अरण्यवाचन - लेखक अतुल धामनकर - श्रीविद्या प्रकाशन

Submitted by दिनेश. on 6 September, 2013 - 05:31

या भारतभेटीत अतुल धामनकरांची ३/४ पुस्तके एकगठ्ठा घेतली. सध्या भारतात भटकंती फारशी होत नाही,
निदान पुस्तक वाचनातून तरी मानसिक समाधान मिळावे, अशी अपेक्षा.

फिल्ड गाईड ( मराठी शब्द ? ) म्हणून हे पुस्तक छान आहे. दूर्गभ्रमण हि संकल्पना आपल्याकडे आता खुप
लोकप्रिय झाली असली तरी अरण्यवाचन अभावानेच होते.
दूर्गभ्रमण करताना एक ठराविक ध्येय डोळ्यासमोर असते आणि खुपदा वेळेचे आणि वाहतुकीच्या साधनाचेही
बंधन असते. त्यामूळे धाडधाड करत / धडपडत ट्रेक्स केले जातात. वाघ मागे लागल्यासारखे म्हणणार होतो, पण तो बिचारा कुणाच्या मागे लागत नाही.
एक साहसी खेळ, थरार, समुहाने रहायची वृत्ती, नेतेपणाचे शिक्षण हे सगळे होते यात शंकाच नाही, पण
आजूबाजूला जे काही सतत घडत असते त्याचा आस्वाद आपण घेतो का ?

आजूबाजूला दिसणारे किटक, पक्षी, पावलांचे माग, जनावरांच्या विष्ठा, पायाचे ठसे, झाडांची पाने, मोहोर, फळे,
येणारे आवाज.. यांच्याकडे खुपदा दुर्लक्षच होते.

जर या सगळ्यात रस असेल तर हे पुस्तक अवश्य संग्रही ठेवा. अरण्यवाचन म्हणजे काय ? त्यासाठी काय
साधने लागतात ? जंगलात वावरायचे नियम काय ? काय काय बघायचे ? त्याचे निरिक्षण कसे करायचे ?
नोंदी कशा ठेवायच्या ? याची सविस्तर चर्चा पुस्तकात आहे.

नंतर एकेक गट घेऊन ( जसे श्वानवर्ग / शिकारी पक्षी ) त्याबद्दल आणि त्यात असलेल्या प्राण्यांबद्दल
सविस्तर माहिती आहे.

लहान मुलांना जंगलात नेताना खास अरण्यवाचनासाठी म्हणून एखादी सहल अवश्य असावी, असे मला
वाटते. लहान मुलांची निरिक्षण शक्ती जबरदस्त असते आणि आपल्या नजरेतून सुटलेले असे बरेच
त्यांना सहज दिसते.

या पुस्तकातली एकमेव उणीव म्हणजे यात रंगीत फोटो फारच कमी आहेत. स्वतः लेखकांनी काढलेली
रेखाचित्रे मात्र भरपूर आहेत. पण सध्या आपल्याला रंगीत फोटो बघायची एवढी सवय झालेली आहे कि
हि रेखाचित्रे समाधान देऊ शकत नाहीत. अनेक बाबतीत एखादा फोटो, रेखाचित्रांपेक्षा जास्त परिणामकारक
ठरला असता, असे मला वाटते.

लेखक स्वतः उत्तम प्रकाशचित्रकार आहेत, पण पुस्तकात मात्र त्याचा अंतर्भाव नाही.
मला वाटतं हे मराठी पुस्तकांचे ग्रहण आहे. रंगीत छपाईमूळे पुस्तकाची किंमत वाढते व ग्राहक कमी होतात,
असे विक्रेते सांगतात. मी मुद्दाम मराठी पुस्तके असे म्हणतोय, कारण पानोपानी सुंदर फोटो असलेली, तरी
वाजवी किंमत असलेली अनेक परदेशी पुस्तके माझ्याकडे आहेत.

या पुस्तकाची, रंगीत चित्रे असलेली इ-बूक आवृत्ती निघावी असे फार वाटते. तसेच इथल्या धंदेवाईक
भटक्यांनी ( म्हणजे चि. योगेश, चि. योगेश, चि. रोहन, चि. रोहित, चि. आशुतोष Happy ) जर या दृष्टीने फोटोग्राफी केली तर !

