माझे बालपणीचे साथीदार:

Submitted by paluskar on 19 November, 2008 - 11:53

मला आवडलेली पुस्तकं:

वाचनाचा छंद तसा लहानपणापासून आहे. वाचताही येत नव्हतं त्या वयापासून माझ्याकडे माझी पुस्तकं होती. माझी अंकलिपी मला अजून लक्षात आहे. ‘आरूणि आणि ईतर गोष्टी’ मधल्या सर्व गोष्टी वाचता येत नसतानाही आईकडून ऐकून पाठ झाल्या होत्या. चांदोबातली चित्रं , श्रावणातल्या कहाण्यांच्या संग्रहातली चित्रं अश्या चित्रमय पुस्तकांतून आईचं बोट धरून माझा वाचनप्रयत्न सुरू झाला . श्रावणातल्या कहाण्या म्हणजे चित्रविचित्र गोष्टींचा जणू खजिनाच. अजूनही श्रावणात लहान होवून आईच्या कहाण्या ऐकाव्यात असं वाटतं.

माझ्या शाळेत , म्हणजे बालमोहन विद्यामन्दीरमध्ये , बक्षिस म्हणजे पुस्तके द्यायचीच पद्धत होती. वार्षिक परिक्षेमध्ये प्रत्येक तुकडीतल्या पहिल्या दहा नंबरांना , प्रत्येक विषयातल्या हाय्येस्ट मार्क मिळवणार्या मुलांना , अशी भरपूर बक्षिसांची रेलचेल असे. पण बक्षिसं म्हणजे कुपन्स असत. कुपन घेउन आयडियल बुक डेपोमध्ये जायचं आणि मनासारखी पुस्तकं खरेदी करायची. तिथे गेल्यावर बहुदा पैसे कमी पडायचे. मग बाबांकडून त्यात भर घालून मनसोक्त पुस्तक खरेदी व्हायची.आता लहानपणापासून असं वाचनाचं बाळकडू मिळाल्यावर वाचनाची आवड निर्माण होणं स्वाभाविकच आहे.

शालेय वयात शाळेच्या प्रोत्साहनामुळे खूप वाचायला मिळालं. माझं पहिलं वहिलं पुस्तक मला अजून आठवतंय. शैलजा राजेंच ‘मन्दार’ नावाचं ते पुस्तक होतं. तिसरीत मिळालेलं; (गणितात १०० मार्कं मिळाल्याबद्दल!!!). मोठ्या चिकाटीने मी ते वाचून काढलं. घर सोडल्यावर मन्दारवर आलेल्या प्रसंगांमुळे मी अस्वस्थ झाले होते. मन्दारनंतर मला वाचायचा छंद लागला तो अजून आहेच .

आम्ही तिघी बहीणी. त्यामुळे तिघींची मिळून दरवर्षी कमीतकमी तीनतरी पुस्तकं असायची. भा. रा. भागवतांची सर्व पुस्तकं शाळेच्या बक्षिसखाती जमा आहेत. सूर्यावर स्वारी , मुक्काम शेन्डेनक्षत्र , फास्टर फेणे, जयदीपची जंगलयात्रा , भुताळी जहाज , अशी अनेक पुस्तकं आजही स्मरणात ताजी आहेत. सूर्यावर स्वारी वाचल्यानंतर अनेक वर्ष मला वाटायचं की एखादा धुमकेतू खरंच प्रुथ्वीचा लचका तोडेल आणि त्यावर मी असेन तर बरं होइल. भुताळी जहाज वाचल्यावर अनेक रात्री रामनामाचा जप करत झोपले आहे. गेटवे ऑफ इंडीयाला बोटीत बसतानासुद्धा एखादं भूत दिसेल असं वाटायचं. भा. रा. भागवतांच्या बहुतेक सर्व पुस्तकांमध्ये दूरच्या देशांची वर्णनं असायची. ती वाचून माझ्यासारखी भूगोलशत्रूसुद्धा नकाशे बघायला प्रव्रुत्त व्हायची, एवढा त्या पुस्तकांचा प्रभाव होता.
फास्टर फेणे खरंच फुरसुंगीला रहातो असं मला वाटायचं. अजूनही मला एकदा फुरसुंगीला जायची सुप्त ईच्छा आहे.

गोट्या , चिन्गी हे तर अगदी मित्रच होते . त्यांचे सर्व भाग वाचून काढले की परत एकदा पहील्यापासून सुरवात करायला मोकळी. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदातरी ह्या सर्व मित्रांना मी भेटायची.

शरावतीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिलय हे आता आठवत नाही, पण त्यातलं रोमांच अजून मनात जागं आहे. शेवटच्या प्रकरणात शरावती वायूरूपातून हळूहळू घनरूपात प्रकट होते आणि वरमाला घेऊन सलज्ज नायकापुढे ऊभी राहाते तो क्षण अविस्मरणीय आहे.हॅरी पॉटरमधल्या लॉर्ड वॉल्डेमॉर्टची तुलना मला वायूरूपात वावरणार्या ‘शरावतीचा शोध’ मधल्या खलनायकाशी करावीशी वाटते . तो शरावतीला कडेकोट पहार्यातून पळवून नेतो तेव्हा तिच्या खिडकीवरच्या नाजूक घंट्या मन्जूळ कीणकीणतात , तेव्हां सर्वांच्या लक्षात येतं की तिचं अपहरण झालंय. हा प्रसंगदेखील मी अजून विसरू शकत नाही.
दुर्गा भागवतांच्या ‘आंधळी’ ह्या हेलन केलरच्या जीवनावरच्या पुस्तकाने मला फारच भारावून टाकलं होतं. मध्यंतरी त्यावर आधारीत ‘ब्लॅक’ हा सिनेमा पाहिला. परंतू पुस्तकाची मोहीनी काही वेगळीच आहे. संस्कारक्षम वयात हेलनच्या जिद्दीचा, जीवनाकडे बघण्याच्या सकारात्मक द्रुष्टीकोनाचा माझ्या मनावर फारच परीणाम झाला होता. अजूनही हे पुस्तक मला मरगळल्या क्षणांना नवीन उभारी देतं.

माझ्या बालपणीच्या ह्या साथीदारांपैकी बरचसे अजूनही पुस्तकरुपाने मला साथसोबत करतात. जे पुस्तकरूपात नाहीयेत्, तेही स्मृतीरुपाने माझ्याजवळंच आहेत . माझ्या मुलीनेही ह्या माझ्या मराठी मित्रांची ओळख करून घ्यावी ही माझी ईच्छा अजून पूर्ण झाली नाहीये.

गुलमोहर: 

बालमोहनच्या आठ्वणी ताज्याकेल्याबद्दल धन्यवाद! खूपच छान लेख आहे!

कल्पू

छान!

पलुसकर,

मनापासुन आभार, लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल. अर्थात पुस्तके विकत घेणे परवडण्यासारखे नव्हते. आणि बक्षिस म्हणुन मिळण्याइतके आमच्याकडे डोके नव्हते. पण कुर्डुवाडीला असताना तिथल्या नगर वाचनालयात रविवारच्या दिवशी आठ-आठ तास बसणे, नंतर पुण्यात आल्यावर ABC च्या रस्त्यावरच्या जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यांची मैत्री करुन घेणे सगळं कसं.....छान होत.
अगदी जुनी पुस्तकं सुद्धा विकत घेणं शक्य नसायचं, पण तिथे बरेच विक्रेते एकदा विकलेले पुस्तक थोडी किंमत कमी करुन परत घ्यायचे..आणि त्या किंमतीवर दुसर्‍या पुस्तकाची उर्वरित रक्कम जोडुन दुसरे पुस्तक द्यायचे. अशी खुप पुस्तके वाचली....फाफे, गोट्या, एलिस इन वंडरलँड्चे अंक, पिनाकिन, गलिव्हरची साहसे, सिंदबाद, टारझन आणि अर्नाळकरांची पुस्तके..झुंझार, काळापहाड....आणि थोडे मोठे झाल्यावर मग वपु, पुल, सुशि, शन्ना ....... मज्जा होती.
त्या दिवसांची आठवण करुन दिल्याबद्दल खुप खुप आभार.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

लेख छानच आहे. बालपणीच्या आठवणी कोणालाच विसरणे शक्य नसते, बालपणातील संस्कारच माणसाला घडवितात, आणि त्या आठवणी प्रत्येकाबरोबर चिरतरुण असतात.

वर्षा

विशाल

तुम्ही कुर्डुवाडीचे का??

माझ्या मामीचे माहेर आहे ते.
माझ्या आईचे माहेर बार्शी.

--------------
नंदिनी
--------------

वा गाववाले आहात तर !
वडीलांची फिरतीची नोकरी असल्याने काही वर्षे कुर्डुवाडीला होतो. मुळचा सोलापुरचा.
५वी आणि ६वी बार्शीत झालीये सुलाखे हायस्कुलला.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

पलुस्कर / कल्पू : तुम्ही पण बालमोहनच्याच का? मी पण. माझ्याकडे अशी बक्षिसे मिळालेली कित्येक पुस्तके होती. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते "भुताळी जहाज" हे पुस्तक मी शाळेच्या वाचनालयात वाचलं होतं .......... Happy

गेल्याच महिन्यात मी स्वत:साठी परत एकदा फास्टर फेणेचा सगळा संच विकत घेतला. अजूनही मजा येते वाचायला ......... Happy

~~~~~~~~~~~~~~
ज्याची त्याची प्रश्नचिन्हे ...... Happy

पलुस्कर, बालपणाच्या आठवणी ताज्या केल्या एकदम..
मी पण एखादं पुस्तक घेऊन कोपर्‍यात बसायची...संपेपर्यन्त उठायचच नाही... आईला पण अशीच सवय असल्याने कधीही वाचनात आडकाठी झाली नाही.. कायमच प्रोत्साहन मिळालं.
--------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

मला आठवतं, एक दहा वर्षांपुर्वी नागपुरातील बर्डी भागात फिरताना असंच रस्त्यावरच्या रद्दी विक्रेत्याकडे रविंद्र भटांचं " इंद्रायणीकाठी" आणि अनंत तिबिलेंचं " अग्निदिव्य" सापडलं होतं. या दोन्ही पुस्तकांनी मला वेड लावलं होतं.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.