मायबोली १७वा वर्धापनदिन

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मायबोलीने या गणेशचतुर्थीला १७ वर्षे पूर्ण केली (तारखेप्रमाणे १६ सप्टेंबर) आणि १८व्या वर्षात पदार्पण केले आहे. सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!
गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.

गेल्या काही वर्षात अनेक मराठी संकेतस्थळे सुरु झाली. दिवसेंदिवस मराठीत संकेतस्थळ सुरु करणे सोपे आणि स्वस्त होते आहे ही मराठी भाषेसाठी चांगली गोष्ट आहे. पण त्याच बरोबर ते चालू ठेवणे आणि वाढवणे जास्त अवघड होते आहे. याचे कारण मराठी संकेतस्थळांचे अर्थकारण, इतक्या वर्षांनंतर अजूनही अवघड राहिले आहे.

जानेवारी २०१३ मधे, दिल्लीत झालेल्या, ७व्या अखिल भारतीय डिजिटल शिखर परिषदेत मायबोलीला भारतीय भाषांसाठीच्या विभागात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले होते आणि मायबोलीच्या वतीने अजय गल्लेवाले हे निमंत्रित वक्ते होते. मायबोली ही एकमेव मराठी संस्था या परिषदेत होती. इतर भाषिक सहकार्‍यांशी बोलताना हे लक्षात आले की अर्थकारणाचा प्रश्न हा फक्त मराठी संकेतस्थळांपुरता नसून हिंदी, बंगाली , मल्याळम या भाषेत काम करणार्‍या आणि मायबोलीपेक्षा कितीतरी मोठ्या असलेल्या संस्थानाही चांगलाच भेडसावतो आहे. हिंदी भाषिक संस्थानाही अशी अडचण यावी ही आश्चर्याची पण दुर्देवाने खरी गोष्ट आहे.
पण दुसरा विरोधाभास म्हणजे राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या सगळ्या मोठ्या ब्रँड्स चे मुख्य मार्केटिंग ऑफिसर मात्र स्थानिक भाषांमधे जाहिराती देण्यासाठी उत्सुक आहेत. किंबहुना इंग्रजी भाषा समजणार्‍या वाचकवर्गाच्या पलिकडे जायला ते उत्सुक आहेत. म्हणजे मागणी आणि पुरवठा या दोन्ही मोठ्या अर्थकारणासाठी पोषक आहेत. यात सगळ्यात मोठा अडसर आहे तो म्हणजे राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या सगळ्या जाहिरात संस्थांमधे स्थानिक भाषांमधे प्रवीण असणारे कर्मचारी खूप कमी आहेत. पण त्यापेक्षा मोठी अडचण म्हणजे निर्णय घेणारा अधिकारी वर्ग हा मुख्यत्वे इंग्रजी माध्यमातून शिकलेला असल्याने त्याचा कल कुठल्याच स्थानिक भाषांमधे काम करण्याचा नाही. स्थानिक भाषेतून लोकांशी जास्त परीणाम कारक संवाद साधता येईल हेच त्यांना पुरेसे समजत नाही. टेलीव्हीजन वर काही भयानक भाषांतर केलेल्या जाहिराती पाहतो याचेही हेच कारण आहे. स्थानिक भाषांमधे पैसे कमी मिळणार (सुरुवातीला तरी) अशी परिस्थिती असल्याने काम मिळाले तरी ते करण्यास ते फारसे उत्सुक नाहीत. हा अडसर दुर होणे हे स्थानिक भाषांमधल्या संकेतस्थळांना टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे.

गेल्या वर्षात आमचा उद्देश नवीन उपक्रम सुरु करण्यापेक्षा, आधी सुरु झालेले उपक्रम यशस्वी पार पाडण्याकडे होता. जसा मायबोलीचा पसारा वाढतो आहे त्याप्रमाणे काळाच्या ओघात सगळेच उपक्रम टिकून राहतील असे नाही. मायबोली व्यतिरिक्त अनेक जागा आज आंतरजालावर मराठी वाचकाला उपलब्ध आहेत याची आम्हाला जाणीव आहे. आणि तरीही तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.

