बदलता दु:खही येते.. (खपवता दु:खही येते..)

Submitted by रसप on 7 September, 2013 - 00:09

खपवता दु:खही येते पहा जाऊन बाजारी
स्वत:चे दु:ख विकणारे इथे कित्येक व्यापारी

तुझ्याशी बोलणे म्हणजे विसावा शर्यतीमधला
फिरे आयुष्यही माझे मला पाहून माघारी

कुणाचे भोग थोडेसे कुणी भोगून फेडावे
असे ना कोणते नाते, अशी ना कोणती यारी

तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी

तुझ्या रंगाविना मजला न भावे रंगही कुठला
म्हणूनच आवडे बहुधा मला ही रात्र अंधारी

कधी अळणी, तिखट किंवा कधी आयुष्य चव देते
'जितू' समजून घे थोडे, शिजवतो एक आचारी

....रसप....
७ सप्टेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/09/blog-post_7.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खपवता दु:ख .... असे असते तर मला व्यक्तिश:अधिक भावले असते बदलता हे छानच आहे पण .... असो माझे वै म तुला कळवत आहे इतकेच् Happy
बाकी तसे सगळेच शेर भन्नाट झालेत खास्करून फ्लो खूप आवडला

खपवतामुळे मतला उत्तम झाला.

तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी

ह्याला जवळ जाणारा पण आशयासाठी संपूर्णपणे वेगळा जाँ निसार अख्तर ह्यांचा एक शेर,

मैं जब भी उस के ख़यालों में खो सा जाता हूँ
वो ख़ुद भी बात करे तो बुरा लगे है मुझे

शुभेच्छा!

डॉक,

कृष्ण किंवा विठ्ठलासाठीचा शेर आहे तो.

तो आवडतो म्हणून त्याचा रंग आवडतो म्हणून काळी रात्र आवडते, असा काहीसा विचार आहे.

तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी

तुझ्या रंगाविना मजला न भावे रंगही कुठला
म्हणूनच आवडे बहुधा मला ही रात्र अंधारी <<< शेर आवडले.

या जमीनीला न्याय देण्यासाठी अधिक गहिरे शेर व्हायला हवे होते असे उगाचच मनात वाटून गेले.

============

अवांतर - या जमीनीतील माझी 'बेफिकीरी'मधील गझल आठवली.

कुणाची ही कलाकारी, कुणाची ही अदाकारी
कुणाच्या रंजनासाठी युगांची चालते वारी

धन्यवाद!

ओक्के.

छान. आवडली रचना.

तुझ्या स्मरणांमुळे दाटून येते खूप व्याकुळता
तुला शोधत हरवतो मी जरी बसलीस शेजारी

तुझ्या रंगाविना मजला न भावे रंगही कुठला
म्हणूनच आवडे बहुधा मला ही रात्र अंधारी

क्या बात है....!!!

-दिलीप बिरुटे

धन्स जितू बदल आवडून घेतल्याबद्दल

म्हण्जे अंधारी चा अर्थ मी बरोबर लावत होतो तर !! Happy

बेफीजींच्या त्या गझलची जमीन मलाहीली दिसत होती ....