तरी फार आवडले मजा आली

पण जे काही परखड बोलल्या वाचून राहवत नाही आहे एका वाक्यात सांगू का ?? कधीचे ..कधीपासून कशाला कशाने हे शब्द वरंवार येत गेल्याने मजा कमी झाली इतकेच एकंदरीत इंप्रेशन माझ्या मनावर पडले आहे ह्या गझलेचे

जय जी ह्या गझलेत रदीफ नाही अश्या गझलेला गैरमुरद्दफ म्हणतात बहुतेक