मायबोली.कॉम

लेखनस्पर्धा २०१२:
आपल्याला आयुष्यभर आनंद देणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीला, तिला आकार देणार्‍या सार्‍या तंत्रज्ञांना आणि तिच्या द्रष्ट्या जनकाला सलाम करण्यासाठी, भारतीय चित्रपटसृष्टीचं शतकमहोत्सवी वर्ष दणक्यात साजरं करण्यासाठी मायबोली.कॉमवर गाथाचित्रशती लेखनस्पर्धा आयोजीत केली गेली. या स्पर्धेचं परीक्षक होते गिरीश कुलकर्णी, वीणा जामकर व गणेश मतकरी हे चित्रसृष्टीतील मान्यवर. या स्पर्धेला मायबोलीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.

गणेशोत्सव २०१२:
गणेशोत्सव संयोजक समितीने २०१२ चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजीत केला. मायबोली शीर्षकगीताच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मायबोलीकरांचा समूह - 'सूरमाय' यांनी सादर केलेली गीते आणि टिळकांचा आवाज ऐकायला मिळणे हे यावर्षीचं वैशिष्ट्य होतं.

दिवाळी अंक २०१२:
rar (आरती रानडे) यांच्या नेतृत्वाखाली आपण २०१२ चा अंक प्रकाशित केला. या वर्षीच्या अंकात, लेखकांच्या कल्पनाशक्तीला, अनुभवांना, रसिकतेला रुचतील अशा उत्स्फूर्तपणे केलेल्या लिखाणाचा समावेश होता. त्याचबरोबरॠतू, छंद आणि तंत्रज्ञान या आपल्या आयुष्यात जाणता-अजाणता एक कोपरा निर्माण करणार्‍या संकल्पनांचा वेध घेऊन अंकाचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न संपादक मंडळाने केला.

मायबोली माध्यम प्रायोजकः
यावर्षी तुह्या धर्म कोंचा, अनुमती, पुणे ५२, आयना का बायना अश्या अनेक पारितोषीक विजेत्या चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व स्विकारले. जुलै २०१३ मध्ये र्‍होड आयलंड येथे पार पडलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे माध्यम प्रायोजकत्व मायबोलीला मिळाले होते. विविध कार्यक्रमांची माहिती ऑनलाईन माध्यमातून सर्वांना पोचवली.

मदत समिती आणि स्वागत समिती:
सतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.

संयुक्ता:
१४ जुलै २०१३ ला संयुक्ता स्थापन होऊन ४ वर्षे पूर्ण झाली. आरोग्यसजग संयुक्ता करंडक आणि ओळख संयुक्तेची हे नवीन उपक्रम गेल्या वर्षभरात राबवले गेले याखेरीज नेहमीचे उपक्रम - मातृदिन, महिला दिन, पितृदिन हे यशस्वीरीत्या पार पाडले. संयुक्ताची दृश्यमानता वाढवण्याकरता तंत्रज्ञानाचा उपयोग करून संयुक्ता फेसबुक पान व ब्लॉगकरता संयुक्ता विजेट कोड बनवला. गेल्या काही वर्षांप्रमाणे ह्यावर्षीही महिला दिनानिमित्त संयुक्ता-सुपंथ परिवारातर्फे आपण खालील गरजू संस्थांना वस्तूरुपाने मदत केली.
१) शबरी सेवा समिती, ता. कर्जत, रायगड
२) भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, कुडाळ, जि. सिंधूदुर्ग
३) मुलींची अंधशाळा, कोथरुड, पुणे
४) सावली सेवा ट्रस्ट
* याखेरीज गेल्या वर्षभरात सटाणा येथील निवासी अपंग कल्याण केंद्र (जि. नाशिक) यांना पुस्तकरूपाने व १०० चादरी देणगीदाखल देऊन मदत करण्यात आली, तर ता. दापोली येथील लोकमान्य ट्रस्टच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींना कपड्यांची मदत करण्यात आली.

