माथेरान... व्हाया गार्बेट्ट पॉईंट

Submitted by रोहित ..एक मावळा on 6 September, 2013 - 06:37

माथेरान ...ज्याच्या माथ्यावर रान आहे.. असे गर्द हिरव्यागार झाडीने नटलेले..एक थंड हवेचे ठिकाण..
प्रत्येक मोसमात याचे सौंदर्य बघण्यासारखे असते.पावसाळ्यात तर इथला निसर्ग अफलातुन असतो.
माथेरानला नेरळहुन मिनीट्रेनने किंवा रस्त्याने वरती पोहोचता येते.पण पावसाळ्यात मिनीट्रेन बंद असते.
निसर्गसंपत्तीन नटलेल्या अशा या माथेरानला अनुभवण्यासाठी ट्रेकर्सना वेगवेगळ्या वाटा नेहमीच खुणावत असतात.
त्यातल्याच एका वाटेच्या अनोख्या सफरीवर...

माथेरानच्या माथ्यावरील गार्बेट्ट पॉईंट गाठायला नेरळएवजी भिवपुरी स्टेशनवर उतरावे लागते.भिवपुरी तस पावसाळ्यात धबधब्यात भिजण्यासाठी प्रसिद्ध.त्यामुळे बरेचसे लोक धबधब्यांकडे कुच करतात अन आपण मात्र गावातुन जाणारी वाट पकडायची.गावाच्या शेवटी जोपर्यंत शेणाचा वास नाकात भरत नाही तोपर्यंत चालत राहायच.गावाच्या शेवटी एक गोठा लागतो.तेथुन एक छोटीशी चढन चढुन एका बंधार्‍याजवळ येतो.
बंधारा कसला तलावच तो...
येथुन समोरच माथेरान ढगांच्या दुलईत पहुडलेला दिसतो.

तळ्याच्या उजव्या बाजुने शेळी-मेंढर चरायला गेली अन आम्ही भटक्यांनी डावीकडची बाजु पकडली.

पावसाची सर अधुन-मधुन येतच होती.आजुबाजुचा निसर्ग हिरवाईने नटलेला होता.फुलांना तर बहर आला होताच पण काटेरी झुडपानेसुद्धा आपल रुपड पालटल होत.

पांढर्‍या शुभ्र मोत्याच्या जलधारा डोंगरांच्या अंगाखांद्यावर खेळत त्या तळ्यात एकरुप होत होत्या.
छोटे छोटे धबधबे नजरेला भुरळ पाडत होते..मग मनाला आवर कसा राहील त्यात डुंबल्याशिवाय....याच वाटेने पुढे गेल्यावर एक वाट मोठ्या धबधब्याकडे जाते.तेथे एक ट्रेकिंग ग्रुप रॅपलिंगसाठी आलेले लांबवरुन दिसत होते.आम्ही मात्र एका मोठया ओढ्याला पार करुन आमच्या लक्ष्या़कडे सरसावलो.पावसाचा जोर आता वाढला होता.चिखल तुडवत आमची वाट पुढे सरसावली.
थोड्या वेळाने अजुन एक मोठा ओढा सामोरी आला.ओढा सुस्साट सुटला होता.उथळ जागी साखळी करुन तो ओढा आम्हाला पार करावा लागला.पुढे मग एका ढोर वाटेने खरी चढाई सुरु झाली.हि चढण खर म्हणजे आपल्या अंगावर येते.थोड्या वेळात आपली इंजिन धापा टाकायला लागतात.पण यांना त्याची पर्वा नसते.

मध्येच हि रानफुल पाहीली की थकवा कुठल्याकुठे पळुन जातो.

गुराख्यांकडुन वाट बरोबर हाय की नाय ते तपासुन बघितल.

आता आम्ही माचीवर पोहोचलो होतो.येथुन तीन छोटे पाडे आपल्य द्रुष्टीस पडतात.लांबवरुन आंब्याची झाडे थोडया अंतरावर असलेली वाट पकडायला लागते.
बैलगाडीच्या वाटेने पुढे गेल्यावर एक शाळा लागली. त्याला आम्ही शाळा पॉईट असे नाव दिले.कारण येथुन अफलातुन नजारा दिसतो.

शाळेच्या मागे पंधरा-वीस उंबर्‍याचा पाडा लागला.पाडाच्या अवतीभोवती भातशेती लावलेली होती.

थोडा विसावा घेऊन पायाला टाच मारली.
कौलारु घरांची ही डोंगरवाडी.......

डोंगरवाडीची फुलराणी...

पुढे एक विहिर लागली.विहिर काठोकाठ भरुन तृप्त झाली होती.विहिरीला वळसा मारुन आम्ही पुढे रवाना झालो.विहिरीच्या पुढे गेल्यावर आंब्याचे झाड लागले.आता परत खडी चढाई सुरु झाली.
पुन्हा गोगलगायसारखा वेग मंदावला.