दुसरी एक बाब म्हणजे पुस्तकांत वृक्षांबद्दल काही नाही, अर्थात ते अरण्यवाचन या नावाच्या ते कक्षेबाहेरचे आहे, असे मला वाटत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा - तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे. पण प्रत्येकाची आवड - निवड लक्षात घेता कोणाला कशात रुची असेल सांगता येत नाही - मात्र अरण्यवाचनाची सवय लाउन घेतली तर सहाजिकच तो अभ्यास न ठरता छंद होईल व त्यातील रुची देखील वाढेल.

मध्यंतरी शांकलीने सांगितले की त्यांचा जो एक ग्रुप आहे - वनस्पती लागवड व अभ्यासविषयक - त्यातील काही जणांनी असे सुरु केले की - पुण्यातील काही भागातील (एका ठराविक रस्त्याच्या कडेला असलेले वृक्ष , वनस्पती) वनस्पतींची नोंद करुन (फोटोसहित) ते एकमेकांना शेअर करायचे.
पुण्याच्या अगदी आसपास इतके काही पहाण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे की ते जरी सुरु केले तरी खूप झाले - असे वाटते.

आजकाल आंतरजालावर इतके काही मिळत असते की बरीच मंडळी कुठे बाहेर न जाता त्याचाच आस्वाद घेतात वा अभ्यास करतात - (हे पूर्णतः वैयक्तिक मत - कोणावर टीका करायची इच्छा नाही)

अतुल धामणकरांविषयी खूप ऐकून आहे पण अजून त्यांचे पुस्तक वाचलेले नाहीये - आता घेईन विकत... Happy

छान ओळख करून दिलीत! खेड्यात जर आयुष्याचा काही भाग गेला असेल तर निसर्गवाचन जरूर शिकून होते पण भटक्यांसाठी अरण्यवाचन शिकणे अत्यंत आवश्यक आहे.

वृक्षराजी विषयी माहिती नसेल तर असायला हवी अशी सुचना त्यांना करता येईल. कारण त्याशिवाय अरण्यवाचन हे काही पटत नाही. छानच ओळख पुस्तकाची, घेईन म्हणतो आता Happy

छान परीचय.आकाशवाणिवर सकाळि अशा निसर्गविषयक पुस्तकावर क्रमशःवाचन असते. आमच्यासारख्या घर
बशाना याच्यावर तृप्त रहावे लागते.

दिनेश...

"अतुल" चे अमोल वाचन हुकले आहे माझ्याकडून...अर्थात त्याला खास असे कोणतेही कारण नाही, पण आता तुम्ही दिलेला हा परिचय वाचून मनी तृप्ती निर्माण झाली आहे वाचनाची. या विषयातील माझ्या मते तज्ज्ञ म्हणेज श्री.मारुती चितमपल्ली....तुम्ही नक्की या लेखकाने निसर्गवाचन विषयावर लिहिलेली पक्षीकोश, सुवर्णगरुड, रानवाटा आदी पुस्तके वाचली असतील....फार फार निसर्गावर भरभरून लिहितात.

आभार दोस्तांनो,
आणखी दोन पुस्तके वाचायची आहेत.

स्वतः लेखकानेही लिहिलेलेच आहे कि या क्षेत्रात गुरुशिवाय पर्याय नाही. मूळात आवड लागायला पण तसा कुणी हवाच.
मला स्वतःला हि आवड अशी पुस्तकातूनच लागली. प्रत्यक्ष गुरुचे मार्गदर्शन लाभले नाही.
पण त्यामूळे एक होते, चाल बरीच मंदावते. इतर जण जे अंतर अर्ध्या तासात पार करतील त्यासाठी मला २ तास लागतात.

पण वाटेतला प्रत्येक घटक काहीतरी सांगत असतोच.

अशोक,
या दोघांची शैली फारच वेगळी आहे. मला स्वतःला चितमपल्लींचे लेखन जास्त आवडते.

हर्पेन,
वृक्षांच्या बाबतीत प्रा. घाणेकरांची देशी वृक्ष भाग १ व २, श्रीकांत इंगळहाळीकरांची फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री ( भाग १ व २, तिसरा पण आला आहे. ) शिवाय आसमंत आणि पुन्हा आसमंत अशी पुस्तके आहेतच.

स्वतः लेखकानेही लिहिलेलेच आहे कि या क्षेत्रात गुरुशिवाय पर्याय नाही. मूळात आवड लागायला पण तसा कुणी हवाच. >>> +१००... मी कॉलेजला असताना डॉ. वाटवे यांनी आमच्यात ही गोडी निर्माण केली.

निदान पुस्तक वाचनातून तरी मानसिक समाधान मिळावे, अशी अपेक्षा. >>>> +१००. म्हणुनच इथेही वाचतो. Happy