मराठी भाषा दिवस:
या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष. मराठीसाठी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं या हेतुने सुरु केलेल्या उपक्रमाला खूपच छान प्रतिसाद मिळाला आहे. .

अक्षरवार्ता:
नवीन पुस्तकांच्या ओळखीचा हा उपक्रम या वर्षीही तितक्याच सातत्याने चालू राहिला आहे.

वर्षाविहार २०१३:
यंदा वर्षाविहाराचे ११वे वर्ष होते . यंदाचा हा मैत्रीचा सोहळा २८ जुलैला विसावा रिसॉर्ट, मुरबाड येथे संपन्न झाला. पुणे आणि मुंबई येथील मायबोलीकरांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.
यानिमित्ताने तयार केलेल्या टीशर्ट आणि बॅगेला सर्व मायबोलीकरांनी रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. त्यातून मिळालेल्या पैश्यातून प्रगती प्रतिष्ठान, जव्हारच्या कर्णबधीर विद्यालयातील मुलांना गणवेशासाठी देणगी देण्यात आली.

सोशल नेटवर्क आणि मायबोली:
फेसबुकवरच्या मायबोलीच्या चाहत्यांची संख्या ७०,००० च्या वर गेली आहे. इतकंच नाही तर मायबोलीवरच्या कुठल्याही लेखनाला सहजच फेसबुकवर सांगता येईल अशी सोयही या वर्षापासून आपण केली आहे. याशिवाय मायबोलीवरचं निवडक विविध लेखन आपण मधुन मधुन तिथे प्रकाशित करत असतो. मायबोलीवरच्या लेखकांसाठी, फक्त मायबोलीवरचेच नाही तर मायबोलीबाहेरच्या वाचकांपर्यंत पोहोचण्याची ही संधी मायबोलीने उपलब्ध करून दिली आहे.

याच महिन्यापासून गुगल प्लस या नेटवर्कवरही मायबोलीने पाय रोवला आहे. फेसबुकप्रमाणेच तिथेही मायबोलीवरचे लेखन सहज सांगता येईल अशी सोय प्रत्येक लेखनाच्या पानावर केली आहे. त्यामुळे तिथलाही वाढता वाचकवर्ग, मायबोलीकरांच्या लेखनासाठी उपलब्ध होतो आहे.

बातम्या.कॉम
गेल्या वर्षापासून बातम्या.कॉम या वेबसाईटचा मायबोली वेबसमुहामधे समावेश झाला आहे. फक्त भारतीयच नव्हे, तर देशोदेशीच्या अनेक वृत्तपत्रांचे दुवे आता एकत्रित पणे बातम्या.कॉम वर उपलब्ध आहेत. यापूर्वी मायबोलीवर असलेला बित्तंबातमी विभाग आता बंद केला आहे.

खरेदी विभाग

नवीन प्रकाशक/भागीदार (partners/providers)
या वर्षात विष्णू मनोहर, ज्ञानगौरी प्रकाशन,सुधा कुलकर्णी या नवीन भागीदारानी मायबोली खरेदी विभागात त्यांच्या वस्तू विक्रिस ठेवल्या. मायबोलीवर विक्रिसाठी वस्तू ठेवणारे भागिदार एकूण ४० झाले आहेत.

खरेदी विभागाचे काम पाहणार्‍या सौ. विद्या जोशी यांचे आभार.

जाहिराती विभाग
जाहिराती विभागात फार मोठे बदल झाले नाहीत. त्याला मायबोलीकरांचा उत्तम प्रतिसादही मिळतो आहे. विशेषतः विवाहविषय विभागास या वर्षात भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. जाहिरात विभागाचे वेगळे फेसबुकपान ही सुरु केले त्याला आता पर्यंत २०००+ चाहते मिळाले आहेत.

कानोकानी.कॉम
या विभागात यावर्षी फारसे बदल झाले नाहीत.


इतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे

या शिवाय हार्डवेअर्/सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गिकरण, मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात.

मायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रिकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.

-----------------------------------------------------------------------------
विविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकरः

मदत समिती: रुनी पॉटर, नंद्या, मंजूडी

लेखन स्पर्धा २०१२:
इन्ना, मवा, महागुरू, मृण्मयी.