जवळ-जवळ वीस मिनिटांच्या चढाईनंतर एका छोट्या धबधब्या जवळ येऊन पोहोचलो.परत एकदा जलक्रिडेचा आस्वाद घेतला.नागमोडी वळणा- वळणाची वाट सुरु झाली.हि वाट आम्हाला एका पठारावर घेऊन आली.हिरवागार गालीचा पसरलेल लांबलचक पठार,सोसाट्याच्या वारा,पावसाची रिमझिम ,समोर माथेरानचा डोंगराची एक बाजु अन त्यावरुन कोसळणार्‍या दुधाळ जलधारा पाहुन डोळ्याचे पारणे फिटले. जणु काय ... स्वर्गीय माहोल तयार झाला होता.

असा नजारा बघुन पाय जमिनीवर राहतील काय.

पाऊस .. पाऊस..
रिमझिम पाऊस ...
करी बेभान मनाला..
होऊन पाखरु ...
स्पर्शु आसमंताला..

या पठारावरुन पनवेलचे मोरबे धरण आपल्या द्रुष्टीस पडते.समोर माथेरानच्या डोंगराची एकबाजु ....

पावसात चिंब चिंब भिजल्यानंतर भन्नाट भुक लागली.तहानलाडु...भुकलाडु नी पोटाची खळगी भरली.
आता मोर्चा माथेरानकडे वळविला.

म्हशी चरायला घेऊन आलेल्या आजीबाई वाटेत भेटल्या.

पठारावर सरळ चालत गेल्यास पुढे एक रॉक पॅच लागतो.रॉक पॅच चढला की आपण माथेरानच्या माथ्यावर पोहोचतो.
पठारावरचे एक झाड अन त्याची ही तीन मुल............

त्या पठाराच्या टोकाला ..जिथुन रॉकपॅच चालु होतो तेथे एक वाट डावीकडे जाते.तेथे एक छोटस गारबुट गाव आहे.त्या गावाच्या नावावरुन या पॉईटला गार्बेट्ट नाव पडल असावे.

रॉक पॅच चढताना पावसामुळे थोड घसरायला होत.पण ही चढण सोप्पी आहे.

रॉक पॅच.....

डोंगराच्या कुशीत वसलेल गारबुट गाव...

आपण वरतुन पाहील तर,एखाद्या गडाच्या माचीसारखा नैसर्गिक आकार या पठाराचा दिसतो.

गार्बेट्ट पाँईटचा असा हा अनोखा प्रवास माथेरानच्या माथ्यावर येऊन संपतो.
गार्बेट्ट पॉंईट.....

पुढे माथेरानचे दाट जंगल लागते.उंचच उंच झाडे ..त्यातुन जाणारी लाल मातीची वाट ...प़क्ष्यांचा किलबिलाट .. या वाटेने चालताना मध्येच माथेरानच्या माथ्यावरुन कोसळणार्‍या धबधब्यांचे दर्शन अधुनमधुन होते.

जवळ-जवळ वीस-पंचवीस मिनिटाच्या चालीनंतर आपण माथेरान-नेरळ झुकझुकगाडीच्या ट्रॅकला येऊन मिळतो.

ट्रॅकवरुन चालत चालत टॅक्सी स्टँडजवळ पोहोचलो अन तेथुन शेअर टॅक्सीने नेरळ गाठले.माथेरानवरती वाहनांना प्रवेश नाही.घोड्यावरती बसुन वेगवेगळे पाँईटस बघता येतात.मुंबईपासुन थोड्याच अंतरावर असलेला असा हा ट्रेक एकाच दिवसात खुप काही देऊन जातो.

निसर्गाच्या अन पावसाच्या परत प्रेमात पडायला लावतो.

पुन्हा भेटुया....

रोहित ..एक मावळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही Happy

दिनेशदा Happy

धन्यवाद झकासराव,वर्षु नील,उमेशप,जयदीप,शागं.... Happy

हिच एक वाट करायची राहिली होती .झकास फोटो नी वर्णन .उडीचे फोटो काढतांना फोटो काढणाऱ्यानेपण उडी मारून शटर खेचले का ?काटेरी झुडुपांना बरे दिवस आलेत .फुलराणी ,गोगलगाय ,पिल्लवाले झाड ,धबधबे यांनी अगदी आम्हाला माथेरानात नेले .छान .#दिनेश ,नवीन पनवेल -धोधाणी-सनसेट पॉइंट वाट आहेच पण येथून होणारी रोपवे रद्द केली आहे .आणि एक धोधाणीच्या अगोदर वाघाची वाडी -हासाची पटटी -मलंग पॉइंट वाट आहे .