ती नसते तेव्हा..

Submitted by रसप on 9 September, 2013 - 01:47

ती नसते तेव्हा नजर बावरी होते, भिरभिर करते
मी माझा हसतो, बसतो, बघतो; लक्ष कशातच नसते

ती नसते तेव्हा अंगावरती भिंती धावुन येती
पाहून उंबरा उदासवाणा बंद कवाडे होती

ती नसते तेव्हा गुलाबगाली दहिवर का चमचमते?
का सुगंध शोधत झुळुक मंदशी एकटीच झुळझुळते?

ती नसते तेव्हा मनात माझ्या खळकन काही तुटते
पण कुणास माझी वेडी तळमळ बघूनही ना दिसते

ती नसते तेव्हा वाळूवरती नाव तिचे मी लिहितो
तो खळखळ करुनी धावत येतो, सारे मिटवुन जातो

ती नसते तेव्हा रात्र गोठते, सरूनही ना सरते
आकाश सांडते भवताली काहूर दाटुनी येते

ती नसते तेव्हा मिटता डोळे समोर येवुन बसते
ती बोलत काही नाही मजला क्षणभर हसवुन जाते

....रसप....
१ ऑक्टोबर २०११
http://www.ranjeetparadkar.com/2011/10/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचंड आवडली. अगदी मोठ्याने चालीतही म्हणून बघितली. खूप दिवसांनी मायबोलीवर एव्ह्ढी छान कविता वाचली. धन्यवाद Happy