गणेशोत्सव २०१२ -
संयोजकः _मधुरा_,तोषवी,शुगोल, युगंधर, चिन्मय_कामत, स्नेहश्री
सल्लागारः मामी

दिवाळी अंक २०१२
संपादक मंडळ:
आरती रानडे, मीनल जोशी, शैलजा रेगे, अनीशा, प्रिया पाळंदे, अश्विनी जो.-दि., नंदन कुलकर्णी,
सल्लागारः कामिनी केंभावी
अंकाचा साचा, सजावट आणि मांडणी:बित्तुबंगा
मुखपृष्ठः अभिप्रा,बित्तुबंगा
रेखाटने आणि अंकातील सजावट: शैलजा रेगे, प्रिया पाळंदे, अनन्या (विनार्च यांची कन्या), अभिप्रा, Avanti Kulkarni, कंसराज, आरती रानडे, भाऊ नमसकर, दीपांजली, नंदन कुलकर्णी, सुभाष जोशी, मिलिंद ठाकूर
व्यंग्यचित्रे: भाऊ नमसकर
मुद्रितशोधन: रितेश्द१३, नीलमपरी, सायो, चिन्मय्_कामत, शुगोल, जाह्नवीके
मुद्रितशोधनासाठी विशेष सहाय्य: भरत मयेकर, गजानन, maitreyee, मिलिंदा, सिंडरेला, मेधा
देवनागरीकरण सहाय्य: महागुरू, अश्विनी के, मंजूडी, नेत्रा जोशी-अग्निहोत्री

संयुक्ता व्यवस्थापनः
अरुंधती कुलकर्णी, अगो, सिंडरेला, नानबा, मवा, बिल्वा, वत्सला, बस्के, मृदुला, सुनिधी, मामी, मो, रार, सुजा

मराठी दिवस २०१३:
निलू, मंजूडी, सोनपरी, uju, पौर्णीमा, chaitrali, अनिशा, डॅफोडिल्स, नियती, पराग, पूर्वा

महिला दिन २०१३ :
टोकूरिका, मृदुला, अरुंधती कुलकर्णी, rar, चेरी, बस्के, मवा, वत्सला, सिंडरेला.

वर्षाविहार/टीशर्ट २०१३
विनय भिडे, मयूरेश , anandmaitri, नील., मधुरा भिडे, आशूडी, रुमा, हिम्सकूल, योगेश कुळकर्णी, टोकूरिका, विजय दिनकर पाटील, मुग्धानन्द, दक्षिणा, बागुलबुवा, घारुआण्णा, anandsuju, MallinathK, कविन, गीतान्जली, श्यामली

माध्यम प्रायोजकः
पराग, पौर्णिमा, ऋयाम, मंजूडी, श्रद्धा, अरभाट, अरुंधती कुलकर्णी, नंदिनी, आगाऊ, स्वप्ना_राज, हिम्सकूल, सशल, सिंडरेला, योगेश कुळकर्णी, रसप, harshalc, शुगोल, जाई., टोकूरिका, हर्पेन, चिनूक्स

***
एखादे नाव नजरचुकीने राहून गेले असेल तर क्षमस्व.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अरे, बघितलाच नाही हा धागा.

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.

सर्वप्रथम अभिनंदन!!

आता विरोधाभासांविषयी,
१. विविध कंपन्यांमधले मार्केटिंग आणि डिसिजन घेणारे यांच्यात असलेले दुमत 'मिटिगेट' करण्याच्या दृष्टीने मायबोली काही उपक्रम योजत आहे का? सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात मायबोली इतका मोठा मराठी ऑन्लाईन उपभोक्ता-वर्ग अजून कुठेही नाही.
२. स्थानिक भाषेत जाहिरात करण्यासाठी 'मायबोलीच' का सर्विस प्रोवायडर बनत नाही? पैसा मिळेल, स्पॉन्सर्शिप मिळेल, रोजगार मिळेल, युजर्-बेस मिळेल.. विन-विन सिचुएशन वाटते.

